मुंबई - Akshaya Gurav Shashank Shendeमराठी चित्रपटसृष्टीच्या समृद्ध परंपरेत आशयाची वेगळी वाट चोखाळणाऱ्या आणि प्रेक्षकांच्या विचारविश्वाला धक्का देणाऱ्या कथांना नेहमीच विशेष स्थान मिळाले आहे. याच परंपरेत आता मानवी अस्तित्व, कर्माचे गूढ, मृत्यूचे अटळ चक्र आणि अनाकलनीय घटनांची मालिका यांचा रहस्यमय पट उलगडणारा ‘मृत्यूचक्र’ हा सस्पेन्स-थ्रिलर दाखल होत आहे. मृत्यूच्या पलीकडे दडलेले गूढ, कर्माच्या हिशेबाचा अनाकलनीय खेळ आणि भयाची सावली यांची उत्कंठावर्धक सांगड घालत ‘मृत्यूचक्र’ने प्रदर्शनापूर्वीच कुतूहलाची ठिणगी पेटवली आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे विश्वस्त राजाराम देशमुख, अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराजराजे भोसले, उपाध्यक्ष धनाजी यमकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. येत्या २३ ऑक्टोबरला हा रहस्यमय थरार संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपटगृहांत उलगडणार आहे.
श्री महादेव फिल्म प्रॉडक्शन प्रस्तुत आणि अध्यांश मोशन पिक्चर निर्मित या बहुचर्चित चित्रपटाची निर्मिती प्रणाली उन्मेश वाघमोडे यांनी केली आहे, तर दिग्दर्शनाची धुरा विलास वाघमोडे आणि अनुप्रिता कडू-गंगावणे यांनी सांभाळली आहे. ट्रेलरमध्ये दृश्यांची केलेली गुंफण खिळवून ठेवणारी आणि मनाचा ठाव घेणारी आहे. एका गूढ चक्राची टिक-टिक करणारी चाहूल, धूसर प्रकाशात उलगडणाऱ्या प्राचीन वास्तू, गूढ अंधाराचे सावट, सिरीयल किलरची दशहत, रहस्यमय वातावरण आणि शांततेला चिरत जाणारी भीतीदायक पार्श्वसंगीत अंगावर काटा आणते. साध्या गावाकडच्या वातावरणाशी नाळ जोडलेली वेशभूषा आणि त्याच वेळी व्यक्तिरेखांच्या चेहऱ्यावरील अनाकलनीय भाव कथानकातील खोल रहस्याची साक्ष देतात. हॉस्पिटलमधील दृश्ये, वैद्यकीय वास्तव आणि मानवी आकलनापलीकडील गूढ शक्तींचा संघर्ष यांमुळे कथानकात दडलेला सस्पेन्स अधिकच उत्कंठावर्धक ठरतो; ज्यामुळे प्रत्येक सेकंदाला कथेत नवीन वळण आल्याचा रोमांचकारी भास होतो. सुरुवात तिथेच होते, जिथे शेवट झाला होता, चक्र मृत्यूचे - मृत्यूचक्र... हा संदेश उत्सुकता वाढवणारा आहे. ‘प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली...’ या गूढ वाक्याने चित्रपटाच्या कथानकाभोवतीचे रहस्य आणखी गडद केले आहे.Akshaya Gurav Shashank Shende
प्रदर्शित झालेल्या ट्रेलरबाबत दिग्दर्शक म्हणाले की, ‘मृत्यूचक्र’ हा केवळ रहस्य आणि थराराचा खेळ नाही, तर मृत्यू, कर्म आणि मानवी अस्तित्वाकडे वेगळ्या नजरेने पाहणारा अनुभव आहे. ट्रेलरमधून चित्रपटाची केवळ झलक दाखवली आहे; मात्र त्यामागचे गूढ आणि प्रत्येक घटनेमागचा धागा आम्ही जाणूनबुजून प्रेक्षकांपासून लपवला आहे. ट्रेलर पाहताना निर्माण झालेली उत्सुकता चित्रपटगृहात पोहोचेपर्यंत कायम राहावी, हाच आमचा प्रयत्न आहे. ‘मृत्यूचक्र’ प्रेक्षकांना केवळ घाबरवणार नाही, तर चित्रपट संपल्यानंतरही काही प्रश्न त्यांच्या मनात घोळवत ठेवेल, असा मला विश्वास आहे.Akshaya Gurav Shashank Shende
या चित्रपटात सशक्त अभिनयशैली असलेले मातब्बर कलाकार झळकणार असून यामध्ये शशांक शेंडे, अक्षया गुरव, पुष्कराज चिरपुटकर, आस्ताद काळे, वर्षा दांदळे, कृतिका तुळसकर, सानिका बनारसवाले, संजय शेजवळ, शलाका गाडे, शरा गायकवाड, जितेंद्र पोळ, अनिल रबाळे यांच्या भूमिका आहेत. चित्रपटाचे तांत्रिक अंगही अत्यंत भक्कम असून, चित्रपटाची मूळ कथा डॉ. सुधीर निकम यांची आहे, तर पटकथा आणि संवाद विलास वाघमोडे व डॉ. सुधीर निकम यांनी लिहिले आहेत. रोहन शहा या चित्रपटाचे क्रिएटिव्ह प्रोड्युसर असून जयेश मिस्त्री यांच्या यूजेएम नेटवर्क्स अँड एंटरटेनमेंट एलएलपीच्या माध्यमातून या चित्रपटाचे वितरण संपूर्ण महाराष्ट्रात केले जाणार आहे. चित्रपटाचे संगीत आणि अंगावर रोमांच उभे करणारे पार्श्वसंगीत केदार दिवेकर यांनी दिले आहे, तर वलय मुळगुंद यांच्या गीतांना सुहास सावंत आणि शमिका भिडे यांनी आपल्या सुरेल आवाजाने सजवले आहे. चित्रपटाचे अप्रतिम छायांकन डिओपी निशांत भागवत यांनी केले असून दृश्यांची वेधक मांडणी संकलक राहुल भातणकर यांनी केली आहे. प्रोडक्शन डिझायनर म्हणून मयूर पवार, कला दिग्दर्शक कुणाल वेदपाठक, वेशभूषाकार किर्ती जंगम जोशी, रंगभूषाकार संतोष गायके यांनी जबाबदारी उत्तमरीत्या पेलली आहे.Akshaya Gurav Shashank Shende