१७६ कोटींच्या घोटाळ्याचा दावा खोटा.. टायकून्स समूहाने आरोप फेटाळले!

    01-Oct-2026

ठाणे (Tycoons Square MHADA Scam Claim) : कल्याणच्या चिकणघर येथील म्हाडा पुनर्विकासातील टायकून्स स्क्वेअर प्रकल्पासंदर्भात एका ग्राहकाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाल्यानंतर टायकून्स समूहाने या प्रकरणातील आरोप फेटाळून लावले आहेत. तक्रारदाराने प्रकल्पातील सदनिकेसाठी सुमारे ४० लाख रुपयांचा व्यवहार केला असून, त्यावरून करण्यात आलेला १७६ कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा दावा पूर्णपणे चुकीचा असल्याचे समूहाने म्हटले आहे.
 
चिकणघर म्हाडा वसाहतीतील विविध पुनर्विकास प्रकल्पांना धोरणात्मक त्रुटींमुळे मोठा विलंब झाला असून, त्याचा परिणाम टायकून्स समूहाच्या आर्थिक स्थितीवरही झाला. त्यामुळे ग्राहकांना सदनिकांचा ताबा देण्यास विलंब झाल्याचा दावा समूहाने केला आहे. प्रकल्प रेरा प्राधिकरणाकडे नोंदणीकृत असून, ग्राहकांनी आपल्या तक्रारींसाठी रेरा प्राधिकरणाकडे दाद मागावी, असेही समूहाने म्हटले आहे. (Tycoons Square MHADA Scam Claim)
 
दरम्यान, प्रकल्पाच्या अडचणींचा काही स्थानिक विरोधक आणि नेते गैरफायदा घेत असल्याचा आरोप टायकून्स समूहाने केला आहे. गिरीश पवार(श्रीकांत शितोळे यांचे नातेवाईक) आणि काही मोठ्या पदावरील राजकीय व्यक्ती विकासकांवर दबाव आणून प्रकल्प ताब्यात घेण्याचा कट रचत असल्याचा दावा समूहाने केला आहे. प्रकल्पाला केंद्र सरकारकडील निधीच्या वित्तपुरवठ्याची अंतिम मंजुरी मिळाल्याचा दावा करत, काही लोकांना व ग्राहकांना हाताशी धरून प्रकल्पाला अडथळे निर्माण केले जात असल्याचेही समूहाने म्हटले आहे.या कथित कटकारस्थानासंदर्भात समूहाकडे सबळ पुरावे असल्याचा दावा करण्यात आला असून, ते पुरावे पोलिसांना देऊन तपासात पूर्ण सहकार्य करण्याची भूमिका समूहाने घेतली आहे. (Tycoons Square MHADA Scam Claim)
 

 




संबंधित मजकूर