ॐ आगच्छन्तु में पितर एवं गृणन्तु जलाञ्जलिम्

    01-Oct-2026
 
 Shraddha Pitru Paksha Rituals
 
श्राद्ध म्हटले की सामान्यतः पितृपक्ष, पिंडदान, तर्पण आणि ब्राह्मणभोजन एवढ्याच गोष्टी डोळ्यांसमोर येतात. परंतु, भारतीय धर्मपरंपरेतील श्राद्धाची संकल्पना एवढ्यापुरती मर्यादित नाही. श्राद्ध हे मृत्यूनंतर केले जाणारे केवळ एक कर्मकांड नसून, जिवंत माणसाला अस्तित्वाच्या मुळांशी जोडणारा कृतज्ञतेचा संस्कार आहे. आज अस्तित्वात असलेला प्रत्येक मनुष्य, हा अनेक पिढ्यांच्या अखंड जीवनप्रवाहाचा परिणाम आहे. त्याचे शरीर, भाषा, कुटुंब, संस्कृती आणि संस्कार त्याच्या जन्मापूर्वीच अस्तित्वात असतात. भारतीय चिंतनाने, या वास्तवाला ‘पितृऋण’ या अत्यंत सुंदर संकल्पनेत बांधले आहे.
 
वैदिक परंपरेतील ऋणत्रयांमध्ये देवऋण, ऋषिऋण आणि पितृऋण यांचा विचार येतो. यामागील तत्त्व अत्यंत व्यापक आहे. मनुष्य हा दोन पिढ्यांच्या मध्यभागी उभा असतो; त्याच्या मागे त्याचे पूर्वज आणि पुढे त्याची संतती. मागील पिढ्यांनी जीवनाचा प्रवाह त्याच्यापर्यंत आणलेला असतो आणि तो अधिक समृद्ध करून, पुढच्या पिढीकडे सोपविण्याची जबाबदारी त्याच्यावर असते. त्यामुळे पितृऋण म्हणजे मृत पूर्वजांची भीती नव्हे; आपल्या अस्तित्वामागे उभ्या असलेल्या जीवनपरंपरेची जाणीव आणि त्या परंपरेविषयीची जबाबदारी होय.
 
‘पितर’ या शब्दाचाही अर्थ येथे नीट समजून घेतला पाहिजे. ‘पितर’ म्हणजे केवळ वडील, आजोबा आणि पणजोबा नव्हेत. व्यापक श्राद्धपरंपरेमध्ये मातृवंशातील दिवंगत व्यक्तींचाही विचार केला जातो. त्याचबरोबर वैदिक-पौराणिक साहित्यात अग्निष्वात्त, बर्हिषद् इत्यादी स्वतंत्र पितृगणांचाही उल्लेख येतो. म्हणून घरातील दिवंगत पूर्वज, धर्मशास्त्रातील पितृगण आणि भूत-प्रेत या कल्पनांची सरमिसळ करणे योग्य नाही. भगवद्गीतेच्या ९.२५ मध्ये ‘यान्ति देवव्रता देवान् पितन् यान्ति पितृव्रताः’ असे देव, पितर आणि भूत यांच्या गती स्वतंत्रपणे सांगितल्या आहेत. त्यामुळे पितर म्हणजे घराभोवती फिरणारे भूत आणि श्राद्ध म्हणजे, त्यांना शांत करण्याची प्रक्रिया, अशी लोकप्रिय समजूत भारतीय पितृतत्त्वाचे अतिसुलभीकरण करते.
 
‘श्राद्ध’ या शब्दाच्या मुळाशीच श्रद्धा आहे. देवांसाठी ‘स्वाहा’ आणि पितरांसाठी ‘स्वधा’ असा कर्मकांडातील भेदही याच दृष्टीने महत्त्वाचा. श्राद्धामध्ये स्मरण, संकल्प, तर्पण, पिंडदान, त्याग आणि अन्नदान अशा अनेक स्तरांचा समावेश होतो. त्यामुळे पिंडदान म्हणजे, मृत व्यक्तीपर्यंत प्रत्यक्ष अन्न पोहोचविण्याची एखादी गूढ प्रक्रिया एवढाच त्याचा अर्थ घेणे, योग्य ठरत नाही. आपल्या अस्तित्वामध्ये पूर्वजांचा वाटा आहे आणि म्हणूनच आपल्याकडील काही अंश त्यांच्या स्मरणार्थ अर्पण करणे, हा त्यामागील अधिक व्यापक आध्यात्मिक भाव आहे.
 
श्राद्धाचे अनेक प्रकार असल्यामुळे, त्याबद्दल सामान्य माणसाच्या मनात प्रश्न निर्माण होणे स्वाभाविक आहे. त्यातील एक प्रकार म्हणजे, ’चटश्राद्ध’ किंवा चटावरचे श्राद्ध. काही भागांत बोलताना त्याला ‘चटक श्राद्ध’ असे म्हटले जात असले, तरी ‘चटश्राद्ध’ ही संज्ञा अधिक प्रचलित आहे. श्राद्धासाठी अपेक्षित ब्राह्मण उपलब्ध नसतील, तर त्यांच्या स्थानी दर्भाची प्रतीकात्मक रचना ठेवण्याची पद्धत आहे. या दर्भरूप प्रतिनिधीला ‘चट’ किंवा ‘दर्भबटू’ असे म्हटले जाते. त्याला पितृस्थान अथवा आवश्यकतेनुसार देवस्थान देऊन, विधी केला जातो. त्यामुळे चटश्राद्ध म्हणजे वेगळ्या दर्जाचे श्राद्ध नसून, विशिष्ट परिस्थितीत प्रतिनिधिरूपाने कर्म पूर्ण करण्याची धर्मपरंपरेतील व्यवस्था आहे.
 
यापेक्षा वेगळी संकल्पना म्हणजे त्रिपिंडी श्राद्ध. नेहमीचे वार्षिक श्राद्ध आणि त्रिपिंडी श्राद्ध एकच नाही. त्रिपिंडीमध्ये तीन पिंडांचे अर्पण केले जाते. परंपरेनुसार ज्ञात-अज्ञात अथवा विशिष्ट कारणांनी सद्गतीची अपेक्षा असलेल्या पितरांसाठी, हा विशेष विधी केला जातो. महाराष्ट्रात त्र्यंबकेश्वरसारख्या तीर्थक्षेत्री त्रिपिंडी श्राद्धाची परंपरा विशेष प्रसिद्ध आहे. मात्र त्रिपिंडी श्राद्ध, नारायणबली आणि नागबली हे तीनही एकच विधी आहेत, अशी समजूत चुकीची आहे. प्रत्येकाची संकल्पना आणि प्रयोजन स्वतंत्र आहे.
 
याच ठिकाणी आणखी एक सावधगिरी आवश्यक आहे. घरात आजार झाला, विवाहाला विलंब झाला, अपत्यप्राप्तीमध्ये अडथळा आला किंवा आर्थिक समस्या निर्माण झाली, की त्यामागे पितरांचा कोप आहे आणि त्रिपिंडी केल्याशिवाय प्रश्न सुटणार नाही, अशी भीती निर्माण करणे, धर्मशास्त्रीय विचाराला धरून नाही. विशिष्ट विधी हा त्याच्या शास्त्रीय कारणानेच केला पाहिजे. ‘पितृश्रद्धे’चे रूपांतर ‘पितृभीती’मध्ये होऊ देण्याची गरज नाही.
 
भरणी श्राद्धदेखील स्वतंत्र संकल्पना आहे. पितृपक्षामध्ये भरणी नक्षत्राच्या योगावर केले जाणारे श्राद्ध म्हणजे भरणी श्राद्ध. भरणी नक्षत्राची देवता यम मानली गेल्याने, पितृकर्माच्या संदर्भात या नक्षत्राला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. भरणी चतुर्थीला आली, तर ‘चौथ भरणी’, पंचमीला आली तर ‘भरणी पंचमी’ अशा संज्ञाही प्रचलित आहेत. काही परंपरांमध्ये भरणी श्राद्धाला विशेष पुण्यफल सांगण्यात आले आहे. मात्र, मृत्यूनंतर प्रथम वर्ष पूर्ण होण्यापूर्वी कोणते पितृकर्म करावे, यासंबंधी स्वतंत्र धर्मशास्त्रीय संकेत आणि कुलाचार असल्याने अशा प्रसंगी आपल्या परंपरेतील जाणकाराचा सल्ला घेणे योग्य ठरते.
 
सर्वाधिक गोंधळ महालय श्राद्ध आणि सांवत्सरिक श्राद्धांच्यामध्ये होतो. दोन्ही श्राद्धे एक नाहीत. एखाद्या व्यक्तीचे निधन ज्या चांद्रतिथीला झाले असेल, त्या तिथीला पुढील प्रत्येक वर्षी त्या व्यक्तीला उद्देशून केले जाणारे श्राद्ध म्हणजेच सांवत्सरिक किंवा वार्षिक श्राद्ध. उदाहरणार्थ, एखाद्याच्या वडिलांचे निधन चैत्र कृष्ण अष्टमीला झाले असेल, तर त्या मृत्युतिथीशी त्यांचे सांवत्सरिक श्राद्ध जोडलेले राहते. महालय श्राद्धाची व्याप्ती अधिक व्यापक आहे. पितृपक्षालाच ‘महालयपक्ष’ असेही म्हटले जाते. याच काळात केवळ एका दिवंगत व्यक्तीचेच नव्हे, तर व्यापक पितृपरंपरेचे स्मरण केले जाते. पितृकुलाबरोबरच मातृकुल आणि इतर दिवंगत आप्तांच्या स्मरणालाही या परंपरेत स्थान मिळते. त्यामुळे सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास, सांवत्सरिक श्राद्ध हे विशिष्ट दिवंगत व्यक्तीच्या वार्षिक मृत्युतिथीशी संबंधित असते; महालय श्राद्ध हे पितृपक्षातील व्यापक पितृस्मरणाशी संबंधित असते. दोन्ही एकमेकांचे पर्याय नाहीत. ज्यांची मृत्युतिथी ज्ञात नाही किंवा योग्य तिथीला श्राद्ध करणे शक्य झाले नाही, अशा पितरांच्या स्मरणासाठी सर्वपित्री अमावास्येला विशेष महत्त्व दिले जाते.
 
श्राद्धाच्या चर्चेबरोबर आजकाल ‘पितृदोष’ हा शब्दही अतिशय सहज वापरला जातो. येथे धर्मशास्त्र आणि लोकसमजुती यांच्यातील सीमारेषा समजून घेणेही आवश्यक आहे. प्रत्येक अपत्यहीनता म्हणजे पितृदोष नाही, प्रत्येक विवाहातील अडथळा म्हणजे पितृदोष नाही आणि कुंडलीतील एखादी ग्रहस्थिती पाहून ‘पितरांचा शाप’ असल्याचे जाहीर करणे तर अधिकच अशास्त्रीय. धर्मशास्त्रीय पितृऋण आणि आधुनिक ज्योतिषव्यवहारात प्रचलित पितृदोष, या पूर्णतः समान संकल्पना नाहीत.
 
यातील सर्वांत सुंदर तत्त्व मात्र कर्मकांडाच्या पलीकडे आहे. पूर्वजांनी सदाचार, ज्ञान, दानशीलता आणि संस्कारांचा वारसा दिला असेल, तर तो पुढे नेणे ही पितृसेवा आहे. पण एखाद्या पिढीकडून व्यसन, हिंसा, अन्याय, वैर किंवा अज्ञानाचा वारसा मिळाला असेल, तर त्या चुकीची साखळी आपल्या पिढीत तोडणे, हीदेखील पितृसेवाच आहे. पूर्वजांची प्रत्येक कृती योग्यच होती, असे मानणे म्हणजे पितृभक्ती नव्हे. त्यांच्या सद्गुणांचा विस्तार करणे आणि त्यांच्या चुका पुढील पिढीपर्यंत पोहोचू न देणे, ही अधिक प्रगल्भ पितृभक्ती ठरते. म्हणूनच श्राद्ध हा केवळ मृतांचा विषय नाही. आज जे आपल्या पूर्वजांचे श्राद्ध करतात, ते स्वतः एक दिवस पुढील पिढ्यांचे पूर्वज असणार आहेत. आजचा पुत्र उद्याचा पिता आणि कालांतराने कोणाचातरी पितर होणार आहे. त्यामुळे श्राद्धाचा अंतिम प्रश्न आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी काय ठेवले एवढाच नसून; आपण आपल्या पुढील पिढीसाठी काय ठेवून जाणार आहोत, हाही आहे.
 
पिंड हे श्राद्धाचे दृश्य प्रतीक आहे, तर्पण ही कृतज्ञतेची अभिव्यक्ती आहे, ‘स्वधा’ हा अर्पणाचा संस्कार आहे; पण या सगळ्याचा आत्मा श्रद्धा आहे. पूर्वजांच्या नावाने मोठमोठी कर्मकांडे करून पुढील पिढीसाठी वैर, दुर्गुण आणि अन्यायाचा वारसा ठेवण्यात कोणतेही पितृऋण फिटत नाही.
 
पूर्वजांकडून मिळालेल्या सत्प्रवृत्ती अधिक समृद्ध करून पुढील पिढीला देणे आणि त्यांच्याकडून आलेल्या चुका आपल्या पिढीत थांबविणे; हे श्राद्धविधीचे कर्मकांडापलीकडचे सर्वांत सुंदर तत्त्व आहे.
 
- आसावरी पाटणकर




संबंधित मजकूर