मुंबई (Prasad Lad Mahindra Workers Union) : कांदिवली येथील मे. महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीतील गेली ७० वर्षे कार्यरत असलेल्या मान्यताप्राप्त महिंद्रा अँड महिंद्रा वर्कर्स युनियनच्या सरचिटणीसपदी आ. प्रसाद लाड यांची नियुक्ती झाली असून त्यांनी बुधवारी पदभार स्वीकारला. युनियनच्या निवडणुकीत श्रमिक उत्कर्ष सभेच्या नेतृत्वाखालील पॅनेलला कामगारांचा व्यापक पाठिंबा मिळाल्यानंतर ही नवी जबाबदारी आमदार लाड यांच्यावर सोपविण्यात आली.
श्रमिक उत्कर्ष सभेचे अध्यक्ष म्हणून आमदार प्रसाद लाड गेल्या काही वर्षांपासून कामगारांच्या विविध प्रश्नांसाठी सातत्याने कार्यरत आहेत. कामगारांचे प्रश्न प्रशासनाच्या पातळीवर मांडणे, संबंधित यंत्रणांशी संवाद साधणे आणि कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणे, या माध्यमातून त्यांनी कामगार क्षेत्रात आपली भूमिका अधिक सक्रिय केली आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबतही त्यांनी विधान परिषदेसह विविध स्तरांवर पाठपुरावा केला. (Prasad Lad Mahindra Workers Union)
महिंद्रा अँड महिंद्रा वर्कर्स युनियनला दीर्घ आणि समृद्ध कामगार चळवळीची परंपरा लाभली आहे. अनेक ज्येष्ठ कामगार नेत्यांनी या संघटनेचे नेतृत्व केले आहे. अशा ऐतिहासिक संघटनेची जबाबदारी मिळणे हा माझ्यासाठी सन्मानासोबतच मोठा विश्वास आणि जबाबदारी आहे, अशी भावना प्रसाद लाड यांनी व्यक्त केली. महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या कांदिवली येथील कारखान्यात सुमारे ६ ते ६.५ हजार कामगारांना रोजगार मिळत असून, या कामगारांच्या रोजगाराची सुरक्षितता, कल्याणकारी सुविधा, सेवा-संबंधित प्रश्न आणि भविष्यातील संधी यासाठी युनियनच्या माध्यमातून सकारात्मक आणि रचनात्मक भूमिका घेण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
“गेली पाच वर्षे श्रमिक उत्कर्ष सभेच्या माध्यमातून कामगारांचे प्रश्न मार्गी लावताना कामगारांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला, त्याच विश्वासाची ही जबाबदारी आहे. महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीतील हजारो कामगारांच्या हिताचे संरक्षण करतानाच कंपनीचा विकास आणि कामगारांचे कल्याण यांचा समतोल साधण्यासाठी आपण कटिबद्ध राहू. कामगारांच्या हक्कांसाठी आणि त्यांच्या प्रगतीसाठी सातत्याने प्रयत्न करू. - आ. प्रसाद लाड (Prasad Lad Mahindra Workers Union)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....