ठाणे (Pradeep Purnekar Murder Case) : माजीवडा-मानपाडा परिसरातील मनोरमानगर येथे समाजसेवक प्रदीप पूर्णेकर यांची निर्घृण हत्या झाल्याने ठाणे शहरात खळबळ उडाली आहे. या हत्येमागील नेमका हेतू आणि हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी ठाणे महापालिकेचे उपमहापौर कृष्णा पाटील यांनी पोलीस आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
पूर्णेकर हे तळागाळातील नागरिकांच्या प्रश्नांसाठी कार्यरत होते. त्यांनी अंमली पदार्थांविरोधात मोहीम राबवण्यासह अनधिकृत बांधकामांविरोधातही आवाज उठवला होता. या पार्श्वभूमीवर त्यांच्या विविध सामाजिक उपक्रमांचा आणि त्यातून निर्माण झालेल्या संभाव्य वादांचा तपासात विचार करण्यात यावा, अशी मागणी पाटील यांनी केली आहे. (Pradeep Purnekar Murder Case)
दरम्यान, ठाणे शहरात पोलीस उपनिरीक्षकाच्या हत्येनंतर अल्पावधीतच समाजसेवकाची हत्या झाल्याने कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावरही उपमहापौर यांनी आपल्या निवेदनातून चिंता व्यक्त करण्यात आली आहे. हत्येमागील सूत्रधार, कारण आणि प्रत्यक्ष हल्लेखोरांचा शोध घेऊन सत्य नागरिकांसमोर आणावे, अशी मागणी पाटील यांनी केली आहे.(Pradeep Purnekar Murder Case)