
मुंबई : पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचा खेळ रंगला असताना, सोमवारी विधानसभेत एक गमतीशीर प्रसंग घडला. अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी प्रश्न विचारणाऱ्या आमदार अमश्या पाडवी यांना चक्क 'मंत्रीमहोदय' संबोधले, आणि तेही एकदा नव्हे, तर दोनदा! यामुळे सभागृहात हास्याचा फवारा उडाला आणि सगळ्यांचा मूड काही काळासाठी हलका झाला.
अक्कलकुव्याचे शिवसेना आमदार अमश्या पाडवी यांनी तेल भेसळीच्या गंभीर मुद्द्यावर प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले, “अक्कलकुवा तालुक्यात टँकर लावून तेलात भेसळ केली जाते. नंदुरबार हा पूर्ण आदिवासी जिल्हा आहे. या भेसळयुक्त तेलामुळे लोकांना कर्करोगासारखे गंभीर आजार होत आहेत. यापूर्वी मी तक्रार केली तेव्हा २५ लाखांचा माल जप्त झाला, पण नंतर ते तेल ‘चांगले’ म्हणून परत केले गेले. या भेसळखोरांवर कठोर कारवाई होणार का?”, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
यावर उत्तर देताना मंत्री नरहरी झिरवळ यांनी अमश्या पाडवी यांना 'मंत्रीमहोदय' असे संबोधले. पहिल्यांदा चूक झाल्याचे लक्षात आणून दिल्यानंतर, त्यांनी माफी मागितली, पण पुन्हा दुसऱ्यांदा त्यांनी 'मंत्रीमहोदय' असे म्हणताच सभागृहात हशा पिकला. इतर आमदारांनी टोमणे मारत चूक पुन्हा लक्षात आणून दिली. यावर झिरवळांनी “सॉरी, सॉरी!” म्हणत माफी मागितली आणि उत्तर द्यायला सुरुवात केली. पण पुन्हा एकदा, “मंत्रीमहोदयांनी विचारलेला प्रश्न...” असं म्हणताच सभागृहात तिसऱ्यांदा हास्याची लाट पसरली.
यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मिश्किलपणे टिप्पणी केली, “झिरवळ साहेबांना भूमिकेत यायला थोडा वेळ द्याल की नाही!” यावर सभागृहात हास्यकल्ला झाला आणि सगळ्यांनी टाळ्यांनी दाद दिली. असा हा हलकाफुलका प्रसंग विधानसभेत चर्चेचा विषय ठरला.