कमल हसन यांचा वादग्रस्त विधानावर ठाम पवित्रा: "मी चुकलो तरच माफी मागेन"

    31-May-2025   

kamal haasan stands firm on controversial statement i will only apologize if I am wrong


चेन्नई : अभिनेते ते राजकारणी झालेल्या कमल हसन यांनी केलेल्या एका वादग्रस्त विधानामुळे कर्नाटकात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. त्यांनी म्हटले की, “कन्नड ही भाषा तमिळ भाषेपासून निर्माण झाली आहे.” त्यांच्या या विधानामुळे प्रखर कन्नड समर्थकांनी संताप व्यक्त केला असून, कर्नाटकातील अनेक राजकीय नेत्यांनी देखील या वक्तव्याचा निषेध केला आहे.


कन्नड भाषा आणि अस्मितेबाबत संवेदनशील असलेल्या कर्नाटकमधील अनेक संघटनांनी कमल हसन यांच्याविरोधात निषेध आंदोलनं केली आहेत. त्यांच्याकडून खुली माफी मागण्यात यावी, अशी मागणी होत आहे. मात्र, कमल हसन यांनी या सगळ्यावर प्रतिक्रिया देताना ठामपणे सांगितले आहे की, "मी जर चुकीचा असेन, तरच माफी मागेन."


मक्कल नीधी मय्यम (MNM) पक्षाचे प्रमुख असलेले कमल हसन, सध्या राज्यसभेत आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात करणार असून, त्यांना डीएमके पक्षाचे समर्थन लाभले आहे. त्यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले की, “मी पूर्वीही धमक्या अनुभवल्या आहेत. पण प्रेमच शेवटी जिंकतं. मला कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि केरळ या राज्यांप्रती खरी आस्था आणि प्रेम आहे. जे लोक यावर शंका घेतात, त्यांच्याकडे काहीतरी खास अजेंडा असतो.”


त्यांच्या या विधानाने प्रादेशिक भाषांबाबतचा चर्चेचा नवा मुद्दा निर्माण केला आहे. कन्नड ही एक स्वतंत्र आणि प्राचीन भाषा असून, तिचा इतिहास आणि वारसा मोठा आहे, असा मुद्दा अनेक कन्नड अभ्यासकांनी मांडला आहे. कमल हसन यांनी केलेलं विधान केवळ भाषिक गर्वाला धक्का नाही, तर ते ऐतिहासिकदृष्ट्याही अर्धवट आणि चुकीचं असल्याची टीका होत आहे.



तथापि, कमल हसन यांनी आपल्या भूमिकेवर ठाम राहून माफी मागण्यास नकार दिल्यामुळे हा वाद अजून काही काळ राजकीय आणि सामाजिक पटलावर सुरू राहण्याची शक्यता आहे.




अनिरुद्ध गांधी

ठाण्यातल्या के. जी. जोशी महाविद्यालयातून पत्रकारतेची पदवी प्राप्त. मुंबई विद्यापीठातून मराठी साहित्यात एम.ए पदवी प्राप्त. गेले ९ वर्ष मालिका, चित्रपट, नाटक यांमधून काम केले. लघुपट, नाटक लिखाणाची आवड. अभिनय क्षेत्रात राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त.
संबंधित मजकूर