विलेपार्लेतील प्रभात वस्तीचे भव्य हिंदू संमेलन उत्साहात संपन्न

    30-Jun-2026   
 
Vile Parle Hindu Sammelan
 
मुंबई : (Vile Parle Hindu Sammelan) विलेपार्ले येथील प्रभात वस्ती आयोजित भव्य हिंदू संमेलन गोमंतक सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून हिंदू समाजातील संघटन, संस्कार, सांस्कृतिक जाणीव आणि सामाजिक ऐक्याचा दृढ संदेश दिला. या संमेलनाला स्थानिक आमदार पराग अळवणी, स्थानिक नगरसेवक मिलिंद शिंदे, ज्येष्ठ संगीतकार श्रीधर फडके, तसेच विविध क्षेत्रांतील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाची सुरुवात 'हरे राम, हरे कृष्ण' या नामगजराने झाली. त्यानंतर राष्ट्रीय सेविका समितीच्या महिलांनी संपूर्ण वंदे मातरम् सादर करत राजमाता जिजाबाई, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि राणी लक्ष्मीबाई यांच्या राष्ट्रकार्यावर आधारित प्रेरणादायी गीतांद्वारे सभागृहात राष्ट्रभक्ती आणि संस्कारांचे वातावरण निर्माण केले. संहिता पूर्णपात्रे हिने आकर्षक गणेशवंदना नृत्य सादर करून उपस्थितांची दाद मिळवली.(Vile Parle Hindu Sammelan)
 
प्रास्ताविकात उपाध्यक्षा डॉ. शुभदा देशमुख यांनी हिंदू संमेलन आयोजित करण्यामागील हेतू, आजच्या काळातील त्याची आवश्यकता आणि संघटित समाजाचे महत्त्व याविषयी विचार मांडले. त्यानंतर प्रख्यात शास्त्रीय गायक, स्वातंत्रवीर सावरकरांच्या विचारांचे अभ्यासक डॉ. भरत बलवल्ली यांनी हिंदू संस्कृती आणि अध्यात्म या विषयावर प्रभावी मार्गदर्शन केले. त्यांनी स्वातंत्रवीर सावरकरांची गीते सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. विदुला आपटे आणि विद्या घाटे यांनी भक्तिगीते सादर करून कार्यक्रमात भक्तिरसाची रंगत आणली.(Vile Parle Hindu Sammelan)
 
अॅड. सरस्वती कदम यांनी कुटुंब प्रबोधन या विषयांवर मार्गदर्शन करत पालकांनी आपल्या मुलांना हिंदू इतिहास, संस्कृती, परंपरा आणि राष्ट्रपुरुषांविषयी माहिती द्यावी, त्यांच्या प्रश्नांची समर्पक उत्तरे देऊन त्यांच्यामध्ये संस्कार, अभिमान आणि जागरूकता निर्माण करावी, असे आवाहन केले. स्वामीनारायण मंदिराशी संबंधित संतांनी सर्व हिंदूंनी जाती-पंथाचे भेद विसरून संघटित होण्याची आवश्यकता अधोरेखित करत सामाजिक समरसतेचा संदेश दिला.
 
या संमेलनात दहावीच्या परीक्षेत नेत्रदीपक यश संपादन करणाऱ्या महानगरपालिका शाळेतील विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाची सांगता महानगरपालिका शाळेतील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या पसायदानाने झाली. कार्यक्रमात सहभागी सर्व कलाकार, वक्ते आणि सादरकर्त्यांचा भारतमातेची प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला. हिंदू समाजातील एकात्मता, संस्कृतीप्रेम, कुटुंबसंस्कार आणि राष्ट्रनिष्ठा दृढ करणारा हा प्रभात वस्तीचा हिंदू संमेलन सोहळा स्थानिक नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागात आणि प्रेरणादायी वातावरणात दिमाखात संपन्न झाला.(Vile Parle Hindu Sammelan)
 
या हिंदू संमेलनाच्या यशस्वी आयोजनामध्ये अध्यक्ष शिरीष गानू आणि उपाध्यक्षा डॉ. शुभदा देशमुख यांचे मोलाचे नेतृत्व लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रसिका पाटील यांनी केले, तर कार्यक्रमाची संपूर्ण आखणी सुप्रिया पूर्णपात्रे विवेक ताम्हणकर यांनी सर्व सहकाऱ्यांच्या सहकार्याने प्रभावीपणे पार पाडली. कार्यक्रमाच्या यशामध्ये विमल सिंघानिया, माधव कुंटे, आशिष जोशी, सुदर्शन गुरव, अभिषेक राजाध्यक्ष, मिलिंद पूर्णपात्रे तसेच अनेक कार्यकर्त्यांचे उल्लेखनीय योगदान लाभले. संमेलनाच्या सोशल मीडिया प्रसिद्धीसाठी अभिजीत पोंडवाल यांनी विशेष परिश्रम घेतले.(Vile Parle Hindu Sammelan)
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर