बोरिवली पूर्व येथे ‘स्वराज्य हिल रन २०२६’ मिनी मॅरेथॉन उत्साहात संपन्न

    30-Jun-2026   
Swarajya Hill Run 2026
 
मुंबई : (Swarajya Hill Run 2026) शिवराज्याभिषेकोत्सव दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य, स्वाभिमान आणि हिंदवी स्वराज्याच्या विचारांचा जागर युवा पिढीमध्ये व्हावा, तसेच राष्ट्रभावना, सामाजिक एकात्मता आणि शारीरिक तंदुरुस्तीला प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने ‘स्वराज्य हिल रन २०२६’ या मिनी मॅरेथॉनचे आयोजन बोरिवली (पूर्व) येथे करण्यात आले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ श्रीकृष्ण नगर (बोरिवली भाग), हिंदू नववर्ष स्वागत समिती, दहिसर आणि शिवशंभू विचार मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या उपक्रमाला युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
 
स्पर्धेची सुरुवात अशोक वन, गोकुळ आनंद हॉटेल येथून सकाळी ७.०० वाजता झाली. श्रीकृष्ण मंदिर मार्गे धावत सहभागी त्रिमंदिर, ऋषीवन, बोरिवली (पूर्व) येथे पोहोचले. या हिल रनमध्ये मुंबई, पालघर, विरार, ठाणे आणि कल्याण येथून शेकडो युवक-युवती सहभागी झाले. स्वराज्य हिल रनचे उद्घाटन श्रीकृष्ण नगराचे संघचालक श्रीराम मूर्ती, मारुती नगर संघचालक राजेश अग्निहोत्री, बोरिवली विधानसभा आमदार संजय उपाध्याय, नगरसेवक प्रकाश दरेकर, माजी नगरसेवक भास्कर खूरसंगे, जेष्ठ मॅराथॉन रनर प्रभाकर कोळी यांच्या हस्ते झाले. (Swarajya Hill Run 2026)
 
कार्यक्रमाची सुरवात शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानचे कार्यकर्ते अनिकेत सावंत यांनी शिव प्रार्थना व घोषणेने केली. कार्यक्रमाच्या समारोपात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुंबई महानगर घोष शिक्षण प्रमुख वसंत नायक यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे ऐतिहासिक महत्त्व, हिंदवी स्वराज्याची संकल्पना, सुराज्याची मूल्ये आणि लोकसहभागाचे महत्त्व यावर प्रेरणादायी विचार मांडले. त्यांच्या भाषणातून युवकांना राष्ट्रसेवा, सामाजिक उत्तरदायित्व आणि संघटित कार्याची प्रेरणा मिळाली. (Swarajya Hill Run 2026)
 
मिनी मॅरेथॉनदरम्यान सहभागींसाठी पिण्याच्या पाण्याची, प्रथमोपचाराची तसेच आवश्यक सुरक्षा व्यवस्थेची विशेष काळजी घेण्यात आली. सर्व सहभागी धावपटूंना फिनिशर पदक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. आयोजकांनी या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व सहभागी, स्वयंसेवक, मान्यवर आणि सहकार्य करणाऱ्या नागरिकांचे आभार व्यक्त करत, अशाच पुढील राष्ट्रप्रेरणादायी होणार्‍या युवा सम्मेलन मध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमाच्या आयोजनात युवा कार्यकर्ते ओंकार उदय आंबवकर, सुमेध पारकर, शुभम गोरेगांवकर यांचे विशेष योगदान होते. (Swarajya Hill Run 2026)
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर