मुंबई : (Sharad Pawar Tukaram Remark) जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या ३७५ व्या वैकुंठ गमन वर्षाच्या पार्श्वभूमीवर, आकुर्डी येथील एका कार्यक्रमात बोलताना ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केलेल्या एका विधानामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. संतांच्या परंपरेवर आणि वारकरी संप्रदायाच्या श्रद्धांवर पवारांनी थेट बोट ठेवल्याने वारकरी संप्रदायात तीव्र नाराजी आणि संतापाची लाट उसळली आहे.
संत तुकाराम महाराजांच्या वैकुंठ गमनावर भाष्य करताना, "आजच्या काळामध्ये वैकुंठ गमन वगैरे म्हणणं मला पटत नाही. असं म्हणणं म्हणजे एका विशिष्ट वर्गाने आपली कृत्य लपवण्यासाठी थोपवलेल्या गोष्टींना खरं मानण्यासारखं होईल," असे विधान पवारांनी केले. शेकडो वर्षांपासून वारकरी संप्रदाय ज्या श्रद्धेला मनोभावे मानतो, त्या 'वैकुंठ गमन' संकल्पनेला थेट 'विशिष्ट वर्गाचे कृत्य लपवण्याचा प्रयत्न' असे संबोधून पवारांनी नव्या वादाला तोंड फोडले आहे. सामाजिक सलोखा राखण्याऐवजी वारकरी संप्रदायामध्ये उभी फूट पाडणारे आणि तेढ निर्माण करणारे हे वक्तव्य असल्याचा आरोप आता होऊ लागला आहे.
एकीकडे वैकुंठ गमनावर आक्षेप घेताना पवारांनी तुकाराम महाराजांच्या "भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे माथी हाणू काठी" या अभंगाचा दाखला दिला. "हा तुकाराम महाराजांचा बाणा घेऊन पुढे जाण्याचा हा काळ आहे. रंजल्या-गांजल्यांना सहकार्य करताना नाठाळाच्या माथी काठी हाणण्याचा संदेश आजच्या काळात दुर्लक्षित करता येणार नाही," असे सांगत त्यांनी आपल्या आक्रमक भूमिकेचे समर्थन केले. मात्र, संत तुकाराम महाराजांच्या करुणामय आणि प्रेमप्रधान भक्तीपरंपरेच्या पार्श्वभूमीवर पवारांच्या विधानातील 'नाठाळाच्या माथी काठी' या वक्तव्यावर अनेकांकडून आक्षेप नोंदविण्यात आले आहेत.(Sharad Pawar Tukaram Remark)
कार्यक्रमानंतर शरद पवारांनी आपल्या अधिकृत फेसबुक पोस्टवरही याच दोन मुद्द्यांचा ठळकपणे उल्लेख केला. सोशल मीडियावर ही पोस्ट येताच वारकरी संप्रदायातील अनुयायी, कीर्तनकार आणि विचारवंतांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. राजकीय स्वार्थासाठी संतांच्या इतिहासाची आणि वारकऱ्यांच्या अस्मितेची मोडतोड थांबवा, असा इशारा वारकरी संघटनांकडून दिला जात आहे. ऐन आषाढी एकादशीच्या आणि पालखी सोहळ्याच्या वातावरणात महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि संतांच्या परंपरेवर अशी वादग्रस्त विधाने करून समाजात तेढ निर्माण करण्याचा हा जाणीवपूर्वक प्रयत्न आहे का? असा प्रश्नही आता जनतेतून विचारला जात आहे. (Sharad Pawar Tukaram Remark)
शरद पवार यांना हिंदू संत आणि त्यांचे विचार मुळात मान्यच नाहीत. तुकोबांसहित अन्य समकालीन संतांचे त्यांच्या वैकुंठगमनाचे अभंग असताना त्यावर प्रश्न उपस्थित केला नाही तर ते शरद पवार कसले? पण त्यांनी मान्य-अमान्य करुन काही उपयोग नाही कारण महाराष्ट्रातील लाखो वारकरी ३७५ वर्षांपासून जगदगुरु तुकाराम महाराज यांचे वैकुंठ गमन मान्य करतात आणि जोवर चंद्र-सूर्य आहेत तोवर हे सत्य अशा ऐऱ्यागैऱ्यांच्या बरळण्याने बदलणार नाही.(Sharad Pawar Tukaram Remark)
- आचार्य तुषार भोसले, प्रदेशाध्यक्ष, भाजपा आध्यात्मिक समन्वय आघाडी
एखादी गोष्ट हेतुपुरस्सर, चुकीच्या दृष्टीने समाजासमोर मांडणे शास्त्रामध्ये याला 'प्रमाद' नावाचा दोष असे म्हणतात. संपूर्ण राजकीय कारकीर्द आणि पक्ष यांची वाताहत झाल्यानंतरही येन केन प्रकारे आपण प्रसिद्धीच्या झोतात राहिलो पाहिजे यासाठीची ही केविलवाणी धडपड आहे. समाजात तेढ निर्माण होणे हेच त्यांचे आजपर्यंतचे भांडवल राहिले आहे. हा काही त्यांचा पहिला प्रयत्न नाही... असो! या आणि आयुष्य आहे तोपर्यंतच्या त्यांच्या सर्व प्रयत्नांना वारकरी संप्रदायाचे तत्वज्ञान पुरुन उरणार आहे.
- रामकृष्ण हनुमंत महाराज वीर, संत साहित्य अभ्यासक