वारीतला कोरडा पाषाण!

    30-Jun-2026

शरद पवार यांच्या जन्माच्या कित्येक शतके आधीपासून पंढरपूरची वारी सुरू होती आणि त्यांच्या पश्चात अनेक शतकेही ती तशीच सुरू राहील. या वारीचे स्वरूप धार्मिक आहे की अन्य काही, ते सांगण्याची उठाठेव पवार यांनी करूच नये. कारण, पवार यांचे विचार आणि ते स्वत: आजच्या पिढीसाठी कालबाह्य झाले आहेत. ही वारी समतेची शिकवण देणारी आहेच; पण तिचे अधिष्ठान हे देखील धार्मिकच आहे, हे जरी पवारांना समजले, तरी त्यांचा जन्म सफल होईल.

वसंत ऋतूची चाहूल लागली की, कोकिळाला कंठ फुटतो म्हणतात. त्याच्या मंजूळ आवाजाने ऋतुबदलाचे शुभसंकेतही मिळतात. पण, कावळा काव-काव करू लागला की, लोकांच्या कपाळावर नापसंतीच्या आठ्याच पडतात. त्याचप्रमाणे हिंदू सणवारांचे दिवस आले की, काही नाठाळ आणि नास्तिकांनाही कंठ फुटतो. अर्थात, त्यांच्याकडे सामान्य माणूस फारसे लक्ष देत नाही, तो भाग अलाहिदा. या गटातील लोकांमध्ये राजकीयदृष्ट्या कालबाह्य ठरलेल्या नेत्यांचा समावेशच अधिक असतो. कारण, आपण काही वादग्रस्त वक्तव्ये केली नाहीत, तर आपली कोणी दखलही घेणार नाही, हे त्यांना पक्के ठाऊक असते. म्हणूनच, गरज असो-नसो किंवा आपल्या वक्तव्यात काही तथ्य असो-नसो, ते नियमितपणे आपली हास्यास्पद वक्तव्ये करीत राहतात. माजी मुख्यमंत्री शरद पवार यांचा समावेश आता अशाच लोकांमध्ये होतो. त्यांनी पंढरपूरच्या वारीसंबंधी केलेली वक्तव्ये याच दृष्टिकोनातून पाहावी लागतील, अन्यथा त्यांच्या या वक्तव्यांचे काहीही महत्त्व नाही.

आकुड येथील एका कार्यक्रमात पवार यांनी नुकतेच असे विधान केले की, “महाराष्ट्राची खरी ओळख मंदिराच्या कळसात नाही; तर ज्ञान, समता, करुणा यांच्या अखंड परंपरेत आहे. संतांचा वारसा हा केवळ आध्यात्मिक नसून, लोकशाही मूल्यांचा आहे.” पवार यांनी अप्रत्यक्षपणे वारीतील हिंदू धर्माचा आधारच डावलण्याचा प्रयत्न केला. गेल्या काही वर्षांपासून पवार यांनी, पंढरपूरच्या वारीसंबंधी वादग्रस्त वक्तव्ये करण्याचा सपाटाच लावला आहे. तो करताना त्यांनी सातत्याने हिंदू धर्माला लक्ष्य केले. आताही वारीचा वारसा हा आध्यात्मिक नसून समतेचा आसल्याचे सांगणे, हा त्यातील हिंदुत्वाला डावलण्याचाच केविलवाणा प्रयत्न आहे.

पंढरपूरची वारी ही समतेची शिकवण देणारी निश्चितच आहे. पण, ही समता धार्मिक अधिष्ठानावर अधारित आहे. समाजातील कोणत्याही जातीतील व्यक्तीला ईश्वरभक्ती करण्याचा अधिकार आहे, हे संतांनी याच वारीतून दाखवून दिले. केवळ ब्राह्मणच नव्हे; तर कुंभार, माळी, शिंपी, वैश्य-वाणी अशा सर्व जातींतील लोक त्यात एकरूप होतात. वारीत कधीच शिवाशिव पाळली जात नव्हती आणि नाही. संतांची समतेची ही शिकवण, अनेक पिढ्यांपासून मराठी माणसाच्या रक्तात भिनली आहे. ती कोणी मुद्दाम सांगण्याची आवश्यकता नाही. आजकाल काही सुशिक्षित, पांढरपेशे लोक या वारीत एका मर्यादित टप्प्यापुरते सहभागी होतात आणि पूर्ण वारीचा अनुभव घेतात. पवार यांचा वारीत आजवर इतकाही सहभाग कधी दिसलेला नाही. तेव्हा अशा नेत्यांनी या वारीचा हेतू काय, तिचे स्वरूप काय वगैरे गोष्टींची उठाठेव करण्याच्या भानगडीत पडूच नये. कारण, वारकऱ्यांना त्यांच्या मताशी काहीही देणेघेणे नाही. ते आपल्या विष्णुनामात तल्लीन आहेत आणि राहतील. सामान्य लोकांना पवारांच्या वक्तव्यात आता काही स्वारस्य राहिलेले नाही. कारण, ते आता कालबाह्य झाले आहेत.

वारीने समतेचे तत्त्व प्रत्यक्षात उतरविले असले, तरी तिचा मूळ हेतू विठ्ठलभक्तीचाच आहे. तिचे अधिष्ठानही धार्मिकच आहे. त्यामुळे पवार काहीही म्हणाले, तरी त्याने वारकऱ्यांना काही फरक पडत नाही. पण, अशा वक्तव्यांनी आपण हिंदूविरोधी आहोत, हे पवार पुन्हापुन्हा दाखवून देतात. ‌‘अजूनही संत तुकाराम यांचे सदेह वैकुंठगमन झाल्याचे आपल्याला मान्य नाही,‌’ असे ते सांगतात. वारकऱ्यांना हिंदू धर्मापासून वेगळे पाडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. म्हणूनच, ‌‘राष्ट्रीय वारकरी परिषदे‌’ने, त्यांना यापुढे कोणत्याही कार्यक्रमात निमंत्रण देण्यासच मनाई करण्याचे काही वर्षांपूर्वीच आवाहन केले आहे. वारकऱ्यांच्या विरोधात वक्तव्ये करणेही पवारांसाठी नवीन नाही. किंबहुना, अशी वक्तव्ये करूनच पवार समाजात फूट पाडण्याचे कामच करीत असतात. काही दिवसांपूर्वी राज्यातील 60 टक्के वारकरी हे धर्मांध विचारसरणीचे असल्याचेही, पवारांनी म्हटले होते. स्वत:ला ‌‘नास्तिक‌’ म्हणवून घेत असले, तरी पवार हे पक्के जातीयवादी मनोवृत्तीचे नेते आहेत. समतेचे राजकारण करण्याचा आग्रह धरणाऱ्या पवारांनीच, राज्यातील राजकारणात ब्राह्मणद्वेषाचे बीज पेरले.

राज्याचा मुख्यमंत्री या नात्याने, आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूर मंदिरात प्रथम पूजेचा मान मुख्यमंत्र्यांचा असतो. पवार यांनी अनेकदा हा मान उपभोगूनही त्यांना या वारीचे मर्म अजूनही समजले नसेल; तर त्यांची पूजा हा नुसताच उपचार होता, असे म्हणावे लागते. भर वारीतही पवार कोरडेच राहिले, असे म्हणावे लागते.

शरद पवार यांच्या पक्षाला सामान्य जनतेने साफ धिक्कारले आहे. राजकीयदृष्ट्या अक्षम ठरले असतानाही राज्यसभेचे सदस्यत्व मिळविण्याची लालसा काही या माणसाच्या मनातून सुटलेली नाही. राजकीय दिवाळखोरीत गेलेल्या पवार यांना अधूनमधून राजकारणात आपणही अजून आहोत, हे दाखविण्याची खुमखुमी येते. वादग्रस्त वक्तव्ये केली नाहीत, तर आपली कोणीच दखल घेणार नाही, या समजुतीमुळे ते अशी वादग्रस्त वक्तव्ये करीत असतात. पण, पवार स्वत: आणि त्यांचे विचार आजच्या पिढीसाठी कालबाह्य झाले आहेत. ते काय बोलतात, याकडे लक्षही देण्याची गरज आजच्या पिढीला वाटत नाही. इतके जरी पवार यांना समजले, तरी ते आपली उरलीसुरली शान राखून ठेवतील.





संबंधित मजकूर