मुंबई : (Sarla Bhat Murder Case) जम्मू-काश्मीर राज्य तपास यंत्रणेने (एसआयए) विशेष टाडा / पोटा न्यायालयात ७३७ पानी सविस्तर आरोपपत्र दाखल केले आहे. ज्यामध्ये जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंट (जेकेएलएफ) चा माजी प्रमुख कमांडर आणि दहशतवादी यासीन मलिक याला १९९० मधील सरला भट यांच्या अपहरण, छळ आणि हत्येचा मुख्य सूत्रधार ठरविण्यात आले आहे. १८ एप्रिल १९९० रोजी जेकेएलएफच्या दहशतवाद्यांनी त्यांची हत्या केली होती. अशी माहिती आहे की, दि. १८ मार्च २०२४ रोजी जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालकांच्या आदेशानुसार या प्रकरणाचा तपास एसआयएकडे वर्ग करण्यात आला होता.
आरोपपत्रानुसार, काश्मिरी पंडितांमध्ये दहशत निर्माण करून त्यांना खोरे सोडण्यास भाग पाडण्याच्या उद्देशाने जेकेएलएफने राबविलेल्या नियोजित हिंसक मोहिमेचा हा एक भाग होता. एसआयएच्या म्हणण्यानुसार, सरला भट या संघटनेच्या सदस्यांविरोधात माहिती पुरवत असल्याचा खोटा आरोप जेकेएलएफने केला होता. त्या काळात बहुतांश काश्मिरी पंडितांनी खोरे सोडले होते, मात्र सरला भट यांनी रुग्णालयातील सेवा सुरूच ठेवली होती.(Sarla Bhat Murder Case)
या प्रकरणातील महत्त्वाच्या पुराव्यांमध्ये प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे जबाब, संरक्षित साक्षीदारांची माहिती, वैद्यकीय व बॅलिस्टिक अहवाल, दहशतवादी संघटनेची जबाबदारी स्वीकारणारी चिठ्ठी तसेच इलेक्ट्रॉनिक पुरावे आणि नोंदींचा समावेश आहे. सध्या एका स्वतंत्र दहशतवादी निधी प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या यासीन मलिकवर अपहरण, हत्या, गुन्हेगारी कट रचणे तसेच रणबीर दंड संहिता, टाडा आणि शस्त्रास्त्र कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सरला भट यांच्यावर गोळीबार करणारा जेकेएलएफचा दहशतवादी खुर्शीद अहमद चाल्कू यालाही सहआरोपी करण्यात आले असून, या प्रकरणात मृत्यू झालेल्या जेकेएलएफच्या आणखी तीन दहशतवाद्यांचीही आरोपी म्हणून नोंद करण्यात आली आहे.(Sarla Bhat Murder Case)
काश्मिरी पंडितांकडून सातत्याने न्यायाची मागणी होत असल्याने, तीन दशकांहून अधिक काळानंतर २०२५ मध्ये एसआयएने या प्रकरणाचा तपास पुन्हा सुरू केला. या तपासाचे नेतृत्व सीआयडी/एसआयएचे अतिरिक्त महासंचालक (एडीजी) नितीश कुमार आणि एसआयएच्या पोलिस अधीक्षक (एसपी) दिव्या देव यांनी केले. तपासादरम्यान त्या काळात एसकेआयएमएसमध्ये कार्यरत असलेल्या इतर परिचारिकांचा शोध घेण्यात आला. तसेच कागदपत्रे, डिजिटल पुरावे, इलेक्ट्रॉनिक नोंदी आणि अन्य उपलब्ध माहितीचे सखोल विश्लेषण करून आरोपपत्र तयार करण्यात आले.(Sarla Bhat Murder Case)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक