मुंबई (विशेष प्रतिनिधी) - महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील अर्ध-शुष्क गवताळ प्रदेशातून दारकरी कोळी म्हणजेच ट्रॅपडोअर स्पायडर या कोळ्याच्या नव्या प्रजातीचा शोध लावण्यात आला आहे (ahilyanagar grassland). 'टिजिडिया सिंघल', असे या प्रजातीचे नामकरण करण्यात आले असून यापूर्वी टिजिडिया कुळातील कोळी हे प्रामुख्याने पश्चिम घाट आणि पूर्व घाटातील उष्णकटिबंधीय सदाहरित व पानझडी जंगलांमध्ये आढळत होते (ahilyanagar grassland). त्यामुळे या शोधातून टिजिडिया कुळातील दारकरी कोळी सापडण्याची पश्चिम घाटाबाहेरील ही पहिली नोंद ठरली आहे. (ahilyanagar grassland)
कोळ्यांचा एक गट बीळ खणून त्याच्या तोंडावर दरवाजा बनवण्यासाठी प्रसिद्ध आहे. 'ट्रॅपडोअर स्पायडर' या सामान्य इंग्रजी नावाने त्यांना ओळखले आते. बिळांना दार करण्याच्या त्यांच्या लकबीवरुन त्यांना 'दारकरी' हे मराठी नाव देण्यात आले आहे. याच दारकरी कोळ्याच्या नव्या प्रजातीचा शोध अशोका ट्रस्ट फॉर रिसर्च इन इकोलॉजी अँड द एन्व्हायर्नमेंट (एट्री) आणि भारतीय वन्यजीव संस्थानचे (डब्लूआयआय) संशोधक ऋषिकेश त्रिपाठी, प्रसाद बोल्डे आणि डॉ. अबी तमीम वनक यांनी संयुक्तपणे लावला आहे. या शोधाचे वृत्त अरॅकनोलाॅजी या आंतरराष्ट्रीय संशोधन नियतकालिकात प्रकाशित झाले आहे. संशोधनानुसार ही प्रजाती महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील वालवड गावच्या परिसरात समुद्रसपाटीपासून सुमारे ६५२ मीटर उंचीवरील अर्ध-शुष्क गवताळ प्रदेशात आढळली आहे. विशेष म्हणजे, या प्रजातीमुळे टिजिडिया या वंशाची नोंद प्रथमच सदाहरित किंवा पानझडी जंगलांऐवजी खुल्या अर्ध-शुष्क नैसर्गिक परिसंस्थेत झाली आहे. त्यामुळे या वंशाच्या ज्ञात भौगोलिक आणि पर्यावरणीय वितरणात लक्षणीय विस्तार झाला आहे.
या नव्या प्रजातीचे नामकरण संदीप सिंघल यांच्या नावावर करण्यात आले आहे. भारतातील गवताळ परिसंस्थांच्या संवर्धनासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाचा गौरव म्हणून संशोधकांनी हा सन्मान दिला आहे. हा कोळी जमिनीत खोल बिळे तयार करून राहतो. संशोधनादरम्यान तो एका मोठ्या दगडाखाली तयार केलेल्या रेशीमाने अस्तरलेल्या बिळातून मिळाला. बिळाला सुमारे १.६ सेंमी व्यासाचे प्रवेशद्वार असून सुरुवातीला किंचित तिरपे आणि नंतर उभे खाली जाणारे असे त्याचे स्वरूप होते. संपूर्ण बिळाला रेशीमाचे अस्तर असून तळाशी फुग्यासारखा स्वतंत्र कक्ष होता. संशोधकांनी काळजीपूर्वक उत्खनन करून या मादी कोळ्याला बाहेर काढले.
दुष्काळी प्रदेशात अधिवास
अहिल्यानगरमधील गवताळ प्रदेश हा दक्षिण उष्णकटिबंधीय काटेरी वनप्रकारातील अर्ध-शुष्क खुली परिसंस्था म्हणून ओळखला जातो. सुमारे १५ सेंमी उंचीच्या विरळ गवतामध्ये कुसळ, डोंगरी, मारवेल, लोफोपोगोन आणि पवना या गवतांचे वर्चस्व आढळले. याच सूक्ष्म अधिवासात ही प्रजाती वास्तव्यास असल्याचे संशोधनातून दिसून आले आहे.
कोळ्याचे वैशिष्ट्ये
- कोळ्याची एकूण लांबी सुमारे १५ मिमी असून शरीर काळसर रंगाचे आहे.
- पोटावर फिकट शेव्हरॉनसदृश नक्षी दिसते.
- इतर भारतीय टिजिडिया प्रजातींपेक्षा तिच्या प्रजनन अवयवांची रचना वेगळी असल्यामुळेच ती स्वतंत्र प्रजाती असल्याचे संशोधकांनी सिद्ध केले आहे.