मागील लेखांत वाक् (वचन/वाचिक) धारणीय वेगांबद्दल वाचले. आजच्या लेखात मानसप्रकृतीविषयी जाणून घेऊया. कारण, केवळ शारीरिकरीत्या तंदुरुस्त राहून पुरेसे नाही, तर मानसिक आणि भावनिकदृष्ट्या स्थिर असणेदेखील गरजेचे आहे.
एखादी गोष्ट आपण कशी बोलतो, तितकेच महत्त्वाचे ती गोष्ट आपण कधी बोलतो, हेदेखील आहे. रुक्ष-कठोर बोल, घालून-पाडून बोलणे, सतत अपमान करणे, हिणवणे, तुच्छतेच्या भावनेने बोलणे, इतरांना दुखावणे, टोचून बोलणे (टोमणे मारणे) याने ज्याला असे ‘बोल’ संबोधले जातात, ती व्यक्ती तर दुखावली जातेच, पण त्याचबरोबर आसपासचे लोकही सतर्क होतात आणि अशा माणसापासून चार हात लांब राहणे बरे, असे समजून त्या व्यक्तीला टाळतात.
एखाद्या व्यक्तीबरोबर संवाद, सहवास, संबंध प्रस्थापित करायचे असल्यास, त्या व्यक्तीचा स्वभाव आणि वाणी या दोन गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. समयसूचकता असणे गरजेचे. एखादी गोष्ट चार-चौघात सांगण्यासारखी नसते, ती गोष्ट उघड-उघड बोलू नये. काही वेळेस ती गोष्ट सांगण्याची वेळ आलेली नसते; अशा वेळेसही बोलू नये. हे अधिक समजून घेण्यासाठी काही उदाहरणे आपण बघू.
रुग्णालयात ‘आयसीयू’मध्ये असलेल्या व्यक्तीला भेटायला गेल्यावर आपली काळजी/चिंता/सांत्वन व्यक्त करताना नकारात्मक गोष्टी आणि भावना व्यक्त करणे, हे चुकीचेच. तसेच अनोळखी ठिकाणी/एकट्याने पहिल्यांदाच प्रवास करतेवेळी सावधगिरीने प्रवास करा, असे सांगताना वाईट गोष्टी घडल्याची उदाहरणे सांगणे हेदेखील चुकीचे. चार-चौघात पाणउतारा करणे हे तर सर्वस्वी अपमानास्पद. मग ती व्यक्ती लहान असो वा मोठी, नवविवाहित असो की वृद्ध व्यक्ती. भावना न दुखावता, चांगल्या पद्धतीने आपली काळजी, आपले मत मांडता येणे गरजेचे आहे.
मनात भाव निर्माण झाला की त्याचे उच्चारण करण्यापूर्वी ते व्यक्त केल्याने कुणाला त्रास तर होणार नाही, याबद्दल आधी चिंतावे. ते हिताचे आहे. पण, एखादी गोष्ट संवेदनशील आहे, असे वाटल्यास चार-चौघांसमोर त्याची वाच्यता न करता, मितभाषी व मृदूभाषी होऊन सांगावे.
कारण, कुठल्याही प्रसंगाला सामोरे जाण्याची पद्धत प्रत्येक व्यक्तीची भिन्न-भिन्न असते. चिंता, तणाव, राग, भीती या सगळ्यांवर मात करण्यासाठी, प्रत्येकाचे उपाय वेगवेगळे असतात. काही अति तीव्र/उग्र प्रतिसाद देतात, तर काही आपल्या कोशात जाऊन राहतात. याचे कारण म्हणजे, भिन्न-भिन्न मानसप्रकृती, म्हणजेच मनाचे त्रिदोष (दोन दोष आणि एक गुण) आहे. सात्त्विक, राजसिक आणि तामसिक. सात्त्विक गुण आहे आणि राजसिक-तामसिक दोष आहेत. प्रत्येकाने सात्त्विकतेकडे पोहोचण्याचा प्रयत्न करावा. सात्त्विक भाव हा मध्य बिंदू आहे. NEGATIVE ते ZERO ते POSITIVE अशा scale वर सात्त्विक भाव हा ZERO आहे, तामसिक गुण हा NEGATIVE आहे आणि राजसिक गुण हा POSITIVE SCALE आहे. ZERO MAINTAIN करणे, खूप कठीण असते आणि ते मिळविणे, हेच ध्येय असावे.
जशी शारीरिक प्रकृती भिन्न-भिन्न असते, तशीच मानसप्रकृतीदेखील वेगवेगळी असते. यामुळेच कुठल्याही एका परिस्थितीला सगळ्यांची प्रतिक्रियाही सारखी नसते. शारीरिक प्रकृती आणि मानसप्रकृती दोन्हींमध्ये समतोल असेल, तेव्हाच आरोग्य लाभते. केवळ शारीरिकरीत्या तंदुरुस्त राहून पुरेसे नाही, तर मानसिक आणि भावनिकदृष्ट्या स्थिर असणेदेखील गरजेचे आहे.
राजसिक गुण अधिक असल्यास चंचलता अधिक असते. रजोगुण क्रियाशीलतीचे, इच्छा-आकांक्षा, महत्त्वाकांक्षा, त्याचबरोबर आक्रमकपणा आणि रागीट स्वभावाचे द्योतक आहे. रजोगुणबहुल व्यक्ती शांत बसू शकत नाही. सतत काहीतरी क्रिया सुरू असते आणि त्याचे परिणामही चटकन मिळणे त्यांच्यासाठी गरजेचे असते. सबुरी, शांत बसणे हे त्यांना जमत नाही. स्वाभिमान गरजेपेक्षा अधिक असतो आणि त्याचबरोबर स्वार्थ, अहंकार, स्पर्धात्मक प्रवृत्ती असते. यश आणि कीत, अधिकारवाणीची यांना लालसा असते. ‘Go-Getter’ स्वभाव असतो.
मनासारखे घडले नाही, तर ते पचविण्याची क्षमता या प्रकृतीच्या व्यक्तींमध्ये कमी असते. अपयश पचविणे यांना जमत नाही/खूप कठीण जाते. आक्रमकता, सभाधीटपणा, वाक्कौशल्य, कर्मकुशलता हे सगळे गुण असतात. पण, हे ‘चूक’ किंवा ‘हारणे’ हे ऐकणे आणि स्वीकारणे यांच्यासाठी खूप कठीण असते. या गुणांची तीव्रता कमी-अधिक असू शकते.
राजसिक प्रवृत्तीच्या उलट तामसिक प्रवृत्ती असते. तमः म्हणजे अंधकार. इथे अंधकार म्हणजे अज्ञान किंवा निपचितता असा अर्थ घ्यावा.
स्वभावामध्ये आळस, जडत्व असते. कुठलेही कार्य सुरू करण्यास स्वयंप्रेरणा नसते. जसा मातीचा गोळा ज्यात ठेवू, तो तसाच राहतो, तसेच काहीसे तामसी प्रवृत्तीच्या लोकांचे आहे. अनुत्साह, आळस, अज्ञान अधिक असते. कृती करणे, कार्य करणे, काहीतरी घडविणे यासाठी जी सुप्त इच्छा असावी लागते, ती यांच्यात नसते. स्थिरता, गोष्टी आहेत तशाच राहू देणे (बदलांना सामोरे जाणे आवडत नाही), अति झोप, क्रियाशून्यता ही स्वभाववैशिष्ट्ये आहेत. यातदेखील तीव्रता कमी-अधिक असू शकते. तामसी व्यक्तींना बदल आवडत नाहीत. कार्यरत व्हायला आवडत नाही. हालचाल, क्रियाशीलता, व्यायाम, भेटीगाठी, नवनवीन आव्हाने, भांडण-तंटा इ. जमत नाही, झेपत नाही. मूर्खता, क्रियाशून्यता, अस्वच्छता, अति झोप, आळस इ. स्वभाव वैशिष्ट्ये असतात.
राजसिक आणि तामसिक
व्यक्तींचे फक्त स्वभाव भिन्न-भिन्न नसतात, तर खान-पान, शरीरयष्टी, आवड-निवड ही वेगवेगळी असते. दोन्ही प्रकारच्या स्वभाववैशिष्ट्यांमुळे होणाऱ्या त्रासांचे, आजारांचे प्रकार ही वेगवेगळे असतात. उदा. राजसिक स्वभावाच्या व्यक्तीला स्थिरता यावी, शांतता मिळावी, म्हणून काही उपाययोजना कराव्या लागतात आणि तामसिक स्वभावाच्या व्यक्तीला याउलट क्रियान्वित होण्यास प्रवृत्त करावे लागते.
प्रत्येक व्यक्तीमध्ये जसे शारीरिक तिन्ही दोष (वात, पित्त आणि कफ) उपस्थित असतात आणि ते शुद्ध असताना त्यांची कार्ये नियमित करत असतात, तसेच प्रत्येक व्यक्तीमध्ये मानस गुण (सत्त्व-रज आणि तम) देखील उपस्थित असतात आणि प्रत्येक मानसदोषाचे कार्य नियमित, नियंत्रित स्वरूपात अहोरात्र सुरू असते. (म्हणूनच रात्री झोप आणि दिवसा क्रियाशीलता होत असते, घडत असते) पण त्यांच्यात जर बिघाड झाला (म्हणजे ते कमी-अधिक झाले), तर त्याचा परिणाम मनुष्याच्या दैनंदिन जीवनावर होताना दिसतो. म्हणून संतुलन साधणे अत्यंत गरजेचे आहे. मानस आणि वाचिक धारणीय वेगांमधील बहुतांशी धारणीय वेग हे राजसिक गुणाचे आहेत. (तामसिक गुणांच्या तुलनेत) त्यामुळे उपायदेखील त्याप्रमाणेच योजावे लागतात. धारणीय वेगांच्या उपायांबद्दल पुढील लेखात जाणून घेऊया.
(क्रमशः)
(लेखिका आयुर्वेदिक कॉस्मेटोलॉजिस्ट व पंचकर्मतज्ज्ञ आहेत.)
9820286429
[email protected]