झगमगाटामागचा अंधार!

    30-Jun-2026

डोळे ही निसर्गाची सर्वांत अमूल्य देणगी. जगाचे सौंदर्य अनुभवण्यापासून ते दैनंदिन जीवनातील प्रत्येक कृतीपर्यंत, दृष्टीची भूमिका अनन्यसाधारण आहे. मात्र, आधुनिक जीवनशैली, डिजिटल उपकरणांचा अतिवापर आणि मनोरंजनाच्या बदलत्या पद्धतींमुळे डोळ्यांपुढे नवे धोके उभे राहिले आहेत. त्यांपैकीच एक म्हणजे लेझर प्रकाशामुळे होणारी रेटिनाची इजा! क्षणभराचा निष्काळजीपणा किंवा काही सेकंदांचा थेट लेझर संपर्कही, कायमस्वरूपी दृष्टिदोषाचे कारण ठरू शकतो. त्यामुळेच याचे धोके आणि घ्यावयाची काळजी यांचा आढावा घेणारा लेख...

अलीकडे लग्नसमारंभ, मैफिली, डीजे कार्यक्रम, धार्मिक उत्सव, मॉल्स, क्रीडास्पर्धा आणि विविध सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये, लेझर लाईट्सचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. ही रंगीबेरंगी किरणांची उधळण कार्यक्रमाचे आकर्षण निश्चितच वाढवते; मात्र या कृत्रिम प्रकाशामागे डोळ्यांच्या आरोग्याला असलेला गंभीर धोका दडलेला आहे. काही क्षणांसाठी थेट डोळ्यांवर पडलेला लेझर किरण, आयुष्यभरासाठी दृष्टी कमी करू शकतो. दुर्दैवाने, या धोक्याविषयी समाजात पुरेशी जागरूकता नाही. त्यामुळेच मनोरंजनासाठी वापरल्या जाणाऱ्या लेझरचा विषय आता सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने गांभीर्याने घेण्याची वेळ आली आहे.

डोळ्याच्या रचनेकडे पाहिले असता, त्याचा सर्वांत महत्त्वाचा भाग म्हणजे रेटिना. डोळ्याच्या मागील बाजूस असलेला हा अत्यंत नाजूक पडदा बाहेरून येणारा प्रकाश स्वीकारून, मेंदूपर्यंत पोहोचविण्याचे काम करतो. म्हणजेच, आपल्याला दिसणाऱ्या प्रत्येक दृश्यामागे, रेटिनाची भूमिका महत्त्वाची असते. रेटिनामध्ये लाखो प्रकाशसंवेदनशील पेशी असतात. या पेशी एकदा नष्ट झाल्या, तर त्या पुन्हा तयार होत नाहीत. म्हणूनच रेटिनाला झालेली इजा अनेकदा कायमस्वरूपी ठरते.

सामान्य दिवा किंवा सूर्यप्रकाशापेक्षा लेझर प्रकाशाची रचना पूर्णपणे वेगळी असते. लेझरमधील सर्व किरण एकाच दिशेने, एकाच तरंगलांबीचे आणि एकाचप्रकारे प्रवास करतात. त्यामुळे त्यात ऊर्जाही प्रचंड असते. यातील किरणांनी डोळ्यात प्रवेश केल्यानंतर, डोळ्यातील भिंग त्याला थेट रेटिनावर पोहोचवते. यामुळे काही सेकंदांचा संपर्कही रेटिनाच्या पेशींना भाजल्यासारखी इजा करू शकतो. विशेष म्हणजे, या प्रक्रियेदरम्यान वेदना फारशा जाणवत नाहीत. त्यामुळे अनेकांना नुकसान झाल्याची जाणीवही लगेच होत नाही.

लेझरमुळे होणाऱ्या डोळ्यांच्या इजेला ‌‘लेझर-इंड्युस्ड रेटिनल इन्ज्युरी‌’ म्हणतात. या दुखापतीमध्ये रेटिनावर सूज येऊ शकते, रक्तस्राव होऊ शकतो, प्रकाश पडलेल्या पेशीही नष्ट होऊ शकतात. तसेच, डोळ्यातील मॅक्युला भागातही छिद्र निर्माण होण्याचा धोका असतो. काही वेळा रेटिनावर कायमस्वरूपी व्रणही तयार होतात. त्यामुळे रुग्णाला धुसर दिसू लागते, वाचताना अक्षरे तुटक दिसतात, सरळ रेषा वाकड्या दिसतात किंवा नजरेसमोर कायमचा काळा डागही निर्माण होतो. काही रुग्णांमध्ये एकाच डोळ्याची दृष्टी अचानक कमी झाल्याची तक्रारही समोर येते.

गेल्या काही वर्षांत अशा रुग्णांची संख्या वाढत आहे. यामध्ये विशेषतः तरुण आणि लहान मुलांचे प्रमाण अधिक आहे. कारण, लेझरचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अनेकजण ते खेळण्यासाठीही वापरतात. लहान मुलांमध्ये गंमत म्हणून, मित्रांच्या डोळ्यांवर लेझर मारण्याचा प्रकारही केला जातो. शिवाय, लग्नसमारंभ किंवा डीजे कार्यक्रमांमध्ये वापरल्या जाणाऱ्या उच्च क्षमतेच्या लेझर लाईट्सचे किरण थेट प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर फिरवले जातात. हा प्रकार अत्यंत धोकादायक ठरू शकतो.

लेझरची तीव्रता, त्याचा रंग, किरण डोळ्यावर किती वेळ पडला आणि व्यक्तीचे डोळे किती संवेदनशील आहेत, यावर त्याला होणाऱ्या दुखापतीचे स्वरूप अवलंबून असते. विशेषतः हिरव्या आणि निळ्या रंगाचे लेझर रेटिनासाठी अधिक घातक मानले जातात. अनेक ऑनलाईन विकल्या जाणाऱ्या लेझर पॉईंटरची क्षमता, सुरक्षित मर्यादेपेक्षा जास्त असते. त्यामुळे त्यांचा वापर अधिकच धोकादायक ठरतो.

या दुखापतीची लक्षणे सुरुवातीला फार गंभीर वाटत नाहीत. त्यामुळे अनेक रुग्ण काही दिवस ही लक्षणे दुर्लक्षित करतात. मात्र, हा वेळ उपचारांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असतो. लेझरचा संपर्क आल्यानंतर दृष्टीमध्ये कोणताही बदल जाणवल्यास, तातडीने नेत्ररोगतज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक ठरते. डोळ्यांची सविस्तर तपासणी आणि ‌‘ऑप्टिकल कोहेरन्स टोमोग्राफी‌’ या आधुनिक चाचणीद्वारे, रेटिनामध्ये झालेली इजा स्पष्ट दिसते. काही रुग्णांमध्ये सूज कमी करणारी औषधेही दिली जातात. काही गंभीर रुग्णांना शस्त्रक्रियेची गरजही भासू शकते.

म्हणूनच या समस्येमध्ये उपचारांपेक्षा प्रतिबंध अधिक महत्त्वाचा आहे. कोणत्याही परिस्थितीत लेझर किरणांकडे थेट पाहू नये. कार्यक्रमांमध्ये लेझरची दिशा प्रेक्षकांच्या डोळ्यांकडे नसावी. आयोजकांनी प्रमाणित उपकरणे वापरावीत आणि प्रशिक्षित तंत्रज्ञांकडूनच प्रकाशयोजना करावी. मुलांच्या हातात लेझर पॉईंटर देऊ नयेत. लेझरकडे दुबण, कॅमेरा किंवा झूम लेन्समधून पाहणे टाळावे; कारण त्यामुळे किरणांची तीव्रता डोळ्यावर आणखी वाढते.

लेझरमुळे होणारी रेटिनाची दुखापत ही पूर्णपणे टाळता येण्याजोगी समस्या आहे. योग्य माहिती, सुरक्षा नियमांचे पालन आणि वेळेवर उपचार या तीन गोष्टी पाळल्यास अनेकांची दृष्टी वाचू शकते. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर निश्चितच व्हावा; पण तो सुरक्षिततेच्या मर्यादेत राहूनच झाला पाहिजे. डोळे हे केवळ पाहण्याचे अवयव नाहीत; ते आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग आहेत. काही क्षणांच्या झगमगाटासाठी त्यांना कायमचे नुकसान पोहोचू नये, याची जबाबदारी समाजातील प्रत्येक घटकाने स्वीकारणे, हीच आजची खरी गरज आहे.

(प्रतिनिधी)





संबंधित मजकूर