मुंबई : (Konkan Kharland Protection) भाजपा गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी आज विधानपरिषद सभागृहात रायगड जिल्ह्यातील नादुरुस्त खारभूमी बंधाऱ्या संदर्भात प्रश्न उपस्थित केला व कोकणातील हजारो हेक्टर जमिनी नापीक होण्यापासून वाचविण्यासाठी शासनाने बृहत आराखडा तयार करावा, अशी मागणी केली. त्यांच्या या मागणीला मंत्री शंभूराज देसाई यांच्याकडूनही सकारात्मक उत्तर देण्यात आले.
प्रश्नोत्तराच्या तासावेळी आ.दरेकर म्हणाले की, रायगड जिल्ह्यात समुद्राचे पाणी शेतात शिरते. हजारो हेक्टर भातशेती, नारळाच्या बागा, मच्छीमार व्यवसाय संकटात सापडतो. मातीत क्षार वाढतात आणि जमीन नापीक होते. अनेक ठिकाणी खारभूमी बंधारे आहेत. आता त्या बंधाऱ्यांची पडझड झाली आहे. वारंवार खाऱ्या पाण्याच्या संपर्कामुळे नारळाची वाढही खुंटते व उत्पादनात मोठी घटही येते. उधाणाचे पाणी रोखण्यासाठी किनारपट्टीवरील बंधाऱ्याची डागडुजी करण्याची गरज आहे. गेल्या चार वर्षांपासून विभागाकडे निधीची मागणी केली जातेय.
चार वर्षात २१ कामांपैकी १२ कामे पूर्ण झाल्याची माहिती मंत्र्यांनी लेखी उत्तरात दिली आहे. ही २१ कामे मागील चार वर्षापासून प्रस्तावित होती. त्यानंतरही अनेक कामे प्रस्तावित आहेत. अशाच गतीने काम होत असेल तर रायगड जिल्ह्यातील उर्वरित कामांना आणखी चार वर्षाची वाट पहावी लागणार आहे. रायगड जिल्ह्यातील हजारो हेक्टर जमीन नापीक होणार आहे. हा प्रश्न रायगड जिल्ह्यापुरता मर्यादित नसून रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर येथेही अशा प्रकारची जमीन नापीक होते आहे.(Konkan Kharland Protection)
यावर उत्तर देताना मंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, ज्या जिल्हानिहाय १६५ योजना मंजूर केल्या व ज्याचे क्षेत्र २२,५५८ हेक्टर आहे त्यातील १३६ कामे मार्च २०२५ पर्यंत पूर्ण केली आहेत. २२,५५८ पैकी २०,१२७ हेक्टर क्षेत्र पुनःप्रस्थापित करून लागवड योग्य केले आहे. ११ योजना ज्या प्रलंबित आहेत तेथील बहुतांशी क्षेत्र कांदळवन असल्याने तांत्रिक अडचणी समोर आहेत.
तसेच, ते पुढे म्हणाले अलिबाग तालुक्यातील ३६ योजना शासनाने घेतल्या होत्या. मार्च २०२५ पर्यंत त्यातील ३५ योजना पूर्ण केल्या आहेत.
श्रीवर्धन मधील १० योजनांना मंजुरी दिलेली आहे. त्यापैकी ९ योजना पूर्ण केल्या आहेत. अलिबाग तालुक्यातील ५,९९३ हेक्टर पैकी ५,९१५ हेक्टरचे क्षेत्र पुनःप्रस्थापित केले आहे. १२६० हेक्टर पैकी ८६० हेक्टर क्षेत्र पुनःप्रस्थापित केले आहे. ज्या निधी अभावी योजना रखडल्या आहेत त्या तपासून घेऊन प्राधान्याने निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्वस्त केले.
याचर्चेत सदस्य अनिकेत तटकरे, प्रमोद जठार, भाई जगताप यांनीही सहभाग घेतला होता.(Konkan Kharland Protection)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.