‘ग्रीन‌’ युरोप ते ‌‘ग्रिल्ड‌’ युरोप

    30-Jun-2026

एकेकाळी हवामानबदल हा भविष्यातील धोका मानला जात असे. मात्र, गेल्या काही वर्षांत जगभरात घडणाऱ्या घटना पाहिल्यावर ते वास्तव असल्याचे लक्षात येते. एका बाजूला समुद्राचे वाढते तापमान, दुसरीकडे वितळणारे हिमनग, अनियमित पाऊस, भीषण पूर, दुष्काळ आणि उष्णतेच्या लाटा या घटना आता अपवाद राहिल्या नाहीत. पृथ्वीचे सरासरी तापमान सातत्याने वाढल्याने हवामानातील टोकाची रूपे अधिक वारंवार आणि तीव्र होत आहेत. युरोपमध्ये आलेली उष्णतेची लाट, हे त्याचेच ताजे उदाहरण!

युरोप हा पारंपरिकदृष्ट्या समशीतोष्ण हवामानाचा प्रदेश. त्यामुळे तेथील शहरे, घरे, सार्वजनिक व्यवस्था आणि जीवनशैलीही या हवामानाशी सुसंगत अशीच. मात्र, यंदाच्या जून महिन्यात जर्मनी, पोलंड, झेक प्रजासत्ताक आणि फ्रान्ससह अनेक देशांमध्ये तापमानाने चाळीशी ओलांडली. जर्मनीत तर तब्बल 41.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, तर पोलंड आणि झेक प्रजासत्ताकातही विक्रमी तापमान नोंदविण्यात आले. जून महिन्यातच अशी उष्णता अनुभवास येणे, ही युरोपसाठी अत्यंत असामान्यच घटना.

या उष्णतेमुळे मानवी आरोग्यावरही मोठा परिणाम झाला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, दि. 21 जूनपासून युरोपमध्ये उष्णतेशी संबंधित सुमारे एक हजार, 300 अतिरिक्त मृत्यूंची नोंद झाली आहे. फ्रान्समध्ये झालेल्या मृत्यूंमध्ये वृद्धांचे प्रमाण सर्वाधिक आहे. उष्माघात, हृदयविकार आणि श्वसनाचे आजार असलेल्या रुग्णांसाठी तर ही परिस्थिती अधिकच धोकादायक ठरत आहे. उष्णतेमुळे विजेची मागणी वाढली असून, अनेक सार्वजनिक कार्यक्रमही रद्द करावे लागले आहेत. तर, नागरिकांना घराबाहेर न पडण्याचा सल्लाही दिला जात आहे.

या सर्वांसाठी ‌‘हीट डोम‌’ ही हवामान परिस्थिती तत्कालिक कारण म्हणून समोर आली आहे. यात वातावरणात उच्चदाबाचा पट्टा तयार झाल्यानंतर, गरम हवा एकाच भागावर दीर्घकाळ अडकून राहते. ढग तयार होत नाहीत, पाऊस पडत नाही आणि सूर्यापासून येणारी उष्णता जमिनीवर साचत राहते. त्यामुळेच तापमानात वाढ होते. हवामानबदलामुळे पृथ्वीचे मूलभूत तापमान वाढल्याने अशा घटनांची वारंवारता वाढली आहेत. पूव क्वचितच येणाऱ्या उष्णतेच्या लाटा आता जवळपास दरवषच येतात.

जागतिक आरोग्य संघटनेने युरोपला ‌‘सर्वाधिक वेगाने तापणारा खंड‌’ म्हटले आहे. जागतिक सरासरीच्या जवळपास दुप्पट वेगाने या खंडाचे तापमान वाढत आहे. यामुळेच उष्णतेच्या लाटांचा परिणामही व्यापक होत आहे. हवामानातील हा बदल केवळ तापमानापुरता मर्यादित नसून, जंगलातील आग, पाण्याची टंचाई, शेतीवरील परिणाम, जैवविविधतेचे नुकसान आणि सार्वजनिक आरोग्यावरचा वाढता ताण या सर्वच समस्या त्याच्याशी जोडल्या आहेत.

युरोपने हवामानबदलाचा वेग कमी करण्यासाठी गेल्या काही वर्षांत सातत्याने प्रयत्न केले. हरितऊर्जेचा वापर वाढविणे, कोळसा आणि इतर जीवाश्म इंधनांवरील अवलंबित्व कमी करणे, इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन आणि 2050 पर्यंत कार्बनमुक्त अर्थव्यवस्थेसाठी अनेक धोरणेही राबवली. ‌‘युरोपियन ग्रीन डील‌’सारख्या उपक्रमांमधून हवामानबदलाचा वेग कमी करण्याचाही प्रयत्न सुरू आहे. तसेच उष्णतेच्या लाटांचा सामना करण्यासाठी ‌‘हीट हेल्थ ॲक्शन प्लॅन‌’, पूर्वसूचना प्रणाली आणि सार्वजनिक आरोग्यव्यवस्थेच्या सक्षमीकरणावरही भर दिला जात आहे. मात्र, जीवाश्म इंधनांचा वापर, रस्त्यांचे काँक्रिटीकरण, जंगलतोड यांमुळेही तापमानवाढीस हातभार लागत आहे. यामुळेच बदलत्या हवामानाशी जुळवून घेणाऱ्या व्यवस्थेचा विकासही महत्त्वाचा झाला आहे. कारण, वातावरणातील बदलांचा वेग आता इतका वाढला आहे की, त्याचे परिणाम टाळणे नेहमीच शक्य नाही.

युरोपमधील ही उष्णतेची लाट हा केवळ एका खंडापुरता मर्यादित विषय नसून, वाढत्या जागतिक तापमानामुळे निसर्गाचे संतुलन कशा वेगाने बदलत आहे, याचेच ते ठळक उदाहरण आहे. हवामानबदल हा आता मानवी जीवन, सार्वजनिक आरोग्य आणि भविष्यातील विकासाचा केंद्रबिंदू झाला आहे. त्यामुळे या घटनांकडे तात्पुरत्या हवामानबदलाच्या नजरेनेच नव्हे, तर पृथ्वीच्या बदलत असलेल्या स्वरूपाच्या दृष्टिकोनातूनही पाहण्याची गरज निर्माण झाली आहे.

- कौस्तुभ वीरकर




संबंधित मजकूर