मुंबई (विशेष प्रतिनिधी) - वन्यप्राण्यांच्या आरोग्यासाठी मोठा धोका ठरणाऱ्या बाह्य परजीवींवर (एक्टोपॅरासाइट्स) नियंत्रण मिळविण्यासाठी कडुनिंबाच्या बियांच्या अर्काचा प्रभावी वापर करता येऊ शकतो, असे महत्त्वपूर्ण संशोधन समोर आले आहे (pune katraj zoo). पुण्यातील कात्रज येथील राजीव गांधी प्राणिसंग्रहालय व वन्यजीव संशोधन केंद्रात करण्यात आलेल्या अभ्यासात पाच टक्के नीम सीड कर्नल एक्स्ट्रॅक्टचा वापर केल्यानंतर बाह्य परजीवींची संख्या ६९.३३ टक्क्यांनी घटल्याचे निष्पन्न झाले आहे (pune katraj zoo). या संशोधनामुळे रासायनिक कीटकनाशकांना पर्यावरणपूरक आणि सुरक्षित पर्याय उपलब्ध होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (pune katraj zoo)
जर्नल ऑफ थ्रेटन्ड टॅक्सा या आंतरराष्ट्रीय संशोधन पत्रिकेमध्ये प्रसिद्ध झालेल्या अभ्यासातून प्राणिसंग्रहालयातील बाह्य परजीवींवर कडुनिंबाच्या अर्काचा कसा परिणाम घडतो यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. डॉ. एस. बी. केंद्रे आणि सहकाऱ्यांनी हे संशोधन केले आहे. या संशोधनात राजीव गांधी प्राणिसंग्रहालयातील 160 वन्यप्राण्यांचा समावेश करण्यात आला. यामध्ये कृष्णमृग, चितळ, बिबट्या, वाघ, आशियाई हत्ती आणि अस्वल या सहा प्रजातींचा अभ्यास करण्यात आला. संशोधनाचा मुख्य उद्देश या प्राण्यांमध्ये आढळणाऱ्या बाह्य परजीवींचे प्रमाण निश्चित करणे आणि पाच टक्के नीम सीड कर्नल एक्स्ट्रॅक्टची परिणामकारकता तपासणे हा होता. संपूर्ण संशोधन नॉन-इन्व्हेसिव्ह (Non-invasive) पद्धतीने करण्यात आले. प्राण्यांना कोणताही त्रास न देता प्रकाश सापळे, चिकट सापळे, कार्बन डायऑक्साइड आधारित कीटक सापळे तसेच विशेष लेन्सयुक्त मोबाईल कॅमेऱ्याच्या साहाय्याने परजीवींची नोंद करण्यात आली. संशोधकांनी प्रथम नऊ दिवस परजीवींची संख्या नोंदविली. त्यानंतर प्राण्यांच्या निवाऱ्यांमध्ये पाच टक्के नीम अर्काची फवारणी आणि धुलाई करून पुढील नऊ दिवस पुन्हा निरीक्षण करण्यात आले.संशोधनादरम्यान एकूण 865 बाह्य परजीवी आढळून आले. त्यामध्ये माश्यांचे प्रमाण तब्बल 93.99 टक्के, उवांचे 5.55 टक्के, तर पिसूंचे केवळ 0.46 टक्के होते. विशेष म्हणजे या अभ्यासात गोचीड किंवा माइट्स आढळले नाहीत.
नीम अर्काच्या वापरापूर्वी प्राण्यांच्या निवाऱ्यांमध्ये 662 परजीवी नोंदविण्यात आले होते. मात्र फवारणीनंतर ही संख्या 203 वर आली. म्हणजेच बाह्य परजीवींच्या संख्येत 69.33 टक्क्यांची घट झाली. ही घट सांख्यिकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे संशोधकांनी नमूद केले आहे.हत्तींमध्ये सर्वाधिक परिणामप्राण्यांच्या प्रजातींनुसार पाहिल्यास नीम अर्काचा सर्वाधिक प्रभाव आशियाई हत्तींमध्ये दिसून आला. हत्तींच्या निवाऱ्यांमध्ये बाह्य परजीवींचे प्रमाण 81.76 टक्क्यांनी घटले. त्यानंतर कृष्णमृग (74.42%), बिबट्या (72.79%), अस्वल (69.61%), चितळ (56.99%) आणि वाघ (55.93%) असा परिणाम नोंदविण्यात आला.
भविष्यातील संवर्धनासाठी महत्त्वपूर्ण
वन्यप्राण्यांच्या निवाऱ्यांमध्ये बाह्य परजीवी नियंत्रणासाठी पर्यावरणपूरक, सुरक्षित आणि किफायतशीर उपाय म्हणून 5 टक्के नीम सीड कर्नल एक्स्ट्रॅक्टचा समावेश एकात्मिक कीड व्यवस्थापन कार्यक्रमात करता येईल, असा निष्कर्ष संशोधकांनी मांडला आहे. विशेषतः प्राणिसंग्रहालये, वन्यजीव बचाव केंद्रे आणि संवर्धन प्रकल्पांमध्ये या पद्धतीचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होऊ शकतो, असेही त्यांनी नमूद केले आहे.