पालकांनो, काही बोलण्याआधी नीट ऐकून आणि समजून घ्या!


कालच नसरापूर प्रकरणाचा निकाल लागला आणि आरोपीला फाशीची शिक्षाही सुनावण्यात आली. पण, यानिमित्ताने पालकांनी, शिक्षकांनी लहान मुलांशी यांसारख्या नाजूक विषयांवर नेमका संवाद कसा साधावा, याविषयीही जाणून घेणे गरजेचे आहे. बरेचदा आपण मुलांनी त्यांच्याबरोबर काही चुकीचे घडते आहे, हे ते कसे सांगतील, यावर भर देतो. पण, अशावेळी पालकांनी आणि शिक्षकांनीही मुलांशी कशाप्रकारे संवाद साधायला हवा, हे देखील समजून घेणे तितकेच आवश्यक.

आपल्या मुलांना सुरक्षित राहण्यासाठी आपण लहानपणापासून अनेक गोष्टी शिकवतो. गरम वस्तूला हात लावू नये, रस्ता ओलांडताना दोन्ही बाजूंना पाहावे, अनोळखी व्यक्तींकडून काहीही घेऊ नये, वाहतुकीचे नियम व्यवस्थित पाळावेत, या सर्व गोष्टी आपण सातत्याने शिकवत असतो. परंतु, एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट मात्र अनेकदा शिकवायची राहून जाते, स्वतःच्या शरीराच्या सुरक्षिततेबद्दल (Body Safety) जागरूक राहणे. दुर्दैवाने, अनेकदा जेव्हा या विषयावर आपण संवाद सुरू करतो, तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो.

अनेक पालकांचे एकच म्हणणे असते, “हे आमच्या मुलाबाबत कधी घडेल, असे आम्हाला वाटलेच नव्हते. आम्ही मुलांना कधीच अनोळखी व्यक्तींकडे सोडत नाही. आमची मुले नेहमी आमच्या नजरेसमोर असतात.” परंतु, केवळ एवढी काळजी पुरेशी आहे का?

वास्तव हे आहे की, मुलांना प्रत्येक क्षणी आपल्या नजरेसमोर ठेवणे शक्य नसते. त्यामुळे बाल लैंगिक अत्याचाराचा धोका पूर्णपणे टाळणे कोणालाही शक्य नाही. अशा घटना केवळ असुरक्षित वस्त्यांमध्ये किंवा दुर्लक्षित कुटुंबांमध्येच घडतात, हा एक मोठा गैरसमज आहे. सुरक्षित परिसर, सुशिक्षित कुटुंबे, चांगल्या शाळा आणि सामाजिकदृष्ट्या सुस्थापित वातावरण या सर्व ठिकाणी अशा घटना घडू शकतात. खेळताना, शाळेत, शाळेच्या बसमध्ये, मित्रांच्या घरी, अगदी स्वतःच्या घरात किंवा अंगणातही मुलांवर अत्याचार झाल्याची अनेक उदाहरणे आढळतात.

हे वास्तव निश्चितच अस्वस्थ करणारे आहे; पण भीती निर्माण करणे हा या लेखाचा उद्देश नाही. मुलांना कायम घरात बंद ठेवणे हा त्यावरचा उपाय असू शकत नाही. त्याऐवजी त्यांना वयानुसार योग्य माहिती, स्वतःचे संरक्षण करण्याचे कौशल्य आणि विश्वासाने बोलण्याचे धैर्य देणे, हेच सर्वांत प्रभावी संरक्षण आहे. कारण, सजगता ही भीतीपेक्षा अधिक सामर्थ्यवान असते.

बाल लैंगिक अत्याचारातील सर्वांत निर्णायक क्षण कोणता असेल, तर तो अत्याचाराचा नव्हे; तर जेव्हा एखादे मूल प्रचंड भीती, गोंधळ आणि धैर्य एकवटून प्रथमच कोणाला तरी सत्य सांगण्याचा प्रयत्न करते, तो! हा क्षण मुलाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा असतो. त्यावेळी पालक, शिक्षक किंवा इतर विश्वासू प्रौढ व्यक्तीची प्रतिक्रिया मुलाच्या मानसिक पुनर्बांधणीची दिशा ठरवू शकते. म्हणूनच, जेव्हा एखादे मूल बोलते, तेव्हा त्या क्षणाचे महत्त्व ओळखणे अत्यावश्यक असते.

संवादाची सुरुवात लहानपणापासून

बालसुरक्षेचा पाया अत्याचारानंतर नव्हे, तर त्यापूर्वी घातला जातो. मुलांशी शारीरिक, वैयक्तिक मर्यादा, संमती, सुरक्षित आणि असुरक्षित स्पर्श, तसेच गुपिते यांविषयी वयानुरूप आणि मोकळेपणाने संवाद साधणे आवश्यक आहे. शरीराच्या सर्व अवयवांची योग्य नावे मुलांना माहीत असावीत. ‌‘तुझे शरीर तुझे आहे,‌’ हा संदेश लहानपणापासून दिला, तर मुलांना अयोग्य वर्तन ओळखणे आणि त्याबद्दल बोलणे अधिक सोपे जाते.

मूल बोलते तेव्हा सर्वप्रथम ऐका

अत्याचारग्रस्त मूल क्वचितच संपूर्ण घटना एका बैठकीत सांगते. ते अनेकदा संकेत देते, वर्तनात बदल दिसू लागतो, एखाद्या व्यक्तीकडे जाणे टाळते किंवा अस्वस्थता व्यक्त करते. काही मुले थेट सांगतात, तर काहींच्या शब्दांपेक्षा त्यांच्या वर्तनातून अधिक संकेत मिळतात.

मूल काही सांगत असेल, तर त्याला मध्येच अडवू नका. शांतपणे ऐका. त्याने सांगितलेले आपण योग्य समजलो आहोत, याची खात्री करून घ्या. उदाहरणार्थ, “तुला त्यांच्यासोबत एकटे राहायला आवडत नाही, बरोबर?” अशा प्रकारचा संवाद मुलाला अधिक मोकळेपणाने बोलण्यास मदत करतो. खुल्या स्वरूपाचे प्रश्न विचारा; होय-नाही अशी उत्तरे मिळतील, असे प्रश्न किंवा सूचक प्रश्न टाळा.

पहिली प्रतिक्रिया सर्वांत महत्त्वाची

मुलाने सत्य सांगितल्यानंतर प्रौढ व्यक्तीने दिलेली पहिली प्रतिक्रिया त्याच्या आयुष्यावर दीर्घकालीन परिणाम करू शकते. सर्वप्रथम मुलाला सांगा,तू मला सांगितलंस, हे खूप धाडसाचं काम आहे. मी तुझ्यावर विश्वास ठेवतो. तुझी काहीही चूक नाही. आता मी तुझ्या पाठीशी आहे. या चार वाक्यांमुळे मुलाच्या मनावरील अपराधीपणा आणि भीती मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते.

काय करू नये?

काही प्रतिक्रिया नकळत मुलाच्या जखमा अधिक खोल करू शकतात. असे प्रश्न टाळा,
आधी का नाही सांगितलं?
तू तिथे का गेला होतास?
तुला खात्री आहे का?
कदाचित तुला गैरसमज झाला असेल.

अशा प्रश्नांमुळे मुलाला आपणच दोषी असल्याची भावना निर्माण होऊ शकते. लक्षात ठेवा, मुलाची चौकशी करणे, हे पालकांचे काम नाही; ते तपास यंत्रणांचे काम आहे. पालकांचे पहिले कर्तव्य म्हणजे मुलाला सुरक्षितता, विश्वास आणि भावनिक आधार देणे.

मुलाला ‌‘नाही‌’ म्हणण्याचा अधिकार शिकवा

मुलांना लहानपणापासूनच हे शिकवणे आवश्यक आहे की, त्यांना कोणाचाही अवांछित स्पर्श नाकारण्याचा अधिकार आहे. समोरची व्यक्ती शिक्षक, प्रशिक्षक, नातेवाईक किंवा आजी-आजोबा असले, तरी अस्वस्थ वाटल्यास ‌‘नाही‌’ म्हणणे, तिथून दूर जाणे आणि विश्वासू प्रौढ व्यक्तीला सांगणे, योग्यच आहे.

गुपित आणि ‌‘सरप्राईज‌’ यातील फरक समजावून सांगा

गुन्हेगार बहुतेक वेळा मुलांना सांगतात, हे आपल्या दोघांमधले गुपित आहे. त्यामुळे मुलांना हे समजावून सांगणे गरजेचे आहे की, ‌‘सरप्राईज‌’ काही काळापुरते असते आणि शेवटी सर्वांना आनंद देते; पण अस्वस्थ करणारे गुपित मनावर ओझे निर्माण करते. असे कोणतेही गुपित आई-वडील किंवा विश्वासू प्रौढ व्यक्तीला सांगणे कधीही चुकीचे नसते.

शिक्षकांची भूमिकाही तितकीच महत्त्वाची

अनेक मुले सर्वप्रथम शिक्षकांशी किंवा शाळेतील समुपदेशकाशी बोलतात. त्यामुळे शिक्षकांनी मुलाचे म्हणणे शांतपणे ऐकावे, त्याच्यावर विश्वास दाखवावा, अनावश्यक चौकशी टाळावी आणि कायद्यानुसार आवश्यक ती कार्यवाही सुरू करावी. ‌‘ही गोष्ट कोणाला सांगणार नाही,‌’ असे आश्वासन देणे योग्य नाही; कारण मुलाच्या सुरक्षिततेसाठी संबंधित अधिकाऱ्यांना माहिती देणे आवश्यक असू शकते.

उपचाराची सुरुवात विश्वासापासून

अत्याचारानंतर केवळ कायदेशीर कारवाई पुरेशी नसते. मुलाला वैद्यकीय तपासणी, आवश्यक असल्यास मानसोपचार, समुपदेशन आणि कुटुंबाचा सातत्यपूर्ण आधार मिळणे तितकेच आवश्यक आहे. संशोधनातून असे दिसून आले आहे की, ज्या मुलांना सुरुवातीपासून विश्वास, भावनिक आधार आणि योग्य उपचार मिळतात, त्यांची मानसिक पुनर्बांधणी अधिक चांगल्या प्रकारे होऊ शकते.

अत्याचार थांबवणे ही समाजाची जबाबदारी आहे; पण जेव्हा एखादे मूल धैर्य एकवटून आपल्याशी बोलते, तेव्हा त्याच्यावर विश्वास ठेवणे, त्याला दोष न देणे आणि त्याच्या सुरक्षिततेसाठी ठामपणे उभे राहणे, ही प्रत्येक पालक, शिक्षक आणि संपूर्ण समाजाची नैतिक जबाबदारी आहे. कारण, प्रत्येक मुलाला केवळ संरक्षणच नव्हे, तर विश्वासाने ऐकून घेणारे कान आणि बिनशर्त आधार देणारे हातही तितकेच आवश्यक असतात.





प्रो. डॉ. शुभांगी रघुनाथ पारकर

प्रोफेसर डॉ शुभांगी रघुनाथ पारकर, या एमबीबीएस, एमडी, पीएचडी, ज्येष्ठ मनोचिकीत्सक आणि आंतरराष्ट्रीय संशोधक असून. केईएम हॉस्पिटल, मुंबई येथे माजी अधिष्ठाता होत्या. जागतिक पातळीवर संशोधन लेखनासाठी त्याना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. मनोविकार, मानसिक आरोग्य आणि सकारात्मक मानसशास्त्र या विषयांवर विविध वृत्तपत्रांत आणि दिवाळी अंकात विपुल लेखन करत जनजागृती करत असतात.
संबंधित मजकूर