‘एआय‌’द्वारे देव-देवतांचा अवमान आणि धर्मांतरणाचा डाव

    30-Jun-2026   

ख्रिस्ती धर्मांतरण हा भारतासमोरील एक मोठा धोका. हा धोका कालौघात अधिकच वाढत असून, मिशनरी हिंदूंना फसवण्यासाठी विविध क्लृप्त्यांचा आधार घेत आहेत. फसवून अथवा आमिषे दाखवून आजवर धर्मांतरण करत असताना, त्यांनी आता कृत्रिम बुद्धिमत्तेचाही वापर या कार्यात करण्यास सुरुवात केली आहे.

कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे ‌‘एआय‌’चा वापर करून, हिंदू देव-देवतांचा अवमान करण्याचा ‌‘उद्योग‌’ काही ख्रिश्चन संस्थांनी चालवल्याचे उघडकीस आले आहे. छत्तीसगढची राजधानी असलेल्या रायपूरमध्ये, समाजमाध्यमांवर हा प्रकार उघडकीस आला. फेसबुकवर ‌‘फ्रॉम हेवन टू अर्थ‌’ या शीर्षकाचे पान एका ख्रिस्ती संघटनेतर्फे चालवले जाते. त्यातून अनेक आक्षेपार्ह मजकूर आणि चित्रे अपलोड केली जात असल्याचा, हिंदू संघटनांचा आरोप आहे. त्यामध्ये काही वादग्रस्त चित्रफितींचाही समावेश आहे.

यासंदर्भात जे आरोप करण्यात आले आहेत त्यानुसार, ही माहिती आणि चित्रफिती कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून, तयार करण्यात आल्या आहेत. भगवान शिव आणि भगवान विष्णू हे येशू ख्रिस्त याचा उल्लेख, आपला पिता म्हणून करीत असल्याचे त्यात दाखवण्यात आले आहे. अन्य एका चित्रफितीमध्ये येशू हा भगवान रामास शिकवत असल्याचेही दाखवले गेले आहे, तर येशू हा सर्वशक्तिमान असल्याचे भगवान हनुमान सांगत असल्याचेही त्यात दाखवण्यात आले आहे. अशाप्रकारच्या अनेक चित्रफिती फेसबुकवर उपलब्ध असून, हिंदूंच्या देव-देवतांपेक्षा येशू हाच अत्यंत शक्तिशाली असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न त्याद्वारे करण्यात आला आहे. हे सर्व प्रकार लक्षात आल्यानंतर मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला असंतोष लक्षात घेऊन, पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरुद्ध तक्रार नोंदविली आहे. बजरंग दल, रामभक्त सेना आणि संत समाजाच्या सदस्यांनी या सर्व प्रकारांचा तीव्र निषेध केला असून, हिंदूंच्या धार्मिक भावना दुखविण्याचा हा प्रकार असल्याचेही म्हटले आहे. या प्रकारास जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही या संघटनांनी केली आहे.

समाजमाध्यमांवर आधुनिक तंत्रज्ञानाचा गैरवापर करून हिंदू देव-देवतांचा अवमान करण्यासाठी ते तंत्रज्ञान उपयोगात आणले जात आहे, असे बजरंग दलाचे नेते रवी वाधवानी यांनी म्हटले आहे. असे प्रकार कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाहीत. समाजमाध्यमांवरील या आक्षेपार्ह चित्रफिती त्वरित हटविण्यात याव्यात, अशी मागणीही त्यांनी केली. ही माहिती तयार करून अपलोड करण्यामध्ये जे जबाबदार आहेत, अशा फेसबुकच्या प्रशासकांसह सर्व संबंधितांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशीही मागणी त्यांनी लावून धरली आहे. या प्रकारांच्या निषेधार्थ रामभक्त सेना आणि विविध हिंदू संघटनांनी तीव्र निषेध केला. हा सर्व प्रकार अत्यंत गंभीर आहे, असे रायपूरमधील ‌‘सुरेश्वर महादेव पीठा‌’चे स्वामी राजेश्वरानंद यांनी म्हटले आहे. हिंदू देवतांसंदर्भातील अशा चित्रफिती समाजमाध्यमांवर अलीकडे सातत्याने दिसून येत आहेत. कथित ख्रिस्ती संघटनांनी आणखी एक पाऊल पुढे टाकून, हिंदू देवतांचा अपमान करण्यापर्यंतही मजल मारली आहे.

मागील शतकात वनवासी समाजाचे धर्मांतर करण्यासाठी मध्य प्रदेशातील वनवासी भागात, भगवान कृष्ण आणि येशू यांच्या एकसारख्या दिसणाऱ्या मूत वनवासींच्या समोर पाण्यात टाकल्या जात. कृष्णाची मूत दगडाची असल्याने ती पाण्यात बुडायची, तर येशूची मूत लाकडी असल्याने ती पाण्यावर तरंगायची. याद्वारे आमचा देव श्रेष्ठ असल्याचे वनवासी समाजावर ठसवले जायचे. असले फसवे प्रकार करून धर्मांतरही केले जायचे. आता धर्मांतर करण्यासाठी, ही नवी युक्ती ख्रिस्ती संघटनांनी अवलंबलेली दिसते. जागृत हिंदू समाज असे प्रकार हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही, हे असे ‌‘उद्योग‌’ करणाऱ्यांनी लक्षात घ्यायला हवे.

काशी होणार जगातील दुसरे शाकाहारी शहर

हिंदू समाजास पवित्र असलेल्या तीर्थक्षेत्रांपैकी एक असलेले काशी! भगवान विश्वनाथाची ही नगरी! जगातील प्राचीन शहरांपैकी एक! काशी विश्वनाथाचे दर्शन घेण्यासाठी, कोट्यवधी भाविक या नगरीस भेट देत असतात. सात्त्विक परंपरा असलेल्या या काशीनगरीचे रस्ते, भगवान शंकराच्या जयघोषाने फुललेले दिसतात. श्रावण महिन्यात तर विश्वनाथांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची अलोट गद असते. काशीतील रस्तेही सात्त्विक परंपरेतच मोडणारे! भगवान शंकराची ही नगरी शाकाहारी शहरात मोडणारी आहे. या शहरात सात्त्विक, शाकाहारी खाद्यपदार्थांची रेलचेल असते. वैदिक परंपरा आणि सात्त्विकतेची पाळेमुळे खोलवर रुजलेल्या काशी महानगरीचे हे स्वरूप टिकविण्याच्या दृष्टीने, तेथील प्रशासनाने पावले टाकण्यास प्रारंभ केला आहे.

जगातील पहिल्या क्रमांकाचे शाकाहारी शहर म्हणून, गुजरातमधील ‌‘पलिताना‌’ हे जैन तीर्थक्षेत्र ओळखले जाते. भगवान शंकराचीही नगरी शाकाहारी असावी, या दिशेने त्या शहराच्या प्रशासनाने कृती करण्यास आरंभ केला आहे. जून 2026 मध्ये वाराणसी महानगरपालिकेने शहरातील मांस आणि मासे विकणारी सर्वच दुकाने शहराबाहेर रामनगर, सुजाबाद, गणेशपूर, अवलेशपूर आणि शिवपूर या भागांत, पहिल्या टप्प्यात हलवण्याचे ठरविले आहे. महापौर अशोककुमार तिवारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत, या आशयाचा प्रस्तावही संमत झाला. काशी हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे शाकाहारी शहर व्हावे, या दिशेने पावले टाकली जात आहेत. काशीमधील राहणारे शिवभक्त हे प्रामुख्याने शाकाहारी आहेत. बनारसमधील घरांमध्ये विश्वनाथाचे वास्तव्य असल्याचे समजून, तेथील घरांमध्ये सात्त्विक पदार्थच बनवले जातात. याला अपवाद या नगरीस भेट देणारे पर्यटक किंवा मांसाहार करणारे भाविक यांचाच!

हा अपवाद वगळता ही नगरी शाकाहारीच आहे. जे महादेवाला अर्पण केले जाते, त्याचेच सेवन या नगरीत केले होते, असे ज्येष्ठ नागरिकांनी स्पष्ट केले. 2019 मध्ये काशीनगरीची सर्व मंदिरे आणि प्राचीन वास्तूंच्या 250 मीटर त्रिज्येच्या परिसरात, मांसविक्री किंवा सेवन करण्यास बंदी घालण्यात आली होती. 2024 मध्ये महापालिकेने काशी विश्वनाथ मंदिराच्या दोन किमी त्रिज्येच्या परिसरापर्यंत ही बंदी वाढवली. काशी विश्वनाथ मार्गिका डिसेंबर 2021 मध्ये अस्तित्वात आली. तेव्हापासूनच भक्तांचा ओघही मोठ्या प्रमाणात वाढला. तेव्हापासून आतापर्यंत सुमारे 29.8 कोटी भाविकांनी या नगरीस भेट दिली. अलीकडील दोन महिन्यांच्या कालावधीत, एक कोटीहून अधिक भाविकांनी काशीला भेट दिली. काशीची शाकाहारी नगरी म्हणून पूर्वापार ओळख आहे. कचोरी सब्जी, टमाटर चाट, बाटी-चोखा आणि त्याच्या जोडीला अनेक गोड पदार्थ उदा. रबडी, लस्सी, थंडाई, जिलेबी, तिरंगा बर्फी! या सर्वांच्या जोडीला बनारसी पान! शाकाहारी पदार्थांसाठी प्रसिद्ध असलेली ही नगरी, जगातील दुसरे शाकाहारी शहर करण्याच्या दिशेने तेथील प्रशासन वेगाने पावले टाकत आहे.

कर्नाटकमध्ये ‌‘लव्ह जिहाद‌’!

कर्नाटकची राजधानी असलेल्या बंगळुरू शहरात, 30 वर्षे वयाच्या एका हिंदू महिलेची हत्या करण्याची घटना घडली. या हत्येसंदर्भात, त्या हिंदू महिलेचा प्रियकर नाना साब नावाच्या एका मुस्लीम इसमाचे नाव घेतले जात आहे. या घटनेची माहिती कळतच, बजरंग दलाने हे सर्व प्रकरण ‌‘लव्ह जिहाद‌’चे असल्याचा दावा केला आहे. या हत्येस जबाबदार असलेल्या फरारी नाना साब यास त्वरित अटक करण्यात यावी, अशी मागणीही केली आहे. याप्रकरणी जिगनी पोलीस स्टेशनमध्ये नाना साब याच्याविरुद्ध, हत्येच्या आरोपाखाली गुन्हा नोंदविण्यात आला. हत्या करण्यात आलेल्या महिलेचे नाव अक्षता इंदरगी असे असून, ती बागलकोट जिल्ह्यातील आहे. नवऱ्याला सोडून आलेली ही महिला, जिगनी भागात एका भाड्याच्या घरात नाना साब याच्यासमवेत राहत होती. या हत्येचे वृत्त कळताच, बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशनबाहेर निदर्शने केली. हे प्रकरण ‌‘लव्ह जिहाद‌’चे असून, नाना साब यास त्वरित अटक करण्यात यावी, अशी मागणीही बजरंग दलाने केली. नाना साब यास पकडल्यानंतर आणि या हत्येसंदर्भात योग्य ती माहिती गोळा केल्यानंतर, पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. अजूनही देशाच्या विविध भागांत हिंदू तरुणी, महिला ‌‘लव्ह जिहाद‌’च्या जाळ्यात फसत आहेत, हे या उदाहरणावरून लक्षात येते.

9860020732





दत्ता पंचवाघ

एम. ए. (अर्थशास्त्र), पत्रकारिता क्षेत्रात ३३ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. ‘हिंदुस्थान समाचार’ या वृत्तसंस्थेपासून पत्रकारितेस प्रारंभ. राजकारण, समाजकारण, अर्थकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पर्यटन आदी विषयांवर विपुल लेखन. आकाशवाणी मुंबई केंद्रासाठी लेखन.
 
 
संबंधित मजकूर