बाबासाहेबांच्या स्मृतींची शोधयात्रा!

    30-Jun-2026   

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनाशी निगडित स्थळांचा शोध, त्यांचे दस्तऐवजीकरण आणि समाजापर्यंत त्यांचा इतिहास पोहोचविण्याचे कार्य करणारे डॉ. राजेश रगडे यांच्याविषयी...

पर्यटनाला इतिहास, सामाजिक परिवर्तन आणि सांस्कृतिक वारशाशी जोडत, डॉ. राजेश रगडे यांनी अध्यापन व संशोधनाची स्वतंत्र वाट निर्माण केली. ‌‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठा‌’च्या पर्यटन प्रशासन विभागात प्राध्यापक व संचालक म्हणून ते गेली तीन दशके कार्यरत आहेत. ‌‘एमएस्सी‌’ (भौतिकशास्त्र इलेक्ट्रॉनिक्स), ‌‘बीएड‌’, ‌‘बीजे‌’, ‌‘पीजीडीबीएम‌’, ‌‘एमटीए‌’ आणि पर्यटन विषयातील ‌‘पीएचडी‌’ अशी त्यांची शैक्षणिक वाटचाल असून, बहुविध शिक्षणामुळे त्यांच्या अध्यापनात इतिहास, भूगोल, संस्कृती आणि समाजजीवन यांचा समन्वय प्रकर्षाने दिसून येतो.

त्यांच्या सामाजिक कार्याची सुरुवात बालवयातच झाली. अवघ्या अकराव्या वष त्यांनी सार्वजनिक उपक्रमांत सहभाग घेण्यास सुरुवात केली. 1980 मध्ये छत्रपती संभाजीनगर येथे देशातील पहिल्या ‌‘बाल भीम जयंती उत्सव समिती‌’च्या स्थापनेत सहभागी होत त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांशी नाते दृढ केले. त्याकाळात सुरू झालेला हा प्रवास पुढे संशोधन आणि समाजप्रबोधनापर्यंत पोहोचला.

1999 मधील एका बौद्ध विवाहसोहळ्यातील अनुभवाने त्यांच्या विचारांना नवे वळण दिले. विधीसाठी भंते उपलब्ध नव्हते आणि उपस्थितांपैकी कोणालाही ‌‘मंगलगाथा‌’ म्हणता येत नसल्याने, विवाह वंदनेनेच पार पडला. धम्म आचरणाविषयी समाजात पुरेशी जागरूकता नसल्याची जाणीव त्यातून निर्माण झाली. त्यानंतर ‌‘धम्मचक्र प्रवर्तन दिना‌’पासून दर रविवारी ‌‘भगवान बुद्धास वंदन‌’ हा उपक्रम त्यांनी सुरू केला, जो आजही अविरत सुरू आहे.

‌‘आंबेडकर पर्यटन‌’ ही संकल्पना त्यांच्या कार्यातील महत्त्वाचा टप्पा ठरली. 2011 पासून या विषयावर त्यांनी संशोधन सुरू केले. बाबासाहेबांच्या जीवनाशी संबंधित स्थळांचा ऐतिहासिक व पर्यटनदृष्ट्या अभ्यास करून त्यांनी तीन संशोधन प्रकल्प पूर्ण केले. आठ महत्त्वाच्या स्थळांवरील त्यांच्या अभ्यासाची दखल विविध स्तरांवर घेण्यात आली आणि त्यातील पाच स्थळांचा पुढे ‌‘पंचतीर्थ‌’ म्हणून समावेश झाला.

2016 मध्ये बाबासाहेबांच्या 125व्या जयंती वर्षानिमित्त ‌‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठा‌’ने त्यांचे ‌‘आंबेडकर : संस्कृती, वारसा आणि पर्यटन‌’ हे संशोधनपर पुस्तक प्रकाशित केले. बाबासाहेबांच्या जीवनातील ऐतिहासिक स्थळांचा पर्यटनाच्या दृष्टीने अभ्यास करणाऱ्या मोजक्या ग्रंथांपैकी हे एक मानले जाते.

त्याच वर्षी जपानमधील ‌‘कोयासान विद्यापीठा‌’त झालेल्या 125व्या जयंती कार्यक्रमासाठी त्यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आले. तेथे त्यांनी ‌‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन व कार्य‌’ या विषयावर व्याख्यान देत भारतीय समाजपरिवर्तनाचा विचार आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर मांडला. 2021 मध्ये त्यांच्या ‌‘आंबेडकर पर्यटन‌’ संकल्पनेचा समावेश लंडनहून प्रकाशित होणाऱ्या ‌‘एन्सायक्लोपीडिया ऑफ टुरिझम मॅनेजमेंट‌’मध्ये झाला, ही त्यांच्या संशोधनाची आंतरराष्ट्रीय दखल ठरली.

संशोधनादरम्यान त्यांनी ‌‘वेटिंग फॉर ए व्हिसा‌’ या आत्मकथनात उल्लेख केलेल्या देवगिरी (दौलताबाद) येथील ऐतिहासिक हौदाचाही शोध घेतला. त्याठिकाणी मुस्लिमांकडून दलित समाजासोबत पाण्यावरून झालेल्या भेदभावाची नोंद बाबासाहेबांनी केली आहे. काळाच्या ओघात नामशेष झालेल्या या हौदाचे स्थान शोधून ते ‌‘संकल्पभूमी‌’ म्हणून विकसित व्हावे, यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. 2024 मध्ये केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनाही त्यांनी त्या स्थळाची माहिती देत त्याचे ऐतिहासिक महत्त्व स्पष्ट केले.

पर्यटन शिक्षण क्षेत्रातही त्यांचे योगदान लक्षणीय. विविध विद्यापीठांसाठी पर्यटन विषयाचे 58 अभ्यासक्रम तयार करण्यात त्यांचा सहभाग आहे. सामाजिक व आर्थिक विकासाशी संबंधित 13 संशोधन प्रकल्प त्यांनी पूर्ण केले असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली 150हून अधिक विद्यार्थी आज देश-विदेशातील विद्यापीठांमध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. अनेक विद्यार्थी पर्यटन, हॉटेल उद्योग, विमान कंपन्या आणि विविध क्षेत्रांत स्थिरावले आहेत.

व्याख्याते म्हणूनही त्यांची स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे. बाबासाहेबांच्या जीवनातील कमी परिचित घटनांवर त्यांनी 40हून अधिक व्याख्याने दिली आहेत.

यंदा ‌‘विवेक विचार मंच‌’, ‌‘बाट‌’, ‌‘आट‌’, ‌‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे‌’ आणि सहयोगी संस्थांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या राज्यस्तरीय सामाजिक न्याय परिषदेत त्यांना ‌‘छत्रपती राजर्षी शाहू महाराज सामाजिक न्याय पुरस्कार, 2026‌’ प्रदान करण्यात आला.

भविष्यात भारतात आणि परदेशात बाबासाहेबांनी भेट दिलेल्या सर्व स्थळांचे दस्तऐवजीकरण करून त्यावर अभ्यासपूर्ण लेखन करणे आणि त्यांचे विचार जागतिक पातळीवर अधिक व्यापक करणे, हा त्यांचा संकल्प. ज्ञान, संशोधन आणि सामाजिक बांधिलकी यांचा समतोल राखत त्यांचा हा प्रवास निश्चितच प्रेरणादायी ठरतो. दै. ‌‘मुंबई तरुण भारत‌’तर्फे त्यांच्या पुढील कार्यमय वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा!

9967020364





सागर देवरे

सागर देवरे, सामाजिक न्याय प्रतिनिधी, दैनिक मुंबई तरुण भारत.
शिक्षण : बी.ए. एल.एल.बी. (अभ्यासक्रम सुरू).
सामाजिक व पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत असून विविध सामाजिक, शैक्षणिक व अन्य चळवळींवर वृत्तांकनाचा अनुभव.
समुदायाधारित प्रश्नांवर सातत्याने अभ्यासपूर्ण लेखन.
सामाजिक न्याय, हिंदू बहुजन समाजाचे प्रश्न व विद्यार्थी चळवळींवर विशेष लेखन.
संबंधित मजकूर