डोंबिवली : डोंबिवलीतील काटई नाक्याजवळ एमआयडीसीची ग्रामीण भागाला पाणीपुरवठा करणारी १७७२ व्यासाची मुख्य पाईपलाईन शुक्रवारी सहा वाजण्याच्या सुमारास फुटल्याने हजारो लीटर पाणी वाया गेले आहे. विशेष म्हणजे या आठवडय़ात पाईपलाईन फुटण्याची ही तिसरी घटना आहे. यापूर्वी दोनदा छोटी पाईपलाईन फुटली होती. पण मोठी पाईपलाईन फुटल्याने रस्त्याला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले होते. रस्त्यावरील वाहने पाण्यात बुडल्याने वाहने जागीच्या जागी थांबविण्यात आली होती, अशी माहिती परिसरातील नागरिकांकडून देण्यात आली आहे.
पाईपलाईन फुटल्याची माहिती मिळताच एमआयडीसीकडून पाणीपुरवठा त्वरीत बंद करण्यात आला. पण पाण्याचा वेग जास्त असल्याने हे पाणी पाईप लाईन लगत असलेल्या सात ते आठ घरात शिरल्याने त्यांचे नुकसान झाले आहे. ही पाईपलाईन काटई नाका वैभव नगरीजवळ फुटली आहे. एमआयडीसीने पाणी तात्काळ बंद केले असले तरी पाईपलाईनमध्ये मोठय़ा प्रमाणावर पाणी असल्याने हे पाणी रस्त्यावर सुमारे दोन तास वाहत होते. जोर्पयत पाईन लाईन निकामी होत नाही तोर्पयत दुरूस्तीचे काम करता येणार नसल्याने दुरूस्तीला १२ तासाचा कालवधी लागणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. यामुळे एमआयडीसी फेज दोन आणि संपूर्ण गावे यांचा पाणीपुरवठा बंद झाला आहे, एमआयडीसी चे कार्यकारी अभियंता संजय ननावरे यांनी सांगितले.