जपानच्या एक पाऊल पुढे भारत...

    13-May-2024
Total Views |
India all set to overtake Japan as 4th largest economy by 2025

२०२५ मध्येच भारत जपानला मागे टाकत, चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था म्हणून ओळखला जाईल, असा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने नुकताच व्यक्त केला. २०२६ मध्ये भारत अशी कामगिरी करेल, असे नाणेनिधीने यापूर्वी म्हटले होते. जपानमध्ये आलेली मंदी आणि भारताने सुधारणांचा राखलेला वेग यामुळे भारत चौथ्या स्थानावर झेप घेणार आहे. त्याविषयी...
 
आतंरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अंदाजानुसार, २०२५ मध्ये भारताचे सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) ४.३४ ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचेल, तर जपानचा जीडीपी ४.३१ ट्रिलियन डॉलर असेल. यामुळे, भारत पुढील वर्षापर्यंत जपानला मागे टाकून जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होईल, असे नाणेनिधीने म्हटले आहे. अशी कामगिरी भारत २०२६ मध्ये करेल, असे नाणेनिधीने यापूर्वी म्हटले होते. मात्र, आता भारत पुढील वर्षी जपानला मागे टाकत चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था म्हणून ओळखला जाईल, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. भारताच्या वाढीबरोबरच जपानी येनमध्ये झालेली घसरण यासाठी कारणीभूत आहे. भारत जपानला मागे टाकणार, असे नाणेनिधीने जाहीर केल्यानंतर, स्वाभाविकपणे जपानला याचा धक्का बसला. २०१० पर्यंत दुसर्‍या क्रमांकाची अर्थव्यवस्था असा ज्या जपानचा लौकिक होता, त्या जपानची गेल्या काही वर्षांत झपाट्याने घसरण होत असून, आता तो पाचव्या स्थानावर फेकला जाणार आहे. अमेरिका, चीन, जर्मनी, भारत आणि त्यानंतर जपानची क्रमवारी असेल.
 
२०१२ मध्ये शिंजो आबे जेव्हा पंतप्रधान झाले, तेव्हा त्यांनी जपानच्या अर्थव्यवस्थेचा वेग कायम ठेवण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना राबविल्या. जपानी विकासाला चालना देण्यासाठी त्यांनी कार्यक्रमही हाती घेतला. या योजनांना ‘अ‍ॅबेनॉमिक्स’ असे नाव देण्यात आले. ‘बँक ऑफ जपान’कडून आर्थिक सुलभता आणि सरकारी खर्चाद्वारे वित्तीय प्रोत्साहन या त्यांच्या धोरणांना यश आले. तथापि, संरचनात्मक सुधारणा हव्या त्या वेगाने झाल्या नाहीत. त्यामुळे हे उपाय जपानला सावरण्यात कमी पडले. ‘अ‍ॅबेनॉमिक्स’च्या कल्पनेत व्यवसायांच्या वाढीला चालना देणे हाही एक भाग होता. मात्र, उत्पादकता वाढविण्यासाठी संरचनात्मक सुधारणांची आवश्यकता होती. वृद्ध होत असलेल्या जपानी लोकसंख्येत बदलांना विरोध केला जातो. परिणामी, सुधारणा प्रत्यक्षात येऊ शकल्या नाहीत. काही विश्लेषकांच्या मते, महामारी आणि रशिया-युक्रेन युद्धाच्या जपानी अर्थव्यवस्थेवर विपरित परिणाम झाला. त्यातून जपान अद्यापही सावरू शकलेले नाही.
 
‘ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक कोऑपरेशन अँड डेव्हलपमेंट’ने जागतिक आर्थिक विकासाच्या दृष्टिकोनावर दि. २ मे रोजी आपला अहवाल प्रसिद्ध केला. यात जगाचा विकासदर ३.१ टक्के राहील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मात्र, तीन महिन्यांपूर्वी जपानच्या विकासदराचा अंदाज एक टक्क्यावरून केवळ ०.५ टक्क्यांवर आणला आहे. मे महिन्यात भारताचा विकासदर ६.६ टक्के राहील, असा अंदाज या संस्थेने व्यक्त केला आहे. म्हणजेच, जागतिक वाढीच्या तुलनेत भारताची वाढ जास्त गतीने होत असताना, जपानी वाढीचा वेग मात्र अधिक मंदावणार असल्याचे हा अहवाल सांगतो. जपानमध्ये अधिकृतपणे मंदी आल्याचे यापूर्वीच जाहीर करण्यात आले आहे. काही विश्लेषकांच्या मते, विकसित अर्थव्यवस्थांच्या वाढीचा वेग भारतासारख्या उदयोन्मुख अर्थव्यवस्थांच्या तुलनेत कमी असतो. उदयोन्मुख बाजारपेठांपेक्षा विकसित देशांची वाढ तुलनेने कमी दराने होणे नैसर्गिक आहे.
 
पायाभूत सुविधांमध्ये भारताची गुंतवणूक आणि वेगाने वाढणारा मध्यमवर्ग यांची बरोबरी जपान करू शकत नाही. गेल्या १२ वर्षांत युरोच्या तुलनेत जपानी येनच्या घसरणीमुळे जर्मनीने जपानला मागे टाकले आहे. येनमध्ये ४० टक्के घसरण झाल्यामुळे, विनिमय दर ५० वर्षांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. कमकुवत येन हे जपानसमोरील सर्वात मोठे आव्हान आहे.जपानी अर्थव्यवस्थेचा वेग मंदावला आहे, हे मान्य केले तरी, भारताच्या वाढीचे महत्त्व त्यामुळे कमी होत नाही. भारतीय अर्थव्यवस्था वाढीच्या दिशेने असून, जीडीपी मजबूत वेगाने वाढत आहे. २०२१ मध्ये इंग्लंडला मागे टाकत भारत आज पाचव्या स्थानावर आहे. ही वाढ अनेक घटकांमुळे आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीत भारताची वाढ ८.४ टक्के दराने झाली. जगातील सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असा भारताचा लौकिक आहे. चलनवाढ तसेच महागाई दर नियंत्रणात ठेवण्यासाठी रिझर्व्ह बँकेने केलेल्या उपाययोजना प्रभावी ठरल्या.

पोलाद, सिमेंट आणि ऑटोमोबाईल उत्पादन यांसारख्या क्षेत्रांमध्ये दुहेरी वाढ झाली असून, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांमध्ये भारत ‘जागतिक नेता’ म्हणून उदयास आला आहे. भारतातील ई-व्यवहार १३४ अब्जपर्यंत वाढले असून, जागतिक डिजिटल पेमेंट्सच्या ते ४६ टक्के इतके आहेत. जन-धन, आधार आणि मोबाईल यासारख्या कार्यक्रमांनी आर्थिक समावेशात लक्षणीय वाढ केली. जपानमध्ये वृद्ध लोकसंख्येमुळे कर्मचार्‍यांची संख्या कमी होत असून, सामाजिक सुरक्षा खर्चात वाढ झाली आहे. वाढीचा कमी झालेला दर आणि चलनवाढीच्या दबावामुळे, जपान मंदीचा सामना करत आहे. २.१ लाख कोटींचा विक्रमी जीएसटी महसूल, तीन तिमाहीत राखलेला वाढीचा आठ टक्के वेग, २७ देशांसोबत रुपयामध्ये होत असलेला व्यापार, पोलाद, सिमेंट आणि वाहन निर्मिती क्षेत्रात झालेली दुहेरी आकडी वाढ ही भारतीय अर्थव्यवस्थेची काही ठळक वैशिष्ट्ये म्हणता येतील.

‘आंतरराष्ट्रीय नाणेनिधी’ने २०२४ साठी भारताच्या वाढीचा अंदाज ६.५ टक्क्यांवरून ६.८ टक्के इतका वाढविला आहे. तसेच, वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असे संबोधित भारताच्या वेगावर शिक्कामोर्तब केले आहे. आर्थिक महासत्ता म्हणून भारताच्या उदयाला मजबूत आर्थिक मूलभूत तत्त्वे, क्षेत्रीय वाढ आणि डिजिटल पायाभूत सुविधा आणि आर्थिक समावेशन कारणीभूत ठरत आहे. जपानला त्याचवेळी लोकसंख्याशास्त्रीय आणि वित्तीय आव्हानांचा सामना करावा लागत असल्याने, त्याच्या वाढीला मर्यादा आल्या आहेत. भारताने भांडवली खर्चासाठी सर्वोच्चतरतूद केली असून, पायाभूत सुविधांसाठी भारत ज्या प्रमाणात निधीची तरतूद करत आहे, ते पाहता भारताचा वाढीचा वेग येत्या काळात नवनवे विक्रम प्रस्थापित करेल, हे स्पष्ट होते. भारताने सुधारणांची अंमलबजावणी सुरू ठेवल्याने, तसेच लोकसंख्याशास्त्रीय लाभांशाचे फायदा घेतल्याने, २०२५ मध्ये तो जपानला मागे टाकेल, हे निश्चित.



संजीव ओक