नाशिक : दिंडोरी तालुक्यातील जोपुळ येथील ‘यशवंत पाटील एज्युकेशन सोसायटी संस्था’ संचलित आश्रमशाळेतील इयत्ता सहावीत शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. संकेत ज्ञानेश्वर गालट असे विद्यार्थ्याचे नाव आहे. या विद्यार्थ्यास दोन दिवसांपासून खोकला असल्याचे शाळा प्रशासनांकडून सांगण्यात आले.
पेठ तालुक्यातील सावरणा येथील संकेत गालक हा इयत्ता सहावीत शिकत होता. गेल्या 10-12 दिवसांपासून तो आजारी असल्याचे त्याच्या मोठ्या भावाने सांगितले. त्याच्या चेहर्यावर सूजही आली असतानाही तो वर्गात शिकत होता. मात्र याकडे दुर्लक्ष करत विद्यार्थ्यांचे शिक्षण चालू ठेवले. अशातच 13 तारखेला या विद्यार्थ्यास खेडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी करता घेऊन गेले. त्यानंतर पुन्हा त्यास निवासी शाळेत घेऊन आले. मुलगा 13 दिवसांपासून आजारी असताना एकदाही शाळा प्रशासनाने कुटुंबीयांना कळवले नसल्याचा आरोप मुलाच्या घरच्यांनी केला आहे. मुलाचेे निधन झाले त्या दिवशीही गालट कुटुंबीयांना उशिरा कळविण्यात आल्याचे नातलगांचे म्हणणे आहे.
शाळेतील तिघांचे निलंबन
दरम्यान, या प्रकरणी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेने देखील निवेदन दिले आहे. या निवेदनानुसार शाळेत आश्रमशाळेतील मुख्याध्यापिका संध्या भास्कर साखरे, शिक्षक भरत रमाकांत गुळवे व अधीक्षक एकनाथ दाजी भामरे यांच्या निष्काळजीपणामुळे संकेत गालट याला जीव गमवावा लागला. वेळीच उपचार न मिळाल्याने संकेतचा जीव गेला असल्याचे म्हटले आहे.