राष्ट्रहिताचे कार्य घडावे म्हणून...

    25-Oct-2022   
Total Views |
adv.bharati gujrathi
 
सत्य, न्याय आणि धर्म, समाजासाठी आहे त्या स्तरावर ठाम उभे राहून काम करणार्या अॅड. भारती मिलिंद गुजराथी. त्यांच्या विचारकार्याचा आणि एकंदर जीवनसूत्राचा मागोवा घेण्याचा केलेला हा प्रयत्न...
 
अॅड. भारती गुजराथी या राष्ट्र सेविका समितीच्या ठाणे शहर उत्सव प्रमुख असून ‘राजमाता जिजाबाई ट्रस्ट’च्या विश्वस्त आहेत. कळवा, ठाणे येथील ‘ज्ञानप्रसारणी शाळे’च्या संचालिका आहेत, तसेच राजगुरूनगर येथील ‘स्वामी विवेकानंद ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था’ या संस्थेच्या संचालिकाही आहेत. अॅड. भारती गुजराथी स्वत:ला भाग्यवान समजतात. ते का? तर त्या संपन्न, संस्कारी कुटुंबातून आल्या किंवा उच्चशिक्षण घेऊन चांगले समाजकार्य करत आहेत किंवा धर्मकारण, समाजकारण, राजकारण या सगळ्याच क्षेत्रातला त्यांच्याकडे यथोचित अनुभव आहे म्हणून नाही.
 
 
तर 90च्या दशकात काश्मिरी पंडितांवर अनन्वित अत्याचार झाले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून ‘काश्मीर बचाव आंदोलन’ करण्यासाठी देशभरात युवक-युवती खुद्द काश्मीरमध्ये गेले होते. तसेच त्यानंतर अयोध्येमध्ये रामजन्मभूमी आंदोलन झाले, तेव्हा प्रभू श्रीरामचंद्रांवर आस्था असणारे अनेक जण तेथे गेले. या दोन्ही आंदोलनांमध्ये भारती सक्रिय सहभागी झाल्या होत्या. या जन्मी या दोन्ही आंदोलनाचे सार्थक झालेले पाहणे त्यांच्या दैवात घडले, म्हणून त्या स्वत:ला भाग्यवान समजतात.
 
 
अॅड. भारती गुजराथी या मूळच्या भारती जोशी. त्यांचे वडील दिगंबर आणि आई मंदाकिनी मूळ नागपूरचे, पण कामानिमित्त पुण्यात स्थायिक झालेले. दिगंबर हे राजगुरू नगर येथील आदिवासी शिक्षण संस्थेचे मुख्याध्यापक आणि रा. स्व. संघाचे स्वयंसेवक, तर मंदाकिनी या शिक्षिका आणि राष्ट्र सेविका समितीच्या सेविका. जोशींचे घर म्हणजे राजगुरू नगरवासीयांचे हक्काचे घर. देशप्रेम, समाजभान आणि समरसता यांचे बाळकडू घरातूनच भारती यांना मिळाले. जातपात-विषमता यांना या जोशींच्या घरात थारा नव्हता. भारती या लहानपणापासूनच समितीच्या शाखेत जात. ‘मी राष्ट्र सेविका समितीच्या ध्येयाशी कार्याशी एकनिष्ठ राहीन,’ हे वचन त्यांनी समितीच्या वंदनीय ताई आपटे यांना दिले होते. ते वचनच भारती यांच्या आयुष्याचे सूत्र बनले. त्यामुळेच पुढे अनेक आयामात सहज यश मिळत असतानाही भारती यांचे मन रमले ते केवळ समितीची सेविका म्हणून कार्य करताना...
 
 
गरीब आणि न्यायापासून वंचित असणार्या घटकांना न्याय मिळवून देणे गरजेचे आहे, असे त्यांना लहानपणापासून वाटे. त्यामुळेच त्यांनी वकील व्हायचे ठरवले. पुण्यात त्यांनी ‘एलएलबी’चे शिक्षणही घेतले. शिक्षण घेतल्यानंतर त्या एक वर्ष अहमदनगरमध्ये समितीच्या विस्तारक म्हणून जबाबदारी स्वीकारली. नगरच्या खेड्यापाड्यातील महिलांना समितीशी जोडणे, त्यांच्या आणि कुटुंबांच्या उत्थानासाठी सहकार्य करणे अशी अनेक कामे चौकटीबाहेर जाऊन त्यांनी केली. तो काळ म्हणजे, भारतातील राजकीय, सामाजिक आणि धार्मिकतेमध्ये प्रचंड स्थित्यंतरे आणणारा काळ होता. या सगळ्या वेगवान घडामोडींमध्ये भारतींनी सक्रिय सहभाग घेतला. हेतू हाच की, देशाच्या प्रगतीसाठी असणार्या प्रत्येक कार्यात, प्रत्येक क्षणात आपला खारीचा वाटा असावा म्हणून...
  
 
पुढे भारतींनी राजगुरू नगरामध्ये वकिलीची ‘प्रॅक्टिस’ सुरू केला. सत्य-न्याय यापलीकडे काही नसतेच, यावर आधारित त्यांची ’प्रॅक्टिस.’ घरगुती हिंसा ते ‘लव्ह जिहाद’ अशा अनेक घटनांमध्ये अॅड. भारती यांनी महिलांना न्याय मिळवून दिला. या काळात कायदे आणि प्रत्यक्ष समाज यांचा त्यांना चांगलाच अभ्यास झाला. तसेच समाजाच्या नजरेतून कायदाही त्यांना अनुभवता आला. पुढे त्यांचा विवाह समविचारी असलेल्या अॅड. मिलिंद गुजराथी यांच्याशी झाला. त्याचकाळात भारती या राजगुरू नगर दक्षिण भागातून ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आल्या. तत्त्व जपत जीव तोडून त्यांनी नगराचा विकास व्हावा म्हणून काम केले. पण, या क्षेत्रात त्यांचे मन रमले नाही. त्यामुळे यांनी पुन्हा निवडणूक लढवली नाही.
 
 
 
त्यांनी वकिलीच्या ‘प्रॅक्टिस’कडे लक्ष दिले. समाजातल्या तळागळातल्या लोकांसाठी नाममात्र प्रसंगी नि:शुल्कही न्याय मिळवून देण्यासाठी त्या काम करू लागल्या. सासू-सासरे पती यांची साथ होतीच. पुढे भारती यांचे पती कामानिमित्त ठाण्याला आले. दुर्दैवाने सासू-सासरे देवाघरी गेले. पतीसोबत ठाण्यात जावे की पुण्यातच राहावे? असा प्रश्न अॅड. भारती यांना पडला. राजगुरू नगमध्ये अॅड. भारती यांच्या सासरचे आणि माहेरचे नव्हे, त्यांचे स्वत:चीही एक चांगली मोठी प्रतिष्ठित ओळख. सगळाच जम बसलेला. त्यांचे पतीही म्हणत की, ”सगळे सोडून इथे ठाण्यात स्थायिक व्हावे, तर तुला शुन्यातून सुरुवात करावी लागेल.” मात्र, भारती यांनी निर्णय घेतला आणि त्या मुलींना घेऊन ठाण्यात आल्या. सुरुवातीला कठीण गेले. पण, नंतर इथे राष्ट्र सेविका समितीच्या प्राची पाटील, प्रतिभा नातू यांची भेट संपर्क झाला. त्या संपर्कातून त्या पुन्हा पुन्हा समितीच्या कामात आल्या आणि ठाणे शहराशी त्यांची नाळ जुळली.
 
 
अॅड भारती म्हणतात की, ”आम्ही म्हणतो-
 
मातृभू तुम परम प्रिय हो,
सत्य चित्,आनंद माँ।
 
तर पुढील काळात राष्ट्र सेविका समितीची प्रचारक म्हणून काम करावे आणि आपल्या हातून राष्ट्रहिताचे समाजहिताचे कार्य व्हावे हेच माझे ध्येय आहे.”
 
राष्ट्र सेविका समितीच्या सेविका अॅड. भारती गुजराथी यांच्या ध्येयास शुभेच्छा!
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.