मुंबई : मुंबईत पावसाचा जोर वाढला असुन कोसळधारा सुरु झाल्या आहेत. परिसरात अनेक ठिकाणी पाणी साचायला सुरुवात झाली आहे. मुंबईतील कुर्ला, चेंबूर, विक्रोळी, अंधेरी, दादर परिसर पाण्याखाली गेला आहे. दुपारी १ ते २ च्या दरम्यान कुर्ला येथे मुसळधार पाऊस झाला. त्या एक तासात कुर्ला येथे ३६ मिमी पाऊस झाला. यामुळे कुर्ला येथील हार्बर डाऊन लाईन वर पाणी साचलं. त्यामुळं डाऊन हार्बर लाईन वडाळा ते मानखूर्द रेल्वे सेवा बंद करण्यात आली आहे.
कुर्ला येथील हार्बर डाऊन लाईनवर पाणी साचल्याचं समोर आलं आहे. अप हार्बर आणि मुख्य लाइन सुरु असल्याची माहिती रेल्वे विभागानं दिली आहे. हिंदमाता येथील वाहतूक नायगाव मार्गे वळवण्यात आली आहे. मध्य आणि हार्बर रेल्वेवरील वाहतूक ५ ते १५ मिनिटांनी उशिरा धावत आहे. पश्चिम रेल्वे वाहतूक वेळेवर सुरु आहे.