मुंबई : (Devendra Fadnavis) मंत्री नरहरी झिरवळ यांचे व्हिडीओ गंभीर असून त्याची सत्यता पडताळून त्यावर योग्य ती कारवाई होईल, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तसेच लॉकडाऊबाबत अफवा पसरवणाऱ्यांना कारवाईचा इशाराही त्यांनी दिला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "नरहरी झिरवळ यांनी मला फोनवरून संपर्क करून सांगितले की, हा व्हिडिओ ३-४ व्हिडिओ जोडून चुकीच्या पद्धतीने तयार केलेला आहे. त्यामुळे याची चौकशी झाली पाहिजे. त्यांनी तात्काळ तक्रार दाखल करावी, असा सल्ला मी त्यांना दिला. या व्हिडिओची शहानिशा करण्यात येईल. या परिस्थितीची सत्यता पडताळून त्यांच्या पक्षाच्या नेत्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि आम्ही मिळून योग्य निर्णय करू. मागच्या काळात त्यांच्या कार्यालयात घडलेल्या घटनेची पूर्ण चौकशी झाली. त्यामध्ये कुठेही झिरवळ यांचा संबंध आला नाही. आता जे व्हिडीओ समोर आले ते गंभीर असून त्याची सत्यता पडताळणे गरजेचे आहे. ते व्हिडीओ सत्य असतील तर त्यावर योग्य ती कारवाई होईल."
भारत सरकारचे आभार
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारत सरकारने युद्धामुळे वाढलेल्या तेलाच्या भावांचा परिणाम सामान्य ग्राहकावर होऊ नये, यासाठी प्रति लीटर पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्क १० रुपयांनी कमी केले आहे. त्यामुळे कच्च्या तेलाच्या वाढलेल्या भावाचा परिणाम आता तेल कंपन्या आणि भारत सरकार सहन करणार आहे. सामान्य ग्राहकाला अधिकच्या दरात पेट्रोल-डिझेल घ्यावे लागणार नाही. याबद्दल मी भारत सरकार आणि पंतप्रधान मोदी यांचे आभार मानतो. आपल्या आजूबाजूच्या देशांमध्ये जवळपास शट डाऊनची स्थिती आलेली आहे. पाकिस्तान, श्रीलंका, बांग्लादेश इथल्या लोकांनी गॅस आणि पेट्रोलच्या कमतरतेमुळे ऑफिस, संस्था बंद केल्या आहेत. अशावेळी भारत सरकारने अतिशय उत्तम नियोजन करून आपल्याकडे पेट्रोल-डिझेल आणि घरगुती गॅसची कमतरता होऊ दिली नाही," असेही ते म्हणाले.
"अफवांच्या आधारावर ग्राहकांनी विनाकारण पेट्रोल पंपावर रांगा लावू नये. आपल्याकडे एक महिन्याचा पेट्रोल डिझेलचा पूर्ण साठा आहे. पण विनाकारण जास्तीचे पेट्रोल भरून घेतल्यास त्यातून मागणी आणि पुरवठ्यावर ताण निर्माण होऊन कृत्रिम टंचाई निर्माण होते. अशी टंचाई निर्माण होऊ नये यासाठी ग्राहकांनी नेहमी जसे पेट्रोल डिझेल भरतो तसेच भरावे. व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा २० टक्क्यांवरून ४० टक्क्यांवर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर तो ५० टक्क्यांवर जातो आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे. ज्याप्रकारे भारताची मुत्सद्देगिरी सुरु आहे त्यादृष्टीने व्यावसायिक गॅस पुरवठादेखील सुरळीत होईल," असेही त्यांनी सांगितले.
...तर फौजदारी कारवाई होणार
"लॉकडाऊन लागणार नाही, हे केंद्र सरकारने जाहीर केले आहे. जे लोक अशा अफवा पसरवत आहेत त्या सगळ्यांवर फौजदारी कारवाई केली जाईल. कुठल्याही सोशल मीडिया व्यासपीठावर अशी खोटी माहिती पसरवणे किंवा व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून खोटी पोस्ट फॉरवर्ड केली तरी तो गुन्हा ठरेल. हा गुन्हा करणाऱ्या प्रत्येकावर फौजदारी कारवाई होऊ शकते. त्यामुळे कुणीही खोट्या अफवा पसरवून नका अन्यथा कायदेशीर कारवाई होईल," असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला.
हे वाचलत का? - Balendra Shah: बालेंद्र शाह बनले नेपाळचे सर्वात तरुण पंतप्रधान! जेन-झींच्या नेतृत्वाचा उदय
...त्यांचे त्यांना लखलाभ
उबाठा गटात सुरु असलेल्या अंतर्गत कलहावर बोलताना ते म्हणाले की, "त्यांचा पक्ष इतका छोटा झाला आहे की, तिथे काय चालते याकडे लक्ष देण्यासाठी माझ्याकडे वेळ नाही. त्यामुळे ते आपापसांत भांडो, मारामाऱ्या करो, एकमेकांच्या झिंज्या उपटो किंवा कॉलर पकडो, त्यांचे त्यांना लखलाभ आहे. आम्हाला महाराष्ट्र चालवायचा आहे."
भोंदुबाबा प्रकरणातील पीडित महिलांना संरक्षण
"भोंदूबाबा अशोक खरातसोबत कुणाचे फोटो-व्हिडिओ येतात, यावरुन गोष्टी ठरवता येणार नाही. फोटो आणि व्हिडीओ आलेल्यांचा यात सहभाग असेल तर कारवाई होईल. याप्रकरणात कुणालाच सोडण्याचे कारण नाही. आम्ही खोलवर जात असून अनेक नवीन गोष्टी लक्षात येत आहेत. येत्या काळात आणखी एफआयआर होण्याची शक्यता आहे. काही पीडित आणि महिला पुढे येत आहेत. तर, काही लोक आर्थिक फसवणूक झाली म्हणून पुढे येत आहेत. पण या प्रकरणात ज्या दुर्दैवी महिला पीडित आहेत, त्यांचे व्हिडिओ काही लोकांनी सोशल मीडियावर टाकले असून आम्ही ते हटवले आहेत. ज्या ज्या लोकांनी असे व्हिडीओ अपलोड केले असतील त्यांच्यावर फौजदारी कारवाई केली जाईल. यातील पीडित महिलांना पूर्ण संरक्षण दिले आहे. यातील सर्वात महत्वाचे संरक्षण गोपनियतेचे आहे. पण काही लोक ही गोपनियता भंग करण्याचा प्रयत्न करत असून त्यांना फौजदारी कारवाईला सामोरे जावे लागेल," असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.