Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan : साताऱ्याच्या संमेलनात ८ कोटी, ७२ लाख रुपयांची पुस्तक विक्री

06 Jan 2026 12:15:32
 Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan
 
पुणे : (Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan) सातारा येथे आयोजित करण्यात आलेले शतकपूर्व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अनेक गोष्टींनी वैशिष्ट्यपूर्ण ठरले आहे. चार दिवसात साताऱ्यासह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तसेच देश-विदेशातून जवळपास १० लाख साहित्यप्रेमींनी संमेलनास भेट दिली असून जवळपास आठ कोटी ७२ लाख रुपयांची पुस्तकविक्री झाली आहे. पुस्तक दालनाचे यंदाचे आणखी एक वेगळेपण म्हणजे पुस्तकांचा आणि पुस्तक खरेदासाठी येणाऱ्या साहित्यरसिकांचा तब्बल २५ कोटींचा तर फर्निचर आणि इतर साहित्याचा चार कोटी ३० लाख रुपयांचा विमा उतरविण्यात आला होता. संमेलनाच्या ९९ वर्षांच्या इतिहासात पुस्तके, पुस्तक दालन आणि पुस्तक खरेदीसाठी येणाऱ्या साहित्यप्रेमींचा विमा उतरविणारे हे पहिलेच संमेलन ठरले आहे, अशी माहिती अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली. (Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan)
 
हेही वाचा : bhaiyyaji joshi : दुर्गानंदजजींच्या जगण्यावागण्यात संघ होता : भैयाजी जोशी 
 
संमेलनात पुस्तक, ग्रंथविक्री होत नाही, अशा तक्रारी गेल्या अनेक वर्षांपासून प्रकाशक आणि पुस्तक विक्रेते करीत होते. यावर यंदा तोडगा काढण्यात आला आणि तो यशस्वीही झाला. संमेलनाच्या मुख्य मंडपात जाण्याचा मार्ग ग्रंथ दालनातूनच ठेवण्यात आल्यामुळे संमेलनास येणारा प्रत्येकजण ग्रंथ दालनातूनच जात-येत होता.
 
मुख्य मंडपासह परिसंवाद-परिचर्चेसाठी उभारलेला दुसरा मंडप तसेच बाल-कुमार वाचककट्टा, गझल-कवी कट्टा, पुस्तक प्रकाशन मंच येथे चारही दिवस आयोजित केलेल्या प्रत्येक उपक्रमाला साहित्य रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिल्याचे दिसले. गर्दीच्या दृष्टीनेही हे संमेलन विक्रमी ठरले.
 
हेही वाचा : ट्रम्प आणि भारताची ऊर्जा स्वायत्तता 
 
साहित्य रसिकांनी संमेलनास मोठ्या संख्येने हजेरी तर लावलीच पण शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी चारही दिवस संमेलनात हजेरी लावली. संमेलन कालावधीत शालेय विद्यार्थ्यांसह दहा लाख साहित्य रसिकांनी भेट दिली आहे. त्याचा सकारात्मक परिणाम पुस्तक विक्रीवर झाल्याचे दिसून आले आहे. बालवाङ्‌मयापासून ऐतिहासिक कादंबऱ्या, कथा, कविता, समीक्षात्मक पुस्तकांबरोबरच स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त ठरणारी पुस्तके प्रदर्शनात असल्यामुळे सर्व प्रकारच्या पुस्तकांची विक्री मोठ्या प्रमाणावर झाली आहे. एकंदरीत आठ कोटी ७२ लाख रुपयांची पुस्तक विक्री झाली आहे, अशी माहिती अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या कार्यवाह सुनिताराजे पवार यांनी दिली. (Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan)
 
 
Powered By Sangraha 9.0