मुंबई : ( Mohan Bhagwat ) समाजिक कार्य करत असताना एकमेकांविषयी मतभेद निर्माण होणे स्वाभाविक आहे, परंतु एकमेकांच्या विचारांचा विरोध असला तरी मनात एकतेचा भाव असायला हवा, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी व्यक्त केले. कोलकात्यातील सायंस सिटी सभागृहात आयोजित संघप्रवासाची १०० वर्षे; नवे क्षितिज या व्याख्यानमालेत ते बोलत होते.
सरसंघचालक म्हणाले की, संघाचे कार्य हे एक दैवी कार्य आहे. संघाचे कार्य मैत्रीवर आधारित शुद्ध सात्विक कार्य आहे. संघाच्या शाखेत आल्यानंतरच संघाची योग्य ओळख होऊ शकते. शाखेतून संस्कार घेऊन तयार झालेले स्वयंसेवक समाजाच्या सर्व क्षेत्रात काम करतात. या सर्व क्षेत्रात कार्य करणाऱ्या कोणावरही संघ नियंत्रक म्हणून भूमिका बजावत नाही. त्यामुळेच संघाच्या बाहेरून संघ समजून घेण्यापेक्षा संघात येऊन संघ समजणे आवश्यक आहे.
ते पुढे म्हणाले की, संघसंस्थापक डॉ. हेडगेवार नसते तर संघ अस्तित्वातच आला नसता. कारण संघ समजून घेण्यासाठी डॉ. हेडगेवारांचे चरित्र अभ्यासले पाहिजे. त्यांच्याकाळात हिंदुस्थान हे एक हिंदू राष्ट्र आहे हे मान्यच नव्हते, त्यावेळी ते हिंदू समाजाच्या एकीकरणासाठी उभे राहिले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत, आर्थिकदृष्ट्या कमकुवत असूनही डॉ. हेडगेवार यांनी संघाचे कार्य शुद्ध हृदयाने आणि निस्वार्थी मनाने सुरू केले.
हेही वाचा : Osman Hadi : 'उस्मान हादी'च्या मृत्यूनंतर बांगलादेशात उसळले हिंसक आंदोलन
'संघप्रवासाची १०० वर्षे : नवे क्षितिज' विशेष व्याख्यानमाला
दिल्लीमध्ये दि. २६ ऑगस्ट ते २८ ऑगस्ट रोजी या व्याख्यानमालेचे पहिले पुष्प यशस्वीरित्या पार पडले. दि. ८ व ९ नोव्हेंबर रोजी बंगळुरू येथे दुसरे पुष्प पार पडले. त्याचेच तिसरे पुष्प काल कोलकाता येथे झाले. आगामी मुंबई येथे ६ व ७ फेब्रुवारी रोजी या विषयावर व्याख्यानमाला होईल.
हे वाचलत का? - नगरपरिषद आणि नगरपालिकांमध्ये देवाभाऊंची जादू कायम; भाजप नंबर एक
सरसंघचालकांचे व्याख्यानातील प्रमुख मुद्दे
संघ आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण आहे, प्रत्येक पैशाचा हिशोब आणि लेखापरीक्षण केले जाते.
समाजात सज्जन शक्तीचे जाळे निर्माण करण्यात संघ महत्वाची भूमिका निभावेल.
सामाजिक सौहार्द: मंदिरे, पाणी, स्मशानभूमी हे सर्व हिंदूंसाठी समान असले पाहिजे.
संघाचा कोणीही शत्रू नाही, परंतु संघाच्या वाढीमुळे अनेकांना स्वार्थ साधणे शक्य होत नसल्याने तेच संघाचा विरोध करतात.
संघाची स्थापना राजकीय हेतूने नाही तर केवळ हिंदू समाजाचे संघटन करण्याच्या उद्देशाने करण्यात आली.