नगरपरिषद आणि नगरपालिकांमध्ये देवाभाऊंची जादू कायम; भाजप नंबर एक

    21-Dec-2025   
Total Views |
 
BJP
 
मुंबई : ( BJP ) "२० तारखेला दिवसभर कमळाची काळजी तुम्ही करा, त्यानंतर पुढचे पाच वर्षे तुमची काळजी देवाभाऊ करेल," असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगरपालिका आणि नगरपरिषद निवडणूकीच्या प्रचारादरम्यान जनतेला केले होते. जनतेने त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत राज्यभरात भाजपला क्रमांक एकचा पक्ष बनवले आहे.
 
राज्यभरात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांची रणधुमाळी सुरु असून पहिल्या टप्प्यातील नगरपरिषद आणि नगरपालिका निवडणूकांचा निकाल जाहीर झाला आहे. अनेक वर्षांनंतर पार पडलेल्या या निवडणूकांमध्ये पुन्हा एकदा महायुतीने बाजी मारल्याने महायुतीच्या गोटात जल्लोषाचे वातावरण आहे.
 
राज्यातील एकूण २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींसाठी दि. २ आणि २० डिसेंबर रोजी दोन टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडली. या निवडणूकांचे निकाल जाहीर झाले असून यात महायुतीला घवघवीत यश मिळाले आहे तर, महाविकास आघाडीची पुन्हा एकदा मोठी पीछेहाट झाली आहे. रविवारी सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली. २८८ नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणूकीत महायुतीला तब्बल २१४ तर, महाविकास आघाडीला ४९ जागांवर विजय मिळाला. तसेच स्थानिक आघाडीला २५ जागा प्राप्त झाल्या.
 
हेही वाचा : Prithviraj Chavan : पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात आमदार अतुल भातखळकर यांचे निषेध आंदोलन
 
महाविकास आघाडीला यावेळीही दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. विशेषत: उबाठा गट आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला या निवडणूकीत मोठा धक्का बसला आहे.
 
पक्षीय बलाबल
 
विभाग               नगरपरिषद   नगरपंचायती    भाजप     शिवसेना      राष्ट्रवादी काँग्रेस      मविआ        इतर
कोकण-ठाणे        २२                ५                      ९           १०                     १                      ३              ४
विदर्भ                  ८०                २०                   ५८          ८                      ७                     २३            ४
मराठवाडा           ४९                 ३                    २५          ८                      ६                      १०            ३
पश्चिम महाराष्ट्र     ५०                 १०                   १९         १४                     १४                     ७             ६
उत्तर महाराष्ट्र       ४५                 ४                   १८          ११                      ७                     ८              ५
एकूण                 २४६               ४२                 १२९        ५१                     ३५                   ५१             २२
 
१) जनता आता भूलथापांना बळी पडणार नाही
 
"विरोधकांनी फेक नरेटिव्ह पसरवण्याचा कितीही प्रयत्न केला, तरीही जनता आता भूलथापांना बळी पडणार नाही. महानगरपालिका निवडणुकांमध्येही भाजपा-महायुतीच विजयाचा विक्रम रचेल. ३ हजारांहून अधिक नगरसेवक एकट्या भाजपाचे निवडून आले आहेत. उध्दव ठाकरे म्हणाले की, जनतेला देण्यासारखे त्यांच्याकडे काहीच नाही. म्हणून जनतेनेदेखील ठरवले की, त्यांना देण्यासारखे काहीच नाही. त्यामुळे दोन अंकी संख्या देखील ते गाठू शकले नाहीत."
 
- रवींद्र चव्हाण, भाजप प्रदेशाध्यक्ष
 
२) निवडणूकीत मुख्यमंत्र्यांचा करिश्मा चालला
 
"आज भाजपला घवघवीत यश मिळाले आहे. मुख्यमंत्र्यांचा करिश्मा या निवडणुकीत चालला असून लाडक्या बहिणींचे आणि जनतेचे आशीर्वाद मिळाले आहेत. सर्व विरोधक एकत्र करून आकडा काढला तरी त्याच्या तीन पट जागा एकट्या भाजपला मिळाल्या आहेत. संजय राऊत मशीनला फिट नाही, तर तुमच्या डोक्याला फिट आली आहे. या निवडणूकीत उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांची एकही सभा झाली नाही. उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडल्याने आता ते सिंगल डिजीटवर आले आहेत. विदर्भाची आकडेवारी काढली तर १०० पैकी ५८ ठिकाणी भाजपची सत्ता आली आहे. काँग्रेसला केवळ २३ टक्के यश मिळाले आहे. याचा अर्थ विदर्भात ३५ टक्के जागासुद्धा काँग्रेसला मिळाल्या नाहीत. त्यामुळे ते विदर्भात नापास झाले आहेत.”
 
- नवनाथ बन, भाजप माध्यम प्रमुख
 
३) कितीही चिखलफेक केली, तरी कमळ उगवतेच
 
“भाजपाचा दणदणीत विजय. नगरपालिका आणि पंचायत समिती निवडणुकांच्या निकालातून हे स्पष्ट झाले की, कोणी कितीही चिखलफेक केली, तरी त्यातून कमळ उगवतेच. विरोधकांच्या खोट्या प्रचाराला न जुमानता जनतेने विकास, पारदर्शकता आणि सक्षम नेतृत्वालाच कौल दिला. जनतेचे आभार आणि सर्व विजयी उमेदवारांचे आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. ये तो सिर्फ झांकी है, मुंबई अभी बाकी है.”
 
- मंगलप्रभात लोढा, कॅबिनेट मंत्री
 
४) शुन्य अधिक शुन्य बेरीज शुन्यच
 
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप कार्यकर्त्यांनी असे लढावे की, विरोधकांचा सुपडा साफ झाला पाहिजे, असे आवाहन देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांना केले होते. हे आदेश शिरवंद्य मानून भाजपा कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात नगरपालिका निवडणुकीत विरोधी पक्षांचा पुर्णपणे सुपडा साफ केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीनेही चांगले यश मिळाले. हिंदुत्व सोडून बाकी काँग्रेसच्या बुडत्या जहाजात जे गेले ते जवळपास काँग्रेससह बुडाल्यात जमा आहेत. अजूनही मोठे पराभव बाकीच आहेत, म्हणून पुन्हा एकदा सांगतो शुन्य अधिक शुन्य बेरीज शुन्यच.” 
 
- आशिष शेलार, कॅबिनेट मंत्री
 
५) जनतेच्या अभूतपूर्व प्रेमासमोर नतमस्तक
 
“जनतेच्या अभूतपूर्व प्रेमासमोर नतमस्तक आहे. असाच लोभ असू द्या. अतिशय विश्वासाने विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने कमळाला मत दिले. त्यांच्या एका मताने आज, नगरपालिका-नगरपंचायत निवडणुकीत पुन्हा इतिहास घडवला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात विकसित महाराष्ट्रासाठी दिलेले आजचे मत राज्याच्या नागरी भागाचा चेहरामोहरा बदलणार आहे. हा देवाभाऊंवर जनतेचा असलेला विश्वास आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पक्षाचे पदाधिकारी, अगणित कार्यकर्ते या सगळ्यांच्या कष्टाचे फलित झाले. विकसित महाराष्ट्रासोबतच नगरपालिका विकसित व्हावी, असे जनतेचे मत आहे. मी भाजपाच्या कार्यकर्त्यांचे, नेत्यांचे, मनापासून अभिनंदन करतो. विजयी झालेल्या सर्व नगराध्यक्ष, नगरसेवकांचे हार्दिक अभिनंदन.”
 
- चंद्रशेखर बावनकुळे, महसूल मंत्री
 
 

अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....