
विधान परिषदेने संमत केलेले महत्त्वपूर्ण विधेयके ठराव आणि धोरणे याविषयी वि. स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्रातर्फे प्रकाशित करण्यात येत असलेल्या संदर्भ समृद्ध ग्रंथ मालिकेतील द्वितीय ग्रंथाचे प्रकाशन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या हस्ते पार पडले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे उपस्थित होत्या.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) म्हणाले की, "ज्या सभागृहाने १८ वर्ष शिकवीत अनुभवसंपन्न केले आणि देशाची सेवा करण्याची संधी दिली, अशा सभागृहात कार्यक्रमाच्या निमित्ताने पुन्हा येण्याचे भाग्य मिळाले. त्यामुळे या सभागृहातील आठवणींना उजाळा मिळाला. चर्चेद्वारे समोरच्याकडून राज्याच्या विकासासाठी हवे असलेले काढून घेण्याचे कौशल्य याच सभागृहाने दिले. विधान परिषद सभागृहात कायदा निर्मितीवर झालेल्या चर्चेतून परिणामकारक कायद्यांची निर्मिती झाली आहे. या सभागृहात राज्याच्या विविध प्रश्नांवर चर्चा करताना नियमांची लढाई झाली तरी कधी वैयक्तिक संबंधांमध्ये कटूता आली नाही, हीच आपल्या लोकशाहीची समृद्ध परंपरा आहे."
प्रबोधन, प्रशिक्षण व संशोधन ही लोकशाही समृद्धीची त्रिसूत्री
"राष्ट्रकुल संसदीय अभ्यास मंडळाच्या माध्यमातून राज्यशास्त्राचे विद्यार्थी प्रशिक्षणासाठी येत असतात. या विद्यार्थ्यांना कायदे निर्मितीची प्रक्रिया, संसदीय पद्धत अभ्यासण्याची संधी प्राप्त होते. अशा प्रशिक्षण प्रबोधनातूनच लोकशाही समृद्ध होते. त्यामुळे प्रबोधन, प्रशिक्षण व संशोधन हे समृद्ध लोकशाहीची त्रिसुत्री आहे," असेही ते म्हणाले. (Nitin Gadkari)
चर्चांमधूनच प्रगल्भ कायद्याची निर्मिती - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "कायदा निर्मिती प्रक्रियेत सभागृहांमध्ये होत असलेली चर्चा अत्यंत महत्त्वाची असते. अशा चर्चांमधूनच प्रगल्भ कायद्याची निर्मिती होते. चर्चांमधून निर्मित झालेल्या कायद्यांमध्ये जनमानसाचे प्रतिबिंब दिसून येते. अशा कायद्यांचा निश्चितच लोककल्याणासाठी उपयोग होत असतो."
हा ग्रंथ नेहमी ऐतिहासिक दस्ताऐवज ठरेल
"संविधानकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधान परिषद सभागृहाचे सदस्य होते. या सभागृहाने अतिशय हुशार, अनुभवी सदस्य दिले आहेत. त्यांच्या हुशारी, अनुभवाचा लाभ कायदा निर्मिती प्रक्रियेत झाला आहे. या सभागृहाने पारित केलेले कायदे, ध्येयधोरणे यावर आधारित ग्रंथसंपदा निर्माण होत आहे. आपल्या सभागृहातील कामकाजाचे ' रेकॉर्ड ' होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. रेकॉर्ड नसल्याने अनेक ऐतिहासिक संदर्भाना आपण मुकलो आहोत. पश्चिमात्य देशांमध्ये 'रेकॉर्ड' असल्यामुळे त्यांचे संदर्भ आपणास घ्यावे लागतात. आपली लोकशाही पद्धत त्यांच्यापेक्षा दोन हजार वर्षांनी जुनी आहे, मात्र, रेकॉर्ड नसल्याने संदर्भ उपलब्ध होत नाहीत. इतिहास हा संकलित करावयाचा असतो. त्यामुळे सभागृहातील भाषणे, निर्मित कायदे यांचे संकलन करून प्रकाशित केलेला ग्रंथ हा नेहमी ऐतिहासिक दस्ताऐवज ठरेल," असा विश्वासही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. (Nitin Gadkari)