मुंबई : (Abhiram Bhadkamkar) " जग विस्तारत असताना, आपली भाषा आकुंचन पावत असेल तर ही काळजीची बाब आहे. मराठीच्या विस्ताराची जबाबदारी आपलीच आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे" असे प्रतिपादन प्रख्यात लेखक दिग्दर्शक अभिराम भडकमकर (Abhiram Bhadkamkar) यांनी केले. दोन दिवसीय मुंबई जिल्हा साहित्य संमेलनाच्या सांगता समारंभच्यावेळी ते बोलत होते. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले की " काल आणि आज आपण सगळे सर्व स्पर्शी साहित्याच्या वातावरणात वावरत होतो. हे संमेलन जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करणारे साहित्य संमेलन ठरले. आपली भाषा, आपले साहित्य समृद्ध करण्यासाठी आपण सातत्याने काम केले पाहिजे. " (Abhiram Bhadkamkar)
हेही वाचा : Navnath Ban : काँग्रेसची आगरबत्ती हर्षवर्धन सपकाळ यांच्यामुळे विझली
दि. २२ नोव्हेंबर रोजी मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि सांस्कृतिक मंडळ यांच्या अनुदानातून ग्रंथाली आयोजित मुंबई जिल्हा साहित्य संमेलन उत्साहात संपन्न झाले. संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी वेगवेगळ्या कार्यक्रमांचा आस्वाद रसिक वाचकांना घ्यायला मिळाला. या दिवशीच्या पहिल्या सत्रामध्ये "कवितेचे वारसदार" या काव्य वाचनाचा कार्यक्रमांतर्गत डॉ. सिसिलिया कार्व्हालो,किरण येले, महेंद्र कोंडे, वृषाली विनायक ,संकेत म्हात्रे यांनी भावस्पर्शी तसेच उद्बोधक कविता सादर केल्या. संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात संहितालेखन आणि एआय या विषयवारील चर्चासत्र पार पडले. संमेलनाच्या तिसऱ्या सत्रात गझलकार चंद्रशेखर सानेकर यांनी ‘ गजलसंध्या – एका उन्हाची कैफियत ‘ या कार्यक्रमातून गजल या काव्य प्रकाराची रसिकांना नव्याने ओळख करून दिली. त्यांच्या आशयसंपन्न आणि ह्रदयस्पर्शी सादरीकरणाला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. संमेलनाच्या अखेरच्या सत्रात विद्याधर पुंडलीक , जयवंत दळवी आणि गंगाधर गाडगीळ यांच्या व्यक्तित्व आणि साहित्यावर आधारित अभिवाचन जेष्ठ अभिनेते प्रमोद पवार , प्रख्यात अभिनेत्री स्वाती चिटणीस ,प्रख्यात अभिनेते अभिजीत खांडेकर व गौतमी देशपांडे या कलाकारांनी आणि संपादक , लेखिका मोनिका गजेंद्रगडकर यांनी सादर केले. दिग्गजांच्या मांदियाळीत दोन दिवसीय मुंबई जिल्हा साहित्य संमेलन उत्साहात पार पडले. (Abhiram Bhadkamkar)
हे वाचलात का ? : Amit Satam : कोस्टल रोड बांधणे जितके गरजेचे, तितकेच महानगरपालिकेच्या शाळा टिकवणेही गरजेचे - आ. अमीत साटम
ग्रंथालीने केले वाचनसंस्कार
साहित्य संमेलनाच्या समारोप वेळी आयोजन कर्त्या ग्रंथाली प्रकाशाचे कौतुक करताना अभिराम भडकमकर म्हणाले की " ग्रंथाली ही केवळ प्रकाशन गृह नसून ही एक वाचक चळवळ आहे. ग्रंथालीन लोकांना वाचता केलं. त्यांच्यावर साहित्याचे जीवनाचे चांगले संस्कार केले. " (Abhiram Bhadkamkar)