मुंबई : (Amit Satam) महानगरपालिकेकडे पैसे नाही, हे साफ खोटे आहे. कोस्टल रोड बांधणे जितके गरजेचे आहे तितकेच महानगरपालिकेच्या शाळा टिकवणे गरजेचे आहे हे प्रशासनाला सांगणे गरजेचे असून आम्ही त्यांना ते सांगू. कारण नुसता कोस्टल रोड बांधून उपयोग नाही. त्याचा उपयोग करण्यासाठी भविष्यातील पिढ्याही घडायला हव्या, असे प्रतिपादन मुंबई भाजपचे अध्यक्ष आ. अमीत साटम (Amit Satam) यांनी केले.
मुंबई शहर शिक्षक विकास मंडळाच्या वतीने ५ वी राष्ट्रीय शिक्षक परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी आ. अमीत साटम (Amit Satam) यांनी मुंबईतील शिक्षकांशी संवाद साधला. यावेळी महाराष्ट्र भूषण पद्मश्री अभिनेते अशोक सराफ, गायक अनू मलिक, दै. मुंबई तरुण भारतचे संपादक किरण शेलार, श्री सिद्धिविनायक न्यासचे कोषाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी, मुंबई शहर शिक्षक विकास मंडळाचे कार्यकारिणी सदस्य प्रा. डॉ. विशाल कडणे, यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी मुंबई शहर शिक्षक विकास मंडळाकडून पद्मश्री अशोक सराफ यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.
आ. अमीत साटम (Amit Satam) म्हणाले की, "गेल्या १० वर्षात मुंबई महापालिकेच्या मराठी शाळांची पटसंख्या ७० टक्क्यांपेक्षा कमी झाली. मराठी माणसाच्या गप्पा करणाऱ्यांच्या कालावधीतच ही पटसंख्या कमी झाली. मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये देण्यात येणाऱ्या शिक्षणाचा स्तर फारच खालावलेला दिसतो. येणाऱ्या काळात मुंबई महापालिकेच्या शाळांतील शिक्षणाचा स्तर हा अन्य शाळांसारखाच असावा यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. महापालिकेच्या शाळांमध्ये ज्या गोष्टी व्हायला पाहिजे होत्या त्या झाल्या नाहीत. इच्छाशक्तीची कमतरता हेच यामागचे कारण आहे."
रिक्त पदे लवकरात लवकर भरणार
"यापुढे शाळांमध्ये रिक्त असलेली पदे लवकरात लवकर भरली गेली पाहिजे. शिक्षकांइतकेच शिक्षकेतर कर्मचारीही महत्वाचे आहेत. त्यामुळे ही सगळी पदे भरली गेली पाहिजे. यामध्ये डिजिडल हस्तक्षेप आणणे आवश्यक आहे. मानवी हस्तक्षेप कमी करून डिजीटल हस्तक्षेप वाढवल्यास या कमतरता आपण भरून काढू शकतो," असेही ते म्हणाले. (Amit Satam)
"शिक्षणात डिजिटल तंत्रज्ञानाचा उपयोग वाढवण्याची आवश्यकता आहे. डिजिटल शिक्षणाच्या माध्यमातून शिक्षणाचा स्तर वाढवू शकतो. कुठल्याही परिस्थितीत शिक्षण आणि आरोग्य यासाठीच्या निधीमध्ये कुठलीही तडजोड करता कामा नये, असे आमचे मत आहे. शिक्षक म्हणजे भविष्यातील पिढ्या घडवण्याचे एक माध्यम आहे. त्यामुळे शिक्षकांच्या समस्या आणि शिकण्यासाठी लागणाऱ्या निधीमध्ये तडजोड होऊ नये. यासाठी मी शिक्षणमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार आहे," अशी ग्वाही आ. अमीत साटम (Amit Satam) यांनी यावेळी दिली.
"आपल्याकडे निधी आहे. परंतू, तो वापरलाच गेला नाही. यामुळे जवळपास १७०० हून अधिक शाळांमध्ये प्रशासकीय कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. काही विभागांमध्ये शेकडो शाळांसाठी फक्त दोनच निरीक्षक आहेत. काही ठिकाणी ८० टक्के लिपीक पदे रिक्त आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीने स्वयंपूर्ण प्रशासकीय सेवा प्रणाली राबवण्याचा प्रयत्न आपण करत आहात. तर या इच्छाशक्तीमुळे काही अडचण येत आहे का? यावर एक सकारात्मक पर्याय सुचवणे गरजेचे आहे." (Amit Satam)
- प्रा. डॉ. विशाल कडणे, कार्यकारिणी सदस्य, मुंबई शहर शिक्षक विकास मंडळ
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....