ओबीसी आरक्षण कमी होतेय याचा काही पुरावा आहे का?

18 Oct 2025 16:09:28

OBC reservation 
मुंबई : ( OBC reservation ) ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता आपण मराठा समाजाच्या आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण करत आहोत, हे मुख्यमंत्र्यांनी आधीच स्पष्ट केले आहे. पण तरीही ओबीसी विरुद्ध मराठा अशी तेढ का निर्माण होते? हे कळत नाही. ओबीसी आरक्षण कमी होणार, असे काही पुरावे आहेत का? असा सवाल जलसंपदा मंत्री तथा मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला.
 
शुक्रवार, १७ सप्टेंबर रोजी बीडमध्ये ओबीसी महाएल्गार मोर्चा झाला. यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यासह मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावरही टीका केली. यावर बोलताना मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, "छगन भुजबळ हे जेष्ठ नेते असून त्यांचा नेहमीच आदर आहे. त्यांनी गैरसमजूतीतून वक्तव्य केले असेल. परंतू, इतके वर्ष सार्वजनिक जीवनात काम करताना कधी ओबीसी विरुद्ध मराठा असा प्रश्न निर्माण झाला, असे जाणवले नाही. सगळे एकत्रच राहतात. सगळेजण सोबत आनंदाने सण उत्सव एकत्र साजरे करतात. पण तरीही ही तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न का होतो?" असा सवाल त्यांनी केला.
 
हेही वाचा - ब्रिटिशांचे वारसदार
 
ते पुढे म्हणाले की, "आमच्या डीएनएमध्येच ओबीसी आहे, हे मुख्यमंत्र्यांनी पहिल्यापासूनच स्पष्ट केले आहे. त्यामुळे त्यांच्या आरक्षणाला धक्का लावण्याचा प्रयत्न कधीच झाला नाही. ओबीसी आरक्षण कमी होते आहे असे काही उदाहरण आहे का? मराठवाड्याचा काही भाग सोडल्यास राज्यात पूर्वीच लोक कुणबी झाले आहेत. हैदराबात गॅझेटची अंमलबजावणी करणे हा तिथल्या जनतेचा अधिकार आहे. त्यांच्यावर अनेक वर्षे झालेल्या अन्यायाची भावना दूर करण्याचा सरकार प्रयत्न करत आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही ही भूमिका ठेवून कायद्याच्या चौकटीत ते करत आहे. भूजबळ साहेबांना भेटून मी त्यांना हे समजावून सांगणार आहे. न्या. शिंदे समितीच्या निष्कर्षावर आपण कार्यवाही करतो आहोत. त्यामुळे आम्ही सगळे एकत्र बसून हा विसंवाद दूर करणार आहोत," असेही त्यांनी स्पष्ट केले.
 
हे वाचलत का ? -  मित्र गारव्यामध्ये वणव्यासारखा...
 
काही लोकांना प्रसिद्धीचा हव्यास
 
"मनोज जरांगे पाटील यांनी प्रामाणिकपणे आंदोलन चालवले. त्यांनी समाजाच्या प्रश्नासाठी निस्वार्थीपणे आंदोलन उभे केले. त्यांच्या मागण्यांसंदर्भात कायद्याच्या चौकटीत आम्ही निर्णय केला. तुम्ही त्यांचे शिक्षण काढणे चुकीच आहे. काही लोकांना प्रक्षोभक भाषणे करून स्वत:ची प्रसिद्धी करण्याचा हव्यास लागला आहे. पण या हव्यासामुळे आपण समाजात तेढ निर्माण करतो, हे त्यांना कळत नाही. या पुढाऱ्यांना त्यांची दिवाळी साजरी करायची आहे. दिवाळी संपल्यावर ओबीसी नेत्यांना बोलवून न्यायमूर्ती शिंदे हे यासंबंधीची कायदेशीर बाजू मांडतील. त्यानंतर हा गैरसमज दूर होईल, अशी मला खात्री आहे," असेही मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.
 
 
 
Powered By Sangraha 9.0