ब्रिटिशांचे वारसदार

    18-Oct-2025
Total Views |
 
Rahul Gandhi
 
उत्तर प्रदेशातल्या रायबरेलीतील हरिओम वाल्मिकी या युवकाची हत्या झाल्यानंतर, राहुल गांधींनी त्या पीडित कुटुंबाची भेट घेतली. खरंतर गुन्हेगारांना तत्काळ अटक झाल्याने त्या कुटुंबानेच सरकारच्या प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त करत, राहुल गांधी आणि अन्य विरोधी पक्षांनी राजकारणासाठी न येण्याचे आवाहन केले होते. तरीही राहुल गांधी गेलेच! वर राज्य सरकारवर आरोपांची सरबत्ती करत, सवयीप्रमाणे जातिवादाचे कार्डही वापरले. जातिवादाचे राजकारण करणार्‍या राहुल यांच्या भेटीमागे खरी संवेदना आहे का, हाच खरा प्रश्न. आजवरचा इतिहास बघता, राहुल यांची भेट त्यांच्या राजकीय नाट्यकलेचाच एक भाग वाटावी. रोहित वेमुला प्रकरणाच्या वेळीही काँग्रेसने असेच राजकरण केले होते. रोहितच्याही जातीचाच आधार घेऊन, त्याच्या मृत्यूलाही राजकीय रंग देण्यात आला होता. मात्र, त्या घटनेनंतर दलित तरुणांच्या भल्यासाठी काँग्रेसने त्यांच्या राज्यात तरी कोणती ठोस पावले उचलली का?
 
प्रत्येक घटनेत जात शोधून त्यावर राजकीय पोळी भाजणे, ही राहुल गांधींच्या राजकारणाची एक पद्धत. कर्नाटकातील काँग्रेस सरकारने सरकारी निविदांमध्ये विशिष्ट धर्मीयांनाच प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला, तेव्हा राहुल गांधींचा सामाजिक न्याय कुठे गेला होता? अल्पसंख्याकांच्या नावाखाली फक्त एका धर्माचे लांगूलचालन आणि इतर वंचित समाजघटकांप्रति उदासीनता हीच काँग्रेसची खरी ओळख बनली. आजचे काँग्रेसचे जातिवादाचे राजकारण पाहिल्यास, एकेकाळी ‘ना जात पर, ना पात पर मोहोर लगाए हाथ पर’ म्हणणारी काँग्रेस, आज प्रत्येक मुद्द्यात जातीचाच आधार घेताना दिसत आहे.
 
ही अवस्थाच गेल्या तीन दशकांतील काँग्रेसच्या निष्क्रियतेची साक्ष देण्यास पुरेशी ठरतात. वास्तव इतकेच की, काँग्रेसने कायमच या देशातील गरिबांना एक राजकीय मतपेटी म्हणूनच पाहिले. जेव्हा या देशातील जनतेने एकत्रपणे काँग्रेसच्या राजकीय नाटकाला नाकारून, विकासाच्या पारड्यात मतदान केले, त्यामुळे हवालदिल झालेली काँग्रेस आज पुन्हा एकदा ‘मागास’, ‘अल्पसंख्याक’ या नावाखाली समाजाला विभागण्याचे काम करत आहे. मात्र, काँग्रेसची ही नीती जनता आता पूर्णपणे ओळखून आहे. काँग्रेसच्या आजच्या रुपाची निर्मिती मतांच्या गणितातून झालेली आहे. ब्रिटिशांनी एकेकाळी ‘फोडा आणि राज्य करा’ याच नीतीचा वापर करून भारतावर राज्य केले. काँग्रेस आज बिटिशांचा हा वारसा समर्थपणे पुढे नेत आहे.
 
घराणेशाही आवडे काँग्रेसला
 
कर्नाटकमध्ये अलीकडेच ‘कल्याण कर्नाटक प्रादेशिक विकास मंडळा’चे अध्यक्ष डॉ. अजय सिंग यांनी खर्गे कुटुंबाचा अपमान म्हणजे त्यांचाच अपमान असल्याचे म्हटले. खर्गे यांच्यावर झालेल्या राजकीय टीकेला उत्तर देताना त्यांनी हे विधान केले असले, तरीही या विधानाने पक्षातील घराणेशाहीचा चेहरा अधिकच अधोरेखित झाला आहे. काँग्रेसचे अध्यक्षपद मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे आल्यानंतर भाट-चारण आणि हुजुरांची गर्दी त्यांच्याभोवती वाढू लागल्याचे हे लक्षण ठरावे. तशी घराणेशाही ही काँग्रेससाठी नवी नाही. तिची पाळेमुळे गेली कित्येक दशके काँग्रेसच्या अंतर्गत संघटनेमध्येच रुजली आहेत.
 
काँग्रेस पक्ष एकेकाळी स्वातंत्र्याचा वारसा घेऊनच देशाच्या सत्तेत आला होता. त्यावेळी देशातील प्रत्येक नागरिकाला हा पक्ष स्वतःचा वाटे. त्यानंतर सातत्याने गांधी घराण्याच्या नेतृत्वानेच या पक्षाची धुरा सांभाळली, त्यामुळे काँग्रेस पक्षात गांधी घराणे ‘हायकमांड‘ झाले. त्यामुळे राजकारणात मोठे व्हायचे असल्यास, हायकमांडची मर्जी संपादन करण्याला अवास्तव महत्त्व वाढले. आजही हीच पद्धत रुढ असून, काँग्रेस पक्ष स्वार्थी भाट-चारणांचा फड झाला आहे. आता पक्षाचे अध्यक्षपद खर्गे यांच्याकडे आल्यानंतर, हेच भाट-चारण त्यांच्याही कुटुंबाभोवती हुजुरेगिरीची शर्थ करताना आढळत आहेत. या पक्षात सध्या निर्णयप्रक्रियेत स्वतंत्र विचारकांना कोणतेही स्थान उरलेले नाही.
 
हुजुरेगिरीशिवाय सध्याच्या काँग्रेस नेत्यांकडची स्वप्रतिभेची वानवा स्पष्ट जाणवते. पक्षातील निर्णय, स्थानिक नेत्यांची निवड, अभियानांची आखणी हे सर्व एकाच घराण्याच्या आदेशाने चालते. ही अवस्था काँग्रेससारख्या एकेकाळी जनसामर्थ्याने भरलेल्या पक्षाचे वास्तव दर्शवते. घराणेशाहीचा प्रभाव इतका जबरदस्त झाला आहे की, पक्षात इतर आवाजाला स्थान राहिलेले नाही. हिमंता बिस्व सरमा, ज्योतिरादित्य सिंदिया हे त्याचे उत्तम उदाहरण ठरावे. मनमोहन सिंग सरकारने काढलेला शासननिर्णय फाडल्यावर, राहुल गांधी यांच्या काँग्रेसकडून कोणतीही कारवाई न होणे, ही घटनाच काँग्रेस पक्षातील घराणेशाहीचा प्रभाव आणि त्यातून निर्माण बेशिस्तीचा चेहरा ठरली. या वृत्तीनेच काँग्रेसचे, तसेच देशाचेही अपरिमित नुकसान केले आहे. एकेकाळी आज खर्गे यांच्याभोवती जमा होणारी भाट-चारणांची गर्दी पाहता, हीच पद्धत काँग्रेसच्या संघटनेत तळागाळापर्यंत पोहोचण्यास वेळ लागणार नाही, हे निश्चित!
 
- कौस्तुभ वीरकर