नागपूर : ( Chandrashekhar Bawankule ) राज्यातील शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदतनिधी मिळावा, यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. ज्यांची केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली आहे, त्या शेतकऱ्यांच्या खात्यात निधी जमा करण्यासाठी महसूल विभाग सुट्टीतही काम करणार असल्याची माहिती राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपुरात दिली.
दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात निधी
शेतकऱ्यांना सणासुदीपूर्वी दिलासा मिळावा, यासाठी महसूल विभागातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी सुट्टीच्या काळातही काम करतील. सरकारचा उद्देश प्रत्येक पात्र शेतकऱ्याच्या खात्यात मदत वेळेवर पोहोचवणे हा आहे,” असे महसूलमंत्री बावनकुळे यांनी सांगितले.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राजकारण नको
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे विरोधी पक्षात असल्याने टीका करतात, हे स्वाभाविक आहे. मात्र, राज्यातील सध्याच्या परिस्थितीत सर्व राजकीय पक्षांनी राजकारण विसरून शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे. सणासुदीच्या काळात राजकारण न करता शेतकऱ्यांसाठी काम केले पाहिजे,” असे आवाहन बावनकुळे यांनी केले.
ओबीसी–मराठा आरक्षणाबाबत स्पष्ट भूमिका
२ सप्टेंबरचा आदेश हा केवळ हैदराबाद गॅझेट आणि चार जिल्ह्यांपुरता आहे. राज्य सरकारकडून खोटे प्रमाणपत्र दिले जाणार नाही. महसूल विभाग याबाबत पूर्ण दक्ष आहे,” असे बावनकुळे म्हणाले.
राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनाही याबाबत स्पष्टता देण्यात आली आहे. “ओबीसींचे हक्क अबाधित राहतील आणि मराठा समाजावरही अन्याय होणार नाही,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
महसूल अधिकाऱ्यांच्या बढती प्रक्रियेला गती
महसूल विभागातील अधिकार्यांच्या बढती प्रक्रियेला गती देण्यात आली आहे. “२३ अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना निवड श्रेणी आणि २२ उपजिल्हाधिकाऱ्यांना अतिरिक्त जिल्हाधिकारीपदी बढती देण्यात आली आहे. तहसीलदार ते उपजिल्हाधिकारी आणि नायब तहसीलदार ते तहसीलदार या बढत्याही तातडीने होणार आहेत. गेल्या आठ–दहा वर्षांपासून थांबलेली प्रमोशन प्रक्रिया आम्ही गतीमान केली आहे,” असे बावनकुळे म्हणाले.
हे वाचलत का ? - मित्र गारव्यामध्ये वणव्यासारखा...
नागपूरसाठी अधिक एसटी बसेस
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत नागपूरसाठी अधिक एसटी बसेस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच प्रादेशिक परिवहन विभागातील अनियमिततेवरही चर्चा झाल्याची माहिती महसूलमंत्र्यांनी दिली.
महायुतीकडे वाढता जनाधार
महाविकास आघाडीवरील जनतेचा विश्वास हरवला आहे. विकासाचा अजेंडा हरवला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर लोक भाजप आणि महायुतीमध्ये प्रवेश करत आहेत. पुढील १५ वर्ष महाराष्ट्रात महायुतीचे सरकार राहील, असा माझा ठाम विश्वास आहे,” असे महसूलमंत्री बावनकुळे यांनी सांगितले.
शिवाजीराव कर्डीले यांना श्रद्धांजली
आमचे कौटुंबिक मित्र आणि ज्यांनी संपूर्ण आयुष्य जनतेच्या सेवेसाठी वेचले, असे भाजपचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव कर्डीले यांच्या निधनाने मी अतिशय व्यथित झालो आहे. आम्ही एक समर्पित लोकनेते गमावले आहेत, अशा शब्दांत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी श्रद्धांजली अर्पण केली.