जुने मित्र, नवे व्यापारी मार्ग

    08-Jul-2024   
Total Views |
india upcoming austria tour


गेल्या ४० वर्षांतील भारतीय पंतप्रधानांचा हा पहिला ऑस्ट्रिया दौरा असेल. नवोन्मेष, तंत्रज्ञान आणि शाश्वत विकासासह अनेक नवीन आणि उदयोन्मुख क्षेत्रांमध्ये दोन्ही देशांमधील भागीदारी नवीन उंचीवर नेण्यासाठी यावेळी चर्चा होतील. या पार्श्वभूमीवर भारत-रशियादरम्यानचा नवा व्यापारी मार्ग महत्त्वाचा ठरणार आहे. त्याविषयी...

नरेंद्र मोदी यांनी देशात तिसर्‍यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली असून, काही दिवसांत त्यांच्या कार्यकाळाचा एक महिनाही पूर्ण होणार आहे. मोदींनी पुन्हा सत्तेची सूत्रे हाती घेतल्यापासून परकीय आणि सामरिक बाबींमध्येही अनेक बदल दिसून येत आहेत. पंतप्रधान मोदी सोमवारी सकाळीच आपल्या रशिया आणि ऑस्ट्रिया दौर्‍यासाठी रवाना झाले. तेथे ते २२व्या भारत-रशिया शिखर परिषदेमध्ये भाग घेणार आहेत. भारत आणि रशिया यांनी ऊर्जा संवर्धन, व्यापार, गुंतवणूक, आरोग्य, शिक्षण, संस्कृती, पर्यटन, दोन्ही देशांतील परस्पर सामंजस्य यांसह अनेक क्षेत्रांतील धोरणात्मक भागीदारी यशस्वी ठरली आहे. तसेच गेल्या दहा वर्षांत या अनुषंगाने दोन्ही देशांनी मोठी प्रगती केली आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यासोबत द्विपक्षीय भागीदारीच्या संपूर्ण विस्ताराचा आढावा घेऊन विविध प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर आता मोदींच्या दौर्‍यात चर्चा होणार आहे. त्याचप्रमाणे, पंतप्रधान मोदी ऑस्ट्रिया दौराही करणार आहेत. गेल्या ४० वर्षांतील भारतीय पंतप्रधानांचा हा पहिला ऑस्ट्रिया दौरा असेल. नवोन्मेष, तंत्रज्ञान आणि शाश्वत विकासासह अनेक नवीन आणि उदयोन्मुख क्षेत्रांमध्ये दोन्ही देशांमधील भागीदारी नवीन उंचीवर नेण्यासाठी यावेळी चर्चा होतील. या पार्श्वभूमीवर भारत-रशियादरम्यानचा नवा व्यापारी मार्ग महत्त्वाचा ठरणार आहे.

अलीकडेच रशियाने भारताला कोळशाच्या दोन गाड्या पाठवल्या आहेत. तेदेखील प्रथमच ‘आयएनएसटीसी’ म्हणजेच ‘आंतरराष्ट्रीय उत्तर-दक्षिण कॉरिडोर’ वापरून पाठवल्या गेल्या. या मार्गात इराणचा काही भागदेखील समाविष्ट आहे. यामध्ये रेल्वेसह रस्त्याचा मार्गही वापरला जातो. जागतिक स्तरावर ‘आंतरराष्ट्रीय उत्तर-दक्षिण कॉरिडोर’ची चर्चा सुरू आहे. मुख्य मार्गाव्यतिरिक्त हा एक प्रकारचा पर्यायी मार्ग आहे. यापूर्वी भारत, रशिया किंवा मध्य आशियातील देशांशी होणारा बहुतांश व्यापार सुएझ कालव्यातून होत होता. सध्याचा नवा कॉरिडोर तयार करण्यात आला आहे आणि पर्यायी मार्ग तयार करण्यात आला आहे, तो प्रवास खूपच सोपा झाला आहे. पूर्वी सुएझ कालव्यातून माल आणण्यासाठी ४५ दिवस लागायचे, आता केवळ २० दिवसांत मुंबई बंदरात सहज पोहोचविता येणे शक्य होत आहे. या नव्या मार्गाचा आगामी काळात भारत-रशिया-इराण या तिन्ही देशांना थेट आर्थिक फायदा होणार आहे. यासोबतच, मध्य आशिया, बाल्टिक राष्ट्रांसह एकूण ११ ते १२ देशांना स्पर्श करणारा हा कॉरिडोर रशियाच्या सेंट पीटर्सबर्गमधून जातो. याद्वारे मोठी व्यापारी उलाढाल होण्यास आता प्रारंभ होणार आहे. भारताने एक सोपा आणि सोयीस्कर मार्ग शोधला आहे, ज्यामध्ये कोणत्याही प्रकारचा धोका नाही. याचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर चांगला परिणाम होईल.

गेल्या दोन वर्षांतील जागतिक घडामोडींवर नजर टाकली, तर विशेषतः संपूर्ण जगाच्या राजकारणात बरेच काही बदलले आहे. सर्वप्रथम कोरोना महामारीमुळे जागतिक पुरवठासाखळी मोठ्या प्रमाणात प्रभावित झाली आहे. त्याचवेळी या पुरवठा साखळीवर असलेल्या चीनच्या वर्चस्वामुळे संशयाचे वातावरणही निर्माण झाले आहे. दक्षिण चीन समुद्रात चीनचा वाढता प्रभावही कोणापासून लपलेला नाही. चीन संपूर्ण दक्षिण चीन समुद्र क्षेत्रावर आपला दावा करत आहे. त्याचवेळी युक्रेन-रशिया आणि हमास आणि इस्रायल यांच्यातील युद्धामुळे संपूर्ण जग प्रभावित झाले आहे. युक्रेन-रशिया युद्धाचा प्रभाव तर जगातील जवळपास सर्वच देशांवर पडत आहे. त्याचप्रमाणे काही काळापूर्वी सुएझ कालव्यात अडकलेल्या एका जहाजामुळे जगातील अनेक देशांचे हजारो कोटींचे आर्थिक नुकसान झाले. त्यामुळे गेली अनेक वर्षे अनेक देश पर्यायी मार्गाचा शोध घेण्याचा प्रयत्न करत होते.

त्यासाठी चीनने ‘बेल्ट अ‍ॅण्ड रोड इनिशिएटिव्ह’चा घाट घातला होता. मात्र, हा प्रकल्प चीनच्या अतिशय संशयास्पद अशा वागणुकीमुळे जवळपास ठप्प झाला आहे. त्यामुळे आणखी एक नवा पर्याय शोधण्यासाठी जगातील अनेक देश कार्यरत झाले आहेत. अलीकडेच भारतात झालेल्या ‘जी २०’ शिखर परिषदेमध्ये भारताने त्यासाठी पुढाकार घेतला आहे. अमेरिका, सौदी अरेबिया, युरोप आणि भारताने एकत्र काम करावे, असा प्रयत्न या शिखर परिषदेदरम्यान झालेल्या एका स्वतंत्र बैठकीत करण्यात आला होता. अलीकडेच, इराणने भारताला चाबहार बंदर दहा वर्षांसाठी वापरण्यास आणि देखभाल करण्यास मान्यता दिली आहे. पुढील दहा वर्षे हे बंदर भारताच्या देखरेखीखाली राहाणार आहे. आंतरराष्ट्रीय उत्तर-दक्षिण कॉरिडोरला यामुळे लाभ होणार आहे. या बंदराचे भूराजकीय स्थान अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असल्याने जागतिक व्यापाराला नवे बळ देण्याची क्षमता भारतास प्राप्त झाली आहे.

आंतरराष्ट्रीय उत्तर-दक्षिण कॉरिडोरद्वारे भारताने कूटनीतिक संदेश दिला आहे. भारताने रशियासोबत जवळीक वाढवू नये, असा अमेरिकेचा नेहमीचा प्रयत्न राहिला आहे. युक्रेन-रशिया संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारतानेही रशियावर बहिष्कार टाकावा, असा अमेरिकेसह युरोपचाही प्रयत्न राहिला आहे. मात्र, प्रथम रशियाकडून नैसर्गिक वायू खरेदी करून आणि आता नवा व्यापारी मार्ग सुरू करून, भारताने आपले परराष्ट्र धोरण हे भारतीय हितालाच प्राधान्य देईल, हे पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे.