नवी दिल्ली : जम्मूमध्ये नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा परिस्थिती आणि अमरनाथ यात्रेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी रविवार, दि. १६ जून २०२४ उच्चस्तरीय बैठक घेत आहेत. गृहमंत्री अमित शाह जम्मू आणि काश्मीरमधील सुरक्षा परिस्थितीचे आणि आगामी अमरनाथ यात्रेच्या तयारीचे मूल्यांकन करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांनी गृहमंत्र्यांना जम्मू-काश्मीरमधील सध्याची सुरक्षा परिस्थिती आणि अशा दहशतवादी हल्ल्यांना तोंड देण्याच्या तयारीची माहिती दिली. पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोवाल, जम्मू आणि काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा, लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे आणि केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला आणि इतर उच्च स्तरीय अधिकारी या बैठकीत सहभागी झाले आहेत.
पहिल्या फेरीच्या आढावा बैठकीनंतर आता दुसऱ्या फेरीची आढावा बैठक होणार आहे. ज्यामध्ये एनएसए अजित डोवाल यांच्यासह सर्व अधिकारी पोहोचले आहेत. गृहमंत्री शाह यांना जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा परिस्थिती, आंतरराष्ट्रीय सीमा आणि नियंत्रण रेषेवर सैन्याची तैनाती, घुसखोरीचे प्रयत्न, सुरू असलेल्या दहशतवादविरोधी कारवायांची स्थिती आणि सक्रिय दहशतवाद्यांची ताकद याबद्दल माहिती दिली जाणार आहे.
याआधी सुद्धा अमित शाह यांनी गृह मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह उच्चस्तरीय बैठकीत जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतला होता. शाह यांनी जम्मू-काश्मीरमध्ये नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यांबाबत चिंता व्यक्त केली होती. दि. ९ जूनपासून रियासी, कठुआ आणि डोडा येथे चार ठिकाणी दहशतवादी हल्ले झाले आहेत.
या हल्ल्यात नऊ यात्रेकरू ठार झाले, केंद्रीय राखीव पोलिस दलाचा (सीआरपीएफ) एक जवान शहीद झाला, एक नागरिक जखमी झाला आणि किमान सात सुरक्षा कर्मचारी जखमी झाले. दहशतवादी घटनांनंतर जम्मू आणि काश्मीरमधील सुरक्षा परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही एका उच्चस्तरीय बैठकीचे अध्यक्षस्थान केले. एनएसए अजित डोवाल आणि इतर वरिष्ठ अधिकारी बैठकीला उपस्थित होते.