"आम्हाला भारतासोबत एकत्र मिळून काम करायचं"; खालिस्तान समर्थक जस्टिन ट्रूडोंना सुचलं शहाणपण

    16-Jun-2024
Total Views |
 modi-trudo
 
रोम : कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी दि. १५ जून २०२४ रोजी भारतासोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली. इटलीतील जी-७ शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या भेटीदरम्यान त्यांनी हे वक्तव्य केले आहे. विशेष म्हणजे, जून २०२३ मध्ये खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरला कॅनडाच्या भूमीवर ठार केल्याचा आरोप ट्रुडो यांनी भारतावर केल्याने दोन्ही देशांच्या राजनैतिक संबंधात तणाव निर्माण झाला होता.
 
पंतप्रधान मोदी आणि कॅनडाचे पंतप्रधान ट्रूडो यांच्यातील बैठक दक्षिण इटलीच्या अपुलिया येथे जी-७ शिखर परिषदेदरम्यान झाली. दोन्ही देशांमधील तणाव वाढल्यानंतर दोन्ही नेत्यांमधील ही पहिलीच भेट होती. पंतप्रधानांच्या कार्यालयाने ट्रूडो यांच्यासोबत मोदी हस्तांदोलन करतानाची त्यांची प्रतिमा शेअर केली आहे, ज्यामध्ये "पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांची इटलीतील जी-७ शिखर परिषदेदरम्यान भेट झाली आहे." अशी माहिती दिली.
 
  
निज्जरच्या हत्येबाबत भारतावर निराधार आरोप झाल्यापासून भारत आणि कॅनडामधील द्विपक्षीय संबंधात तणाव निर्माण झाला होता. शिवाय, कॅनडाने भारतावर कोणत्याही ठोस पुराव्याशिवाय मागील निवडणुकांमध्ये हस्तक्षेप केल्याचा आरोपही केला होता. तथापि, ट्रूडोच्या अलीकडील विधानावरून असे दिसून येते की कॅनडाचे पंतप्रधान खराब झालेले संबंध दुरुस्त करू इच्छित आहेत.
 
पंतप्रधान मोदी आणि इटली, फ्रान्स आणि जपानसह विविध देशांच्या नेत्यांमध्ये द्विपक्षीय बैठका झाल्या. पंतप्रधान मोदी आणि ट्रुडो यांच्यातील भेट अधिक सौजन्यपूर्ण होती. प्रसारमाध्यमांशी बोलताना ट्रुडो म्हणाले, “आम्हाला ज्या महत्त्वाच्या, संवेदनशील मुद्द्याचा पाठपुरावा करणे आवश्यक आहे त्या तपशीलांमध्ये मी जाणार नाही, परंतु आगामी काळात एकत्रितपणे काम करण्याची ही वचनबद्धता होती." अशी प्रतिक्रिया ट्रूडो यांनी दिली.