काँग्रेसशासित कर्नाटकमध्ये भाजप नेत्याच्या घरात घुसून ४ जणांची हत्या

    19-Apr-2024
Total Views |
 Karantaka
 
बंगळुरू : काँग्रेसशासित कर्नाटकमध्ये कायदा-सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. राज्यातील गदग जिल्ह्यात नगरपालिका उपाध्यक्षांच्या घरात घुसून चार जणांची हत्या करण्यात आली. पालिकेचे उपाध्यक्ष हे भाजपचे नेते आहेत. या हल्लात त्याचा मुलगा ३ नातेवाईक मारले गेले. या प्रकरणी कर्नाटक पोलिसांचे हात अजूनही रिकामे आहेत.
 
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवार, दि. १८ एप्रिल २०२४ गदग जिल्ह्यातील गदग-बेतागेरी नगरपालिकेतील दसरा ओणी भागातील प्रकाश बकाले यांच्या घरावर हा हल्ला झाला. प्रकाश बकाले हे भाजपचे नेते असून त्यांच्या पत्नीही गदग-बेतागेरी नगरपालिकेच्या उपाध्यक्षा आहेत.
 
 
मीडिया रिपोर्ट्सनुसार, मारेकऱ्यांनी रात्री त्यांच्या घरात घुसून प्रकाश यांचा मुलगा कार्तिक बकाले (२७), परशुराम हादिमानी (५५), लक्ष्मी हादिमानी (४५) आणि आकांक्षा हादिमानी (१६) यांची हत्या केली. कार्तिकच्या लग्नाच्या तयारीत सहभागी होण्यासाठी हदिमानी कुटुंब आल्याचे सांगण्यात आले. ते बकाले कुटुंबाचे नातेवाईक होते.
 
या सर्वांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. मारेकरी छतावरून घरात घुसले आणि लोकांना मारायला सुरुवात केली, असे सांगण्यात आले. आधी एका खोलीची काच फोडून हदिमानी कुटुंबातील तिघांची हत्या केली. गोळीबाराचा आवाज ऐकून कार्तिक त्या खोलीजवळ पोहोचला तेव्हा मारेकऱ्यांनी त्याचीही हत्या केली.
 
 
यानंतर मारेकऱ्यांनी प्रकाश बकाले आणि सुनंदा बकाले यांच्या खोलीचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात त्यांना यश आले नाही. दरम्यान, प्रकाश बकाळे यांनी पोलिसांना माहिती दिली. घटनेनंतर मारेकरी पळून जाण्यात यशस्वी झाले. त्यांनी आपली शस्त्रे नाल्यात फेकून दिली.
 
मारेकऱ्यांचा शोध लावण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. गदग पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळाचा आढावा घेतला. मृतांच्या अंगावरील दागिने नेले नसल्याने ही चोरीची घटना नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी पाच अधिकाऱ्यांचे पथक तयार करण्यात आले आहे. या भीषण हत्याकांडानंतर कर्नाटकच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.