नवी दिल्ली: दिल्ली दारु घोटाळ्याप्रकरणी ईडीने के. कविता ( K. Kavita Delhi liquor scam ) यांना अटक केली होती. त्यांना सध्या तिहार तुरुंगात ठेवणयात आले आहे. गुरुवारी सीबीआयने त्यांना अटक करुन दिल्लीच्या राऊस ॲव्हेन्यू कोर्टात हजर केले. यापुर्वी त्यांची तुरुंगातच चौकशी करण्यात आली होती. के. कविता तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची मुलगी आहेत.
दिल्लीच्या राऊस ॲव्हेन्यू कोर्टात विशेष न्यायाधीश कावेरी बावेजा यांच्या समोर त्यांना हजर करणयात आले. यावेळी सीबाआयने के. कविता यांच्या पाच दिवसांच्या कोठडीची मागणी केली आहे. त्या दिल्ली मद्य घोटाळ्यातील प्रमुख आरोपींपैकी एक आहेत असा युक्तीवाद सीबीयाने केला आहे.
सीबीआयने न्यायालयाला सांगितले की, साउथ ग्रुपच्या एका मद्य व्यावसायिकाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली आणि दिल्लीत व्यवसाय करण्यासाठी त्यांचे सहकार्य मागितले. यानंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी व्यावसायिकाला सहकार्याचे आश्वासन दिले होते.
सीबीआयने कोर्टाला सांगितले की, फाईलमध्ये जोडलेल्या स्टेटमेंट आणि व्हॉट्सॲप चॅट नुसार कविता यांचे सीए बुची बाबु यांच्या चॅटवरुन असे दिसुन येते की कविता यांच्या प्रॉक्सीद्वारे इंडो स्पिरिट्समधील घाऊक परवान्यात त्यांची भागीदारी होती. सीबीआयने पुढे सांगितले की, चॅट्समधून हे देखील उघड झाले आहे की कविताने कंपनीची एनओसी मिळविण्यासाठी राघव मागुंटा यांना मदत करण्याचा प्रयत्न केला होता. दिल्लीतील ताज हॉटेलमध्ये झालेल्या बैठकीत शरत रेड्डी यांच्यासह बाबू, बोईनपल्ली आदी उपस्थित होते.
सीबीआयने पुढे सांगितले की मार्च आणि मे २०२१ मध्ये, जेव्हा उत्पादन शुल्क धोरण तयार केले जात होते, तेव्हा अरुण पिल्लई, बुची बाबू आणि बोइनपल्ली दिल्लीत राहत होते आणि विजय नायर यांच्यामार्फत लाभ घेत होते. कविता यांना दिल्लीतील दारू व्यवसायाचे आश्वासन देण्यात आले होते. कविता यांना नोव्हेंबर-डिसेंबर २०२१ मध्ये आधी ठरवलेल्या प्रति झोन ५ कोटी रुपये दराने २५ कोटी रुपये देण्यास सांगितले होते.
सीबीआयने पुढे असे म्हटले की त्यांनी कविता यांची यापुर्वीही चौकशी केली होती. पण त्यांनी चौकशीत कोणतीही समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. त्यांनी दिलेली उत्तरे ही हाती आलेल्या कागदपत्रांच्या विरुद्ध आहेत. त्यांनी अनेक तत्थे लपवण्याचा प्रयत्न केला आहे. या धोरणाशी संबंधीत मुख्य सुत्रधार आणि इतर पुरावे शोधण्यासाठी आणि कविता यांची सखोल चौकशी करण्यासाठी त्यांची पाच दिवसांची कस्टडी मिळावी.
दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने निकाल देत कविताला पाच दिवसांच्या रिमांडवर सीबीआयकडे सोपवले. न्यायालयाने नुकताच त्यांचा अंतरीम जामिन नाकारला होता. कविता यांनी दिल्ली मद्य घोटाळ्याशी संबंधीत पुरावे नष्ट करण्याचा आणि साक्षीदारांना प्रभावित करण्याचा प्रयत्न केल्याचे प्रथमदर्शनी लक्षात आले असुन त्या पुन्हा असं करु शकतात. असं न्यायालयानी यावेळी म्हटले होते.