सनातन धर्म हा शाश्वत कर्तव्यांचा समुच्चय असल्याचे निरीक्षण मद्रास उच्च न्यायालयाने नोंदवले आहे. उदयनिधी स्टॅलिन याने सनातनविरोधात केलेल्या वक्तव्यानंतर सनातनविरोधात होत असलेल्या वादविवादांबद्दल न्यायालय जागरूक आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. स्टॅलिन हा केवळ निमित्तमात्र. भाजपचा पराभव करण्यासाठी विरोधी पक्षांची मोट बांधणारी देशविरोधी काँग्रेस, ही त्याची बोलवता धनी आहे.
सनातन धर्म हा शाश्वत कर्तव्यांचा समुच्चय असून, सनातन धर्म हा केवळ धार्मिक आणि आध्यात्मिक बाबींचा नसून, त्यात सामाजिक आणि नैतिक मूल्यांचाही समावेश असल्याचे निरीक्षण मद्रास उच्च न्यायालयाने नोंदवले आहे. सनातन धर्माचे मूलभूत तत्त्व हे आहे की, सर्व जीवांमध्ये परमात्म्याचा अंश असतो. याचा अर्थ सर्व जीव एकमेकांशी जोडलेले असून, त्यांनी एकमेकांशी प्रेम तसेच करुणेने वागले पाहिजे. सनातन धर्माचे आणखी एक मूलभूत तत्त्व म्हणजे कर्तव्याची भावना. सनातन धर्मात प्रत्येक व्यक्तीने काही कर्तव्ये पार पाडणे आवश्यक आहे, जसे की पालकांचा आदर करणे, शिक्षकांप्रती कृतज्ञ असणे आणि समाजाची सेवा करणे, असेही न्यायालयाने म्हटले आहे. तसेच सनातन धर्म हा केवळ धर्म नसून, जीवनपद्धती आहे. सनातन धर्माचे अनुयायी केवळ धार्मिक विधी आणि परंपरांचे पालन करीत नाहीत, तर सामाजिक आणि नैतिक मूल्यांवरही भर देतात, असे निरीक्षण न्यायालय नोंदवते.
घटनेचे ‘कलम १९ (१)’ अभिव्यक्ती स्वातंत्र्य देते. मात्र, त्याचा वापर करताना कोणाच्याही भावना दुखावणार नाही, याची काळजी घेणे अभिप्रेत आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्मासंबंधी केलेल्या टिप्पणीसंबंधात मद्रास उच्च न्यायालयाने ही निरीक्षणे नोंदवली आहेत. सनातन धर्माविरोधात होणार्या वादविवादांबद्दल न्यायालय जागरूक आहे. तसेच, या मुद्द्यावर न्यायालय चिंतेत आहे. आजूबाजूला काय चालले आहे, याचा विचार करण्यापासून आम्ही स्वतःला रोखू शकत नाही, असेही न्यायालयाने म्हटले आहे.न्यायालयाची भूमिका ही निश्चितच स्वागतार्ह अशीच. त्यांनी दाखवलेली सजगता ही कौतुकास्पदच. न्यायालयाने सनातन धर्माला मानवी अस्तित्वाच्या धार्मिक आणि आध्यात्मिक ते सामाजिक आणि नैतिक अशा सर्व पैलूंचा समावेश असलेली व्यापक जीवनपद्धती म्हणून मान्यता दिली आहे, हे जास्त महत्त्वाचे. सनातन धर्म हा जगातील सर्वात जुना धर्म आहे.
समृद्ध इतिहास आणि परंपरा असलेला, तो वैविध्यपूर्ण धर्म म्हणून ओळखला जातो. तो परमेश्वराचे अस्तित्व मानतो. आत्मा अमर आहे. ही सनातन धर्माची शिकवण. सनातन याचा अर्थच शाश्वत किंवा कालातीत असा. धर्मात कर्तव्य किंवा योग्य आचरण अभिप्रेत आहे. सर्व जीवांना शाश्वत कर्तव्याची शिकवण देणारा, स्वतःशी, इतरांशी तसेच निसर्गाशी एकरूप होऊन जगावे, अशी शिकवण देणारा हा धर्म. काळाच्या ओघात याची उत्पत्ती केव्हा झाली, हे नक्की सांगणे अशक्यप्राय असेच. तथापि, हिंदू धर्मातील सर्वात जुने धर्मग्रंथ वेद यांची रचना साडे तीन हजार वर्षांपूर्वी केली गेली, असे मानले जाते. शतकानुशतके सनातम धर्माचा विकास होत आहे.अनेक विचारसरणींना मान्यता देणारा हा धर्म. वेद, उपनिषदे तसेच श्रीभगवद्गीतेवर विश्वास ठेवतो. अद्वैत, द्वैत वेदांत तसेच विशिष्टाद्वैत वेदांत यांसारख्या विविध सिद्धातांना तो मान्यता देतो. ब्रह्म, आत्मा, कर्म सिद्धांत, पुनर्जन्म या त्याच्या प्रमुख संकल्पना आहेत. योग, ध्यान, पूजा यांसारख्या प्रथाही जगन्मान्य. भारतीय समाज आणि संस्कृतीवर सनातन धर्माचा पगडा अर्थातच आहे. संपूर्ण जगावरच त्याचा प्रभाव आहे.
ब्रह्म हे सर्वोच्च अस्तित्व. सर्व सृष्टीचा तो उगम असल्याचे सनातन मानतो. आत्मा हा अमर आहे, यावर ठाम विश्वास. कर्म हेच कारण आणि परिणाम. मोक्ष मिळेपर्यंत जन्म, मृत्यू आणि पुनर्जन्म यांचे अव्याहत चक्र सुरूच राहते, ही शिकवण सनातन धर्म देते. ‘स्वतःशी, इतरांशी आणि निसर्गाशी एकरूप होऊन जगणे, हे सनातन धर्माचे सार आहे,’ असे स्वामी विवेकानंद यांनी नमूद केले आहे. हा प्रदीर्घ इतिहास असलेला, समृद्ध आणि चैतन्यशील धर्म आहे. शाश्वत कर्तव्यांची शिकवण देणारा तो धर्म आहे. ‘सनातन धर्म हा आपल्या सर्व मूल्यांचा आणि परंपरांचा उगम आहे. तो आपल्या संस्कृतीचा आणि सभ्यतेचा पाया आहे,’ असे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत म्हणतात.सनातनविरोधी कूनीती समूळ नष्ट करण्यासाठी समाजाने संघटित होण्याची गरज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने विशद केली आहे. धर्म आणि सनातन धर्म यात हेतूतः बुद्धिभेद केला जात आहे, हे संघाने अधोरेखित केले आहे. वरकरणी धर्म (रिलिजन) आणि सनातन धर्म या संकल्पना एकच आहेत, असे भासवले जाते. परंतु, त्यांच्यात काही महत्त्वाचे मतभेद आहेत.
धर्म ही सामान्यतः श्रद्धा आणि प्रथांची एक प्रणाली असल्याचे मानले जाते, जी कधीकधी मानवतेशी, अध्यात्माशी आणि नैतिक मूल्यांशी संबंधित असते. त्याचवेळी सनातन हा शाश्वत धर्म आहे. ती एक वैविध्यपूर्ण परंपरा आहे. ज्यामध्ये धार्मिक, तात्विक आणि नैतिकता यांचा विस्तृत विचार करण्यात आला आहे. सनातन धर्म हा जीवनाचा एक मार्ग म्हणून पाहिला गेला असून, तो एखाद्या जीवाचे अस्तित्वालाही महत्त्व देतो. धर्माचा संबंध विशिष्ट श्रद्धा आणि प्रथांशी असतो, तर सनातन हा सर्वसमावेशक असा आहे. सनातन धर्म मुक्तीचे मार्ग वेगवेगळे असल्याचे सांगतो, प्रत्येक व्यक्तीने त्याच्यासाठी योग्य तो मार्ग शोधला पाहिजे, ही त्याची शिकवण आहे. म्हणूनच सनातन हा वैश्विक परंपरा ठरतो. ही परंपरा सर्वांसाठी ज्ञानाची कवाडे उघडी करते; तसेच भूतदयेची शिकवण देते.
या पार्श्वभूमीवर काँग्रेसप्रणित ‘इंडिया’ आघाडी सनातन धर्माविरोधात का वक्तव्ये करीत आहे, ते लक्षात येते. हिंदू हा सहिष्णू आहे. म्हणूनच तो सर्वधर्मियांचा आदर करतो, त्यांच्या धार्मिक रुढी-परंपरांचा अनादर करीत नाही. मात्र, काँग्रेसी प्रवृत्ती हिंदुत्वाच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करीत असतील, तर हिंदूंनी ते सहन का करायचे, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावरच बोट ठेवले आहे. विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीला सनातन धर्म नष्ट करायचा आहे आणि देशाला एक हजार वर्षांच्या गुलामगिरीत ढकलायचे आहे, असा आरोप ते करतात. शाश्वत सनातनविरोधात बोलणार्यांना योग्य ते उत्तर द्या, असे निर्देशही त्यांनी दिले आहेत. विरोधी पक्षांची ही आघाडी देशविरोधी आहे. उदयनिधी स्टॅलिन हा फक्त निमित्त आहे. या आघाडीच्या माध्यमातून भाजपचा पराभव करिता येईल, अशी स्वप्ने पाहणारी देशविरोधी काँग्रेस ही स्टॅलिन याची बोलवता धनी आहे, हे समजून घेणे नितांत गरजेचे."
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.