राज्यात पावसाची दमदार बॅटिंग! काही भागांत ढगफुटीसदृश्य पाऊस

22 Jul 2023 15:18:03
Maharashtra State Monsoon Update

मुंबई
: राज्यात गेल्या काही दिवसांपासून तुफान पाऊस सुरु असून काही भागात दरड कोसळल्याच्या दुर्घटना घडल्या आहेत. दरम्यान, गेल्या दोन दिवसांपूर्वी रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडीवर डोंगर कोसळला त्यात २० जणांना आपला जीव गमवावा लागला. मध्य महाराष्ट्र, चंद्रपूर , गडचिरोली भागांना हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला होता. दरम्यान, यवतमाळ तालुक्यात पावसाची जोरदार बॅटिंग सुरु असून आनंदनगर ताडा भागात पुराच्या पाण्यात जवळपास ४५ लोक अडकले असून राज्य शासनाकडून बचावकार्य सुरु आहे.

दरम्यान, नांदेड जिल्ह्याला देखील पावसाने अक्षरशः झोडपून काढले असून आदमपूर ता. बिलोली परिसरात ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्याचे समजते आहे. तसेच, संग्रामपूर तालुक्यात पावसामुळे हाहाकार माजला असून ढगफुटीसदृश्य पावसामुळे या भागातील नद्या नाल्यांना पूर आला आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभागाकडून या भागांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला होता. दरम्यान, गेल्या ४८ तासांत विदर्भ, मराठवाड्यात मुसळधार पाऊस झाला असून यात वीज पडल्याने ७ जणांचा मृत्यु झाला आहे.


Powered By Sangraha 9.0