कीर्तनकारांना 'घुसखोर' म्हणणाऱे, शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडेंना अखेर अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. अतिरिक्त सत्र न्यायालयाने दिलेला अंतरिम अटकपूर्व जामीन रद्द झाल्यानंतर वाघोली पोलिसांनी तातडीने त्यांना ताब्यात घेतले. शरद पवार यांनी वारकरी संप्रदायात प्रतिगामींची घुसखोरी वाढत असल्याचं वक्तव्य केलं होतं. त्यालाच दुजोरा देत विकास लवांडेंनी वारकरी संप्रदायातील कथित घुसखोर म्हणून २० जणांची नावे जाहीर केली होती. त्यानंतरच या प्रकरणाची सुरूवात झाली होती. आता हा संपूर्ण वाद नेमका काय आहे? यात शरद पवारांची भूमिका काय होती? आणि आताचे अपडेट्स काय आहे सविस्तर जाणून घेऊयात..... (Vikas Lawande arrested)
महाराष्ट्राच्या संतपरंपरेला हजारो वर्षांची पवित्र आणि समृद्ध परंपरा लाभली आहे. या भूमीवर वारकरी संप्रदायाने नेहमीच भक्ती, समता, सेवा आणि मानवता यांचा संदेश दिला आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ यांसारख्या महान संतांनी समाजात प्रबोधनाची ज्योत पेटवली. अशा पवित्र आणि लोकाभिमुख संप्रदायातील कीर्तनकारांना आणि संतांच्या परंपरेत काम करणाऱ्या साधकांना ‘घुसखोर’ म्हणणे हे केवळ अपमानकारक नाही, तर वारकरी संस्कृतीच्या भावविश्वावर थेट आघात करणारे आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्याविरोधात राज्यभर तीव्र संतापाची लाट उसळली आहे. (Vikas Lawande arrested)
हेही वाचा: कोर्टाने अटकपूर्व जामीन फेटाळताच लवांडेना पुण्यातून अटक! कीर्तनकारांना घुसखोर म्हणणे चांगलेच भोवले
शरद पवार यांनी अलीकडेच वारकरी संप्रदायात प्रतिगामी विचारसरणीची घुसखोरी होत असल्याचे वक्तव्य केले होते. त्यानंतर विकास लवांडे यांनी काही कीर्तनकार आणि प्रवचनकारांची नावे सार्वजनिक करत त्यांना ‘घुसखोर’ असे संबोधले. या वक्तव्यामुळे वारकरी समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या. कारण वारकरी संप्रदाय हा कोणत्याही राजकीय अजेंड्याचा भाग नसून, तो भक्ती, शिस्त, समाजसुधारणा आणि व्यसनमुक्तीचा शाश्वत मार्ग आहे. या परंपरेने महाराष्ट्रातील गावोगावी जनजागृती केली, अंधश्रद्धा कमी केली, आणि सामान्य माणसाच्या मनात नैतिकतेचा दीप प्रज्वलित केला. अशा परंपरेवर संशयाची, अपमानाची आणि कलंकाची भाषा वापरणे हे वारकऱ्यांना मान्य होणे शक्यच नव्हते. आणि याच संतापातून ९ मे २०२६ रोजी म्हातोबाची आळंदी ते पुणे या प्रवासादरम्यान काही वारकाऱ्यांकडून त्यांना काळं फासण्यात आलं. या घटनेनंतर पक्षातील कार्यकर्त्यांनी लवांडे यांचा दुग्धाभिषेक करत समर्थन व्यक्त केले होते. मात्र त्यानंतर, वाघोली परिसरात विकास लवांडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकरण न्यायालयात गेले आणि अटकपूर्व जामीन मिळाल्यानंतरही, त्यांनी अर्जात पूर्वीचे गुन्हे लपवल्याचा मुद्दा, सरकारी पक्षाने उपस्थित केला. न्यायालयाने हे गंभीर मानून त्यांचा अंतरिम जामीन रद्द केला. त्यानंतर गुरूवारी २१ मे रोजी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. ही कारवाई केवळ कायदेशीर नव्हे, तर नैतिकदृष्ट्याही महत्त्वाचीच म्हणावी लागेल, कारण वारकरी परंपरेचा अपमान करून, राजकीय लाभ मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना कायदा उत्तर देतो, हे यातून स्पष्ट झाले. (Vikas Lawande arrested)
या संपूर्ण प्रकरणात संग्राम बापू भंडारे यांनी म्हटलं आहे की, अखेर कायदेशीर मार्गाने लवांडेंचे तोंड काळे करण्याचे काम हिंदू धर्मीयांनी केलेय, असे म्हणता येईल. वारंवार कायद्यातील पळवाटा शोधत, कायद्यापासून दूर राहत असलेला लवांडे कायद्याच्या चक्रामध्ये अडकलाच. त्याचा अंतरिम जामीन रद्द होताच महाराष्ट्र पोलिसांनी केलेल्या या कारवाईबाबत त्यांचे मनःपूर्वक आभार. साधू संतांची परंपरा पुढे घेऊन जाणाऱ्या महनीय मंडळींबाबत बोलताना प्रत्येकाने विचार करायला हवा. लवांडे अशा लोकांबाबत गरळ ओकण्याचे काम, फेक नॅरेटिव्ह सेट करण्याचे काम करत होता, त्यामुळे त्याच्यावर कारवाई करण्याची आमची मागणी होती. आज कायद्याचा फटका लवांडेला बसला. (Vikas Lawande arrested)
आज या प्रकरणाने एक गोष्ट पुन्हा अधोरेखित केली आहे की, संतपरंपरेचा आणि वारकरी संप्रदायाचा अपमान करून कोणीही स्वतःला मोठे ठरवू शकत नाही. महाराष्ट्राच्या मातीत संतांचा वारसा हा केवळ पूजनीय नाही, तर तो लोकांच्या जगण्याचा आधार आहे. त्यामुळे अशा भाषेला आणि अशा वक्तव्यांना वारकरी समाजाकडून तीव्र प्रत्युत्तर मिळणे साहजिकच आहे. या प्रकरणात कायदा आपले काम करेल, पण जनमानसात मात्र संतांचा आणि वारकरी परंपरेचा सन्मान अधिकच दृढ झाला आहे. हे महत्तवाचं. (Vikas Lawande arrested)