मुंबई (विशेष प्रतिनिधी) : शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडेंना अटक केल्याची माहिती समोर आली आहे. अतिरिक्त सत्र न्यायालयाने दिलेला अंतरिम अटकपूर्व जामीन रद्द झाल्यानंतर वाघोली पोलिसांनी तातडीने त्यांना ताब्यात घेतले. शरद पवार यांनी वारकरी संप्रदायात प्रतिगामींची घुसखोरी वाढत असल्याचं वक्तव्य केलं होतं. त्यालाच दुजोरा देत विकास लवांडेंनी वारकरी संप्रदायातील कथित घुसखोर म्हणून २० जणांची नावे जाहीर केली होती.
त्यांच्या या वक्तव्यामुळे वाघौली पोलीस ठाण्यात लवांडेंविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला होता. प्रकरण न्यायालयात पोहोचल्यानंतर अतिरिक्त सत्र न्यायालयाने त्यांना २० मे पर्यंत अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला होता. तपासादरम्यान असे लक्षात आले की, लवांडेंनी अटकपूर्व जामीनासाठी दाखल केलेल्या अर्जात स्वतः विरोधातील पूर्वीचे चार गुन्हे नमूद न केल्याचा मुद्दा सरकारी पक्षाने न्यायालयासमोर उपस्थित केला आणि त्यांनी ही माहिती लपवल्याचा दावा करत अंतरिम संरक्षण रद्द करण्याची मागणी केली. न्यायलयाने युक्तिवाद मान्य करत विकास लवांडेंचा अंतरिम अटकपूर्व जामीन रद्द केला. त्यानंतर काही तासांतच पोलिसांनी त्यांना गुरुवारी ताब्यात घेतले.
म्हातोबाची आळंदी ते पुणे प्रवासादरम्यान लोणी काळभोर परिसरात दि. ९ मे रोजी विकास लवांडेंना काळं फासल्याची घटना घडली होती. संग्रामबापू भंडारे यांच्यासह २० कीर्तनकारांना 'घुसखोर' म्हटल्याने वारकरी संप्रदायातून संताप व्यक्त करण्यात आला होता. या घटनेनंतर पक्षातील कार्यकर्त्यांनी लवांडे यांचा दुग्धाभिषेक करत समर्थन व्यक्त केले होते.
कायद्याचा फटका लवांडेला बसलाच!
अखेर कायदेशीर मार्गाने लवांडेंचे तोंड काळे करण्याचे काम हिंदू धर्मीयांनी केलेय, असे म्हणता येईल. वारंवार कायद्यातील पळवाटा शोधत, कायद्यापासून दूर राहत असलेला लवांडे कायद्याच्या चक्रामध्ये अडकलाच. त्याचा अंतरिम जामीन रद्द होताच महाराष्ट्र पोलिसांनी केलेल्या या कारवाईबाबत त्यांचे मनःपूर्वक आभार. साधू संतांची परंपरा पुढे घेऊन जाणाऱ्या महनीय मंडळींबाबत बोलताना प्रत्येकाने विचार करायला हवा. लवांडे अशा लोकांबाबत गरळ ओकण्याचे काम, फेक नॅरेटिव्ह सेट करण्याचे काम करत होता, त्यामुळे त्याच्यावर कारवाई करण्याची आमची मागणी होती. आज कायद्याचा फटका लवांडेला बसला.
- संग्रामबापू भंडारे