मुंबई : (Illegal Infiltration in Assam) आसाम आणि पूर्वोत्तर भारतातील अवैध घुसखोरीची समस्या आपोआप उद्भवलेली नसून ती एका विशिष्ट वर्गाने नियोजनपूर्वक आणि संघटित पद्धतीने घडवून आणलेली आहे', असे मत इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पॉप्युलेशन सायन्सेस, मुंबई (आयआयपीएस) च्या जनस्वास्थ्य व मृत्युदर तज्ज्ञ प्रा. नंदिता सैकिया यांनी व्यक्त केले. विविध काळात काही गटांनी या समस्येचा राजकीय फायद्यासाठी वापर केल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
गुवाहाटीच्या भरलुमुख येथील आलोक भवन मधील मधुकर लिमये भवनात पूर्वोत्तर भारत अध्ययन समूहाच्या वतीने विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. “आसामची बदलती लोकसंरचना : बेकायदेशीर घुसखोरी आणि त्याचा सुरक्षा, समाज तसेच स्थानिक ओळखीवर होणारा परिणाम” या विषयावर आयोजित व्याख्यानात प्रा. नंदिता सैकिया या प्रमुख वक्त्या म्हणून उपस्थित होत्या.
त्यांनी नमूद केले की, ऐतिहासिकदृष्ट्या आसाम ही स्थलांतरितांची भूमी राहिली आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते स्वातंत्र्योत्तर काळापर्यंत आसाममध्ये स्थलांतराची कारणे, प्रक्रिया तसेच त्याचा आसामी जनजीवन आणि संपूर्ण पूर्वोत्तर भागावर झालेला नकारात्मक व गंभीर परिणाम यावर त्यांनी सविस्तर चर्चा केली. उपस्थितांना संबोधत त्या म्हणाल्या, घुसखोरीची समस्या केवळ आसाम किंवा पूर्वोत्तर भारतापुरती मर्यादित नसून, ती संपूर्ण भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेशी, सार्वभौमत्वाशी आणि विविध समाजघटकांच्या सांस्कृतिक ओळखीशी संबंधित आहे. घुसखोरीमुळे आसाममध्ये ‘लव्ह जिहाद’ तसेच गुन्हेगारी कारवायांमध्ये वाढ झाली असून स्थानिक भाषा आणि संस्कृतीवरही संकट निर्माण झाले आहे. सध्या आसाममध्ये घुसखोरांनी सिक्कीमइतक्या भूभागावर अतिक्रमण केले आहे.
या गंभीर समस्येच्या निराकरणासाठी त्यांनी त्रुटीमुक्त आणि अचूक एनआरसीच्या समर्थनासोबतच शासन आणि नागरिक समाजाच्या सक्रिय सहभागाची आवश्यकता अधोरेखित केली. त्यांनी इशारा दिला की, बदलत्या लोकसंरचनेच्या या प्रश्नाकडे वेळेत गांभीर्याने लक्ष दिले नाही, तर भविष्यात आसामलाही काश्मीरसारख्या अस्थिर परिस्थितीला सामोरे जावे लागू शकते.
प्रा. नंदिता सैकिया यांनी आसामच्या लोकसंरचनेत होत असलेल्या बदलांच्या अनेक महत्त्वपूर्ण आणि अर्थपूर्ण पैलूंवर प्रकाश टाकला. विशेषतः आसाममधील बेकायदेशीर स्थलांतराचा इतिहास, सध्याच्या घुसखोरीचे अंदाजित सांख्यिक स्वरूप, बेकायदेशीर स्थलांतरितांच्या स्थायिक होण्याची प्रक्रिया, सामाजिक परिणाम, संभाव्य संकटमय भविष्य तसेच आसामी समाजाची आवश्यक भूमिका या विषयांवर त्यांनी तथ्याधारित मांडणी केली.
अध्ययन समूहाच्या सदस्या अरुपा बरठाकूर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. या व्याख्यानाला शंभरहून अधिक श्रोत्यांची उपस्थिती होती. गुवाहाटी विद्यापीठच्या भौतिकशास्त्र विभागप्रमुख प्रा. कल्पना बोरा यांनी आभार प्रदर्शन केले, तर अध्ययन समूहाचे सदस्य चिन्मय किशोर यांनी शांती मंत्र पठण केले.
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक