महात्मा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त वर्षभर विविध कार्यक्रम राबवा; मुख्यमंत्र्यांचे निर्देश

    01-Apr-2026   
Total Views |
Devendra Fadnavis
 
मुंबई : (Devendra Fadnavis) क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या द्विशताब्दी वर्षानिमित्त वर्षभर विविध कार्यक्रम आयोजित करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी दिले.
 
मंत्रालयात आयोजित क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले यांचे द्विशताब्दी जयंती वर्ष साजरे करण्यासाठी गठीत समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, यांच्यासह इतर मंत्री उपस्थित होते.
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "दि. ११ एप्रिल २०२६ ते १० एप्रिल २०२७ हा कालावधी महात्मा जोतिराव फुले यांचे द्विशताब्दी जयंती वर्ष म्हणून साजरे करण्यात येत आहे. या द्विशताब्दी वर्षानिमित्त त्यांचे कार्य, विचार पुढील पिढीपर्यंत प्रभावीपणे नेण्याची संधी असून त्यांच्या कार्यावर आधारित विविध कार्यक्रमांची वार्षिक दिनदर्शिका बनवून वर्षभर कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन करावे."
 
हेही वाचा : Ashok Kharat case: अशोक खरात प्रकरण आणखी गुंतागुंतीचे? विशेष सरकारी वकीलांनी घेतली माघार?
 
"गठीत समितीमध्ये संलग्नित विभागाने किमान दोन ते तीन कार्यक्रमांचे आयोजन करावे. अशा प्रेरक कार्यक्रमांचे नियोजन १५ एप्रिल पर्यंत द्यावे. महात्मा जोतिराव फुले यांचे मूळ गाव खानवडी (ता. पुरंदर, जि. पुणे) येथील त्यांच्या स्मृती जपणाऱ्या जिल्हा परिषद शाळेचा कायापालट करण्यात आला आहे. या द्विशताब्दी जयंती वर्षाची सुरुवात ११ एप्रिल रोजी सीबीएससी शिक्षण, आधुनिक सुविधांनी युक्त खानवडी जिल्हा परिषद शाळेच्या लोकार्पण कार्यक्रमाने करावी. यासाठी गठीत मंत्री समितीच्या अंतर्गत वर्षभर कार्यक्रमांची यशस्वी अंमलबजावणी करणे, या कार्यक्रमांचे संनियंत्रण करण्यासाठी उपसमितीची निर्मिती करावी," असेही त्यांनी सांगितले.
 
हे वाचलत का? - Maharashtra cabinet decisions: राज्य मंत्रिमंडळ बैठकीत १,२३४ कोटींच्या सिंचन योजनेसह सहा महत्त्वाचे निर्णय!
 
महात्मा फुले यांच्यावरील साहित्य बहुभाषेत अनुवाद व्हावा
 
"महात्मा जोतिराव फुले यांच्या जीवन कार्यावर आधारित असलेल्या साहित्य संपदेचा बहुभाषेत अनुवाद झाला पाहिजे. जेणेकरून सबंधित भाषिक नागरिकांना त्यांच्या भाषेत साहित्य उपलब्ध होईल. शालेय शिक्षण विभागाकडून आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमांमध्ये खासगी शाळांनाही सहभागी करून घ्यावे. प्रत्येक मंत्री, विभागाने दिलेल्या सूचनांचे एकत्रीकरण करून त्यावर आवश्यक कार्यवाही करावी," असे निर्देशही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
 
 

अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....