मुंबई : (Devendra Fadnavis) आमच्या २४४ पोलिसांनी माओवाद संपवण्यासाठी शहीदी दिली. ज्या ज्या लोकांनी किमान तीन वर्षे सी ६० दलात काम केले त्या सगळ्यांना सी ६० मेडल देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी केली.
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या अर्धवार्षिक परिषदेनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "आज वरिष्ठ पोलीस अधिकारी यांची अर्धवार्षिक परिषद आयोजित करण्यात आली होती. यामध्ये विविध विषयांवर चर्चा आणि सादरीकरण करण्यात आले. विविध गोष्टींवर आधारित राज्यांना १०६ मुद्यांवर काम करायचे होते. त्याचे सादरीकरण करून महाराष्ट्राने त्या मुद्दयांचे काय केले हे वरीष्ठ अधिकाऱ्यांनी आमच्यासमोर मांडले. विशेषत: पोलिस विभागाने सातत्याने प्रयत्न करून महाराष्ट्रात माओवाद जवळपास संपूष्टात आणला, याबद्दल मी त्यांचे अभिनंदन केले."
९५ टक्क्यांपर्यंत अपराध सिद्धीचा दर वाढवण्याचे उद्दिष्ट
"एआयचा उपयोग करून काही टुल्स तयार केले आहेत. एखाद्या गुन्ह्यात एफआयआरपासून तर आरोप पत्रापर्यंत अनेक गोष्टींमध्ये त्याचा उपयोग करू शकतो. पुढच्या सहा महिन्यात ही सगळी प्रक्रिया डिजिटाईज व्हावी, असा एक टास्क पोलिस महासंचालकांना दिला आहे. अपराध सिद्धीचा दर महाराष्ट्राने चांगल्या पद्धतीने वाढवला आहे. पण अद्यापही आपण आपल्या ध्येयापेक्षा खूप मागे आहोत. आपल्याला ९५ टक्क्यांपर्यंत अपराध सिद्धीचा दर न्यायचा असून आता आपण ५० टक्क्यांवर आहोत," असेही त्यांनी सांगितले.
"पोलिसांनी प्रयत्न करून राज्यातील अपघातांमध्ये कमतरता आणली आहे. पण त्यावर अजून चांगले काम करण्याची आवश्यकता असून त्यादृष्टीने काही प्रयोग झाले आहेत. महाराष्ट्रात रस्ते अपघात कसे कमी करता येतील याबद्दल चर्चा झाली. तसेच राष्ट्रीय सुरक्षेचे मुद्दे आणि सायबर स्पेसमध्ये होणाऱ्या गुन्ह्यांसंदर्भातही यावेळी चर्चा झाली. ड्रग्ज फ्री कॅम्पस ही संकल्पना दृढतेने करण्याबाबत विचार झाला. पुढच्या काळात महाराष्ट्रात ड्रग्जविरोधात मोठी लढाई सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. वेगवेगळ्या प्रमुख गुन्ह्यांमध्ये कुठल्या जिल्ह्यांचे काम चांगले आहे आणि कुठल्या जिल्ह्यांमध्ये अजून काम करण्याची आवश्यकता आहे, याचे मुल्यांकन करण्यात आले आहे. पुढच्या ६ महिन्यांत प्रत्येक जिल्ह्याने आजच्या सरासरीपेक्षा वर जाण्याचे टार्गेट ठरवण्यात आले आहे. चांगले काम करणाऱ्यांना पोलिस महासंचालक दर महिन्याला पुरस्कृत करतील आणि जे कमी पडतील त्यांना सूचना देतील."
"सातारा जि. प. निवडणूक राड्याप्रकरणी पोलीस अधीक्षक तुषार दोशी रजेवर गेले आहेत. यासंदर्भात सुरु असलेल्या प्राथमिक चौकशीवर परिणाम होऊ नये यासाठी ते रजेवर गेलेत. चौकशी ही कुण्या एका व्यक्तीची होत नसून झालेल्या घटनेची चौकशी करू. त्यामुळे ज्यांनी ज्यांनी कायदा सुव्यवस्था बिघडवली असेल त्यांचे कार्य रिपोर्टमध्ये येईल," असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....