अधिकाऱ्यांचे भोंदुबाबाशी संबंध असल्याचे पुरावे द्या; मंत्री बावनकुळे यांचे वडेट्टीवारांना आव्हान

    30-Mar-2026   
Total Views |
Chandrashekhar Bawankule
 
मुंबई : (Chandrashekhar Bawankule) भोंदुबाबा अशोक खरातशी सरकारी अधिकाऱ्यांचे संबंध असल्याचे पुरावे द्या, असे खुले आव्हान महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांना दिले आहे.
 
वडेट्टीवार यांनी अशोक खरात प्रकरणावरून सरकारी अधिकाऱ्यांवर आरोप केले होते. यावर उत्तर देताना मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "विजय वडेट्टीवार यांनी माझ्याकडे तक्रार द्यावी. मी एका ट्विटवरून कारवाई सुरु केली आहे. वडेट्टीवार यांच्याकडे अधिकची माहिती असेल तर नुसता माध्यमांमध्ये भोंगा वाजवून काहीही होणार नाही. त्यांनी तपास यंत्रणांना, सरकारला किंवा मुख्यमंत्र्यांना कळवले पाहिजे. यामध्ये कुठले अधिकारी सहभागी आहेत, त्यांचा पर्दाफाश केला पाहिजे."
 
चौकशीवर दबाव येऊ नये
 
त्यावर सरकार गंभीरपणे काम करेल. पण नुसता माध्यमांमध्ये बाईट देऊन प्रसिद्धी मिळवण्याचा उद्योग त्यांनी करू नये. खरातचे प्रकरण संवेदनशील आहे. आपल्या कुठल्याही बोलण्याने चौकशीवर दबाव येऊ नये, याची काळजी वडेट्टीवार यांनी घेतली पाहिजे. यात कुठला महसुली अधिकारी सहभागी आहे, याबद्दलचे पत्र वडेट्टीवार यांनी माझ्याकडे द्यावे. मी त्यांची वाट बघेन. कुठल्याही अधिकाऱ्याबद्दल किंवा त्यांच्या परिवाराबद्दल असे बोलणे योग्य नाही. वडेट्टीवार यांनी त्यांच्याकडे असलेली गोपनीय माहिती सरकारकडे दिली पाहिजे," असेही ते म्हणाले.
 
हेही वाचा : Ashok Kharat case: खरात प्रकरणात राजकीय भूकंप?; तृप्ती देसाईंचा गंभीर आरोप, म्हणाल्या "नीलम गोऱ्हे..."
 
दमदाटी करण्याचा काँग्रेसचा धंदा
 
प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या टीकेवर बोलताना ते म्हणाले की, "आम्ही अहंकारात आहोत की, नाही हे जनतेला माहित आहे. आम्ही विनम्रपण निवडणुका लढतो. विकसित भारताचा संकल्प जनतेला सांगतो. जनतेला दिलेला जाहीरनामा पाच वर्षात निवडून आल्यानंतर पूर्ण करतो. म्हणून लोक आम्हाला मत देतात. आम्ही कधीच दमदाटी करत नाही किंवा कोणाला प्रलोभन दाखवत नाही. हा धंदा काँग्रेसचा आणि बाकी लोकांचा आहे. प्रकाश आंबेडकर यांनी तपासून घेतले पाहिजे."
 
खतांची साठेगिरी करणाऱ्यांना सोडणार नाही
 
"चुकीच्या पद्धतीने काहीतरी माध्यमांमध्ये पसरवले जात आहे. सिलेंडर, गॅस, पेट्रोल, डिझेल खते याबद्दल चुकीची माहिती पसरवली जात आहे. पण कुणालाही घाबरण्याची गरज नाही. सरकारचे पूर्ण लक्ष आहे. कुठलाही दुकानदार खतांची साठेगिरी करत असल्यास त्याला सोडणार नाही," असा इशाराही मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला.
 
 

अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....