मालवणीत रामनवमी शोभायात्रेदरम्यान पुन्हा दगडफेक!

दोन वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती; रामभक्तांकडून दोषींवर कारवाईची मागणी

    27-Mar-2026   
Total Views |
Stone Pelting During Ram Navami
 
मुंबई : (Stone Pelting During Ram Navami) मालवणी परिसरात श्रीराम नवमीच्या शोभायात्रेदरम्यान पुन्हा एकदा दगडफेकीची घटना घडल्याने तणावाचे वातावरण निर्माण झालेय. दोन वर्षांपूर्वीही याच शोभायात्रेदरम्यान अशाच प्रकारची घटना घडली होती. त्यामुळे अशा घटनेच्या पुनरावृत्तीने कायदा-सुव्यवस्था आणि सुरक्षेच्या उपाययोजनांवर प्रश्न उपस्थित झाल्याचे बोलले जात आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, दरवर्षीप्रमाणे अंबुजवाडी, मालवणी गेट क्रमांक ८ येथून सुरू होणारी ही शोभायात्रा अब्दुल हमीद रोड मार्गे गेट क्रमांक १ पर्यंत पार पडते. हजारो भाविक यात सहभागी होतात. यंदा देखील मोठ्या संख्येने भाविक उपस्थिती असताना, मालवणी गेट क्रमांक ५, सवेरा टॉकीज परिसरात शोभायात्रेतील प्रभू श्रीरामाच्या भव्य पुतळ्यावर दगडफेक झाल्याचे समोर आले. ही घटना मालवणी पोलीस ठाणे पासून अत्यंत कमी अंतरावर घडल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे बंदोबस्त असूनही अशी घटना कशी घडली, यावर प्रश्न उपस्थित होत आहेत.
 
दोन वर्षांपूर्वी झालेल्या घटनेनंतर प्रशासनाने खबरदारी म्हणून शोभायात्रेच्या मार्गावरील दुकाने आणि वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. यंदाही काही प्रमाणात निर्बंध ठेवण्यात आले होते. तरीही घटना घडल्याने केवळ तात्पुरत्या उपाययोजना अपुऱ्या ठरत असल्याचे मत व्यक्त होत आहे. पोलिसांनी सध्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला असून, संबंधितांना ओळखून लवकरच कारवाई केली जाईल, असे सांगण्यात आले आहे.
 
हेही वाचा : अक्षरधाम येथे नीलकंठ वर्णी यांच्या १०८ फूट उंच मूर्तीचे अनावरण
 
अहिल्यानगरात मौलानासह १० ते १२ जणांविरोधात गुन्हा दाखल
 
अहिल्यानगरच्या श्रीरामपूर शहरात रामनवमीच्या निमित्ताने निघालेल्या मिरवणुकीदरम्यान सुद्धा दगडफेकीची घटना घडली. या प्रकारात तीन जण जखमी झाले असून, त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. गुरुवारी सायंकाळी सुमारे चार वाजण्याच्या सुमारास सय्यद बाबा चौकातून मिरवणुक भजन-कीर्तन करत पुढे सरकत असताना, स्थानिक मशिदीजवळ पोहोचल्यावर अचानक मागील बाजूने अज्ञात व्यक्तींनी दगडफेक सुरू केली. या घटनेचा व्हिडिओही समोर आला असून, त्यात मशिदीच्या मागील बाजूकडून दगड येताना स्पष्ट दिसत आहेत. अचानक झालेल्या दगडफेकीमुळे मिरवणुकीत गोंधळ उडाला आणि लोकांमध्ये पळापळ सुरू झाली. पोलिसांनी मशिदीच्या मौलानासह १० ते १२ जणांविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केलाय. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून, प्रशासनाकडून सतत लक्ष ठेवले जात आहे.
 
हे वाचलत का? - लॉकडाऊनबद्दल अफवा पसरवाल तर कठोर कारवाई करू! मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट इशारा
 
धार्मिक उत्सव सुरक्षित वातावरणात साजरे करणे हा प्रत्येकाचा अधिकार असला तरी अशा कार्यक्रमांमध्ये कोणत्याही प्रकारचा तणाव निर्माण होणे चिंताजनक आहे. प्रशासनाने निष्पक्षपणे आणि कठोरपणे तपास करून दोषींवर कारवाई करावी. त्याचबरोबर भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रभावी नियोजन करणे अत्यंत आवश्यक आहे. राज्यात हिंदुत्ववादी सरकार असताना सुद्धा अशा घटना घडत असतील तर हा केवळ कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न नसून, धार्मिक सणांच्या सुरक्षिततेशी निगडित गंभीर बाब असल्याने शासनाने आणि प्रशासनाने दीर्घकालीन आणि कडक उपाययोजना करण्याची गरज अधोरेखित होत आहे.
 
- प्रिती राऊत, सामाजिक कार्यकर्त्या
 
 

ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक